पोरी मोठ्या बोल्ड वाटल्या. त्या न घाबरता, न संकोचता सांगू लागल्या, की ही सारी चूक आमच्या आईबापांची आन् मामांची आहे. आम्ही पोटात असतानाच पोटाला कुंकू लावून लग्न जुळवली होती. आम्ही मोठे झालो. आम्हाला यातले काही माहिती नव्हती आन् पोटातल्या भाजीचे लग्न.
पोटातली भाजी ? साहेब कुतूहलाने म्हणाले.
होय, पोटातली भाजी. म्हणजे मूल पोटात राहिले याची खात्री पाचव्या महिन्यात करतात. पाचव्या महिन्यात माझ्या मुलाला तुझी मुलगी दे असे मामा बहिणीला म्हणतो. तिने ते मान्य केले की तिच्या पोटीपोटाला कुंकू लावले जाते. खणानारळाने ओटी भरली जाते आणि हा लग्नविधी झाला असे समजले जाते.
आता पण मुलगीच होईल कशावरून ?
हां. मुलगी झाली तर हा विधी लागू होणार. मुलगा झाला तर नारळ पावला.
साहेब मोठ्याने हसू लागले. काय रीती असतात नाही.
हां. तर पोरी सांगत होत्या, मामांच्या पोरांना आम्हाला द्यायचे हे आम्ही पोटात असतानाच ठरले होते. आम्ही मोठे झालो. आमचे जोडीदार आम्ही निवडले. प्रत्यक्षात आमचे लग्न ठरू लागल्यावर आम्ही घरी सांगायला हवे होते. आम्ही दोघांनी आयांना सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्या भावाची वाट चालू ठेव म्हणून रडू लागल्या. आमचे कुणी ऐकतच नव्हते. आम्ही चौघेजण लग्नाअगोदरही एकत्रच हिंडत होतो. चौघांना सारे माहीत होते. जमात ऐकायला तयार नव्हती. आम्ही चौघांनी ठरवले. आपसात एकमेकाला बाटवायचे नाही. यल्लमा आईला साक्षी ठेवून लग्ने केली. त्यानं आज बी आम्ही एकमेकास्नी फशीवलं न्हाई. पण जातीरिवाजात बसत न्हाई. तुम्हीच वाट दाखवा. मग फिरवाफिरवी करण्याचे ठरले. सारा गुंता उलगडला होता. जातीरिवाजानं पंचायत पुन्हा सुरू झाली. दोन्ही जोडप्यांची काडीमोड गुरुजींनी केली. आणि तिथल्या तिथे जोड्या फिरवून पुन्हा लग्ने लागली. दोन्ही जोड्या खूष होत्या. आईबाप नाराज होते. पंचायतीला मोठे जेवणे घातले.
लक्ष्मण, आपल्या समाजात असे कधी होईल का ? हे गरीब लोक, पण किती निर्मळ ! साहेब म्हणाले.
साहेब, आमच्या समाजात मुलीला निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. पुरुषाला नाही. मुलीला हुंडा द्यावा लागतो. मुलाला नाही.
आता आम्ही नगरला आबासाहेब निंबाळकरांच्या घरी पोहोचलो होतो. मी साहेबांचा निरोप घेतला. त्यांचे काही कार्यक्रम होते. सायंकाळी पाच वाजता भेटू म्हणाले. मी संघटनेच्या कामासाठी नगरमधील कोल्हाटी समाजातल्या लोकांकडे गेलो. माझे तिथले सहकारी दि.स.वैद्यगुरुजी मला घेवून जायला आले होते. मी भिंगारला वैद्य गुरुजींकडे गेलो. जेवण झाले. पाच वाजेपर्यंत मी माझी कामे केली. पाच वाजता पुन्हा साहेबांसोबत आबासाहेबांच्या घरी भेटलो. आता पुण्याकडे पुन्हा प्रवास सुरू झाला. साहेब सांगू लागले,
लक्ष्मण, १९४३ साल असावे. त्यावेळी मी भूमिगत होतो. बेचाळीसची चळवळ जोमात होती. मला पकडून देणार्याला मोठे इनाम सरकारने जाहीर केले होते. पुण्यातल्या दारूवाला पुलाजवळच्या गोसावपुर्यात बबन गोसावी यांच्या घरात मुक्कामाला होतो. दिवसभर घरात बसून राहायचे आणि रात्री बाहेर पडायचे. जानेवारी महिना होता. मला अचानक निरोप आला, वेणूबाईंना अटक झाली. त्यांना कराडच्या तुरुंगात ठेवले आहे. १४ जानेवारीला माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला वेणूबाईंना तुरुंगात जावे लागले होते. लग्नानंतर पहिल्याच संक्रांतीला पत्नीला तुरुंगात जावे लागले. खूप यातना झाल्या. वेणूबाईंनी कराड, इस्लामपूर येथल्या तुरुंगात सहा आठवडे काढले. बंधू गणपतरावही तुरुंगात. मी असा भूमिगत. गणपतरावांना सोडवून आणण्यासाठी थोरले बंधू ज्ञानोबा यांनी पाठीवरी गळूची शस्त्रक्रिया करून घेतली. त्याचे सेप्टिक झाले. त्यातून निमोनिया झाला आणि अवघ्या आठ-दहा दिवसांत त्यांचे निधन झाले. आईला भेटायला जायला जीव उतावीळ झाला होता, पण जाता आले नाही. लक्ष्मण, त्यावेळी आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याचे एकच ध्येय होते. 'पत्री सरकार' या आमच्या बेचाळीसच्या चळवळीकडे सार्या देशाचे लक्ष लागले होते. घरातले आजार, अडचणी या सर्वांना वेणूबाई धैर्याचे तोंड देत होत्या. तुरुंगातून सुटल्याबरोबर त्यांनी ज्ञानोबांची सुश्रूषा केली. दीराच्या निधनाचा धक्का बसून त्या स्वतः आजारी पडल्या, बेशुद्ध पडू लागल्या. मी सारखी माहिती घेत होतो. मध्यस्थामार्फत त्यांना पुण्यात आणवले. चांगल्या वैद्यांना दाखवले आणि फलटणला माहेरी पाठवून दिले.