पत्र - २५
दिनांक २१-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
चव्हाणसाहेब मुंबई-पुणे असा प्रवास करून आले होते. मी पोहोचलो तेव्हा माझ्या वेंधळटपणामुळे त्यांना थोडी वाट पाहावी लागली. मला खूप खजित झाल्यासारखे झाले. साहेबांनी नेहमीसारखेच स्वागत केले. घरच्यांची विचारपूस केली. इतक्या मायेने ते वागत, की या माणसाला राग कधी येत असेल की नाही, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नसे. ते हसतमुख होते. पुण्याहून आम्ही कराडला मुक्कामी जाणार होतो. ठरल्यावेळेपेक्षा मला तासभर उशीर झाला होता. साहेबांकडे कायम एक काळ्या रंगाची गाडी असे. छान गाडी होती ऐसपैस. साहेबांबरोबर रसिकभाई शहा हे त्यांचे कोल्हापूरचे स्नेही होते. ते दोघे मागे बसले. मी पुढच्या सिटवर बसलो. साहेब म्हणाले, काय लक्ष्मण, गप्पगप्प आहात ? उशीर झाला म्हणून ? अरे, तुम्ही एस.टी.ने आलात ना ? झाला असेल थोडा उशीर, त्यात काय एवढे.
नाही साहेब, सकाळी सकाळी एक लडतर लागली पाठीमागे.
काय लडतर होती ?
सकाळी सकाळी आमच्या पारधी समाजातली फलटणची हत्यारी नावाची पोक्त बाई आली होती. आली होती म्हणजे काय सांगू ! ती दारात आली नि किंकाळायला लागली. दार उघडून पाहिले तर हत्यारी ओळखेना, काष्टा घातलेला गुडघ्याच्या वर डोक्यावरल्या पदराने तोंड झाकलेले, मला कळेचना तोंड का झाकलेय. ती म्हणाली,
'काय सांगू सायबा, ही बग काय केलंय रांडनं' साहेब तोंडावरला पदर तिनं काढला आणि मला कळेचना. पाहवत नव्हते. तिच्या विहीणबाईने दोघींच्या भांडणात गालांचे लचकेच्या लचके काढलेले. मांसच तोडून घेतलेले. बरं दवाखाना, मलमपट्टी असले काहीच नाही. त्याने ते इतके भेसूर दिसत होते, रक्त थांबले होते, पण काय झाले, हे सांगताच येत नाही. बाकी चेहरा सुजलेला. जनावरे तरी बरी. नुसती ओरडत होती.
'तिला रांडला जेलात बशीव. आताच्या आता फोन कर. तिला जेलात घाल. पोलिसास्नी सांग.'
आता काय करावे ? मी तिला समजावीत होतो, तू फलटणला जा. पोलिसात फिर्याद दे.
ती म्हणे मी ठेसनात जात न्हाय. म्हणतर हितवर आली तू जाणं. त्या शिवाय फिर्याद कोण करणार ? मी ठेवसाची पायरी चढत नाही. तू चल.
आता काय करावे. शशीने तिला पहिल्यांदा घरात घेतली. पाणी दिले, जखमेवर हळद घातली. चहा दिला. ती थोडी शांत झाली. रडायची थांबली. मी तिला समजावली, काय झाले तर सांग.
'र्हातुला म्हणू, गतकाळीची लेक म्या मोठ्या लेकाला केली. तीन सालं झाली. पोटापाण्याला एकांदं तरी लेकरू व्हावा का न्हाय ? तू सांग म्हण माझ्या पोरानं तिची लेक घालावलीती रागारागानं. तर हिनं इकून टाकली ना ? माझी सून इकून टाकली. मंग म्या का गप्प बसू ? घावली मले बाजारमधी. गोड बोलून नेहली घरी आन् लागली कालगत. तिनं माझी आशी दशा केली.'
पर तू का हात बांधलं होतं का ? मी म्हणालो
हां म्या लय चेचलीया. तिनं माझं गाल खाल्लं. म्या तिजं नाक तोडलं. झिंज्या तर गावभर केल्या. म्या का तिला तसं सोडीन. रांडच्या....
बरं, आता असं करूया मला पुण्याला काम हाय. तू पत्र घी आन् पोलिसात जा.
म्या जात न्हाय मणती ना तुला, तू चल.
बरं. झबझब्याला पाठव.
न्हाय म्या त्याच्याकडंबी जाणार न्हाय. काय ती तू सुई लाव.
आता त्याज्याशी का भांडलीस ?
हां त्योबी... तसलाच हाय. म्हातारपणात चळलाय. माझ्यापरीस त्याला तिजाच पुळका हाय. तू चल.
बरं. आसं करू, तू जा. मी मागनं येतो. माझे काम झाल्यावर. नाय तर उद्याच्याला सकाळच्या पारी येतो. मंग झालं. अशी समजूत घालून तिला पाठवलं.