• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २३-१७९२०१२

पत्र - २३
दिनांक १७-०९-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

चव्हाणसाहेबांना समजून घ्यायचे तर त्यांची जडणघडण समजून घ्यावी लागते.  देवराष्ट्रातले त्यांचे घर याला साक्षी आहे.  घराचा भोवताल पाहिला तर लक्षात येते की साहेबांचे घर रामोसवाड्यात आहे.  धनगरांची घरे, मुसलमानांची घरे, मागासवर्गीयांची घरे भोवताली आहेत.  खेड्यातल्या आळ्यांचा विचार केला तर साहेबांचे बालपण या पोरांच्यातच गेलेले आहे.  म्हणूनच 'उपरा'तली भाषा त्यांना आपलीच भाषा वाटत होती.  एकदा कराडच्या बाहेरून आम्ही संभाजीबाबा थोरात यांच्याकडे जेवायला जात होतो.  कृष्णेचा पूल ओलांडला की कार्वे गावात आपण शिरतो.  कार्वे तसे फार मोठे गाव.  संभाजी बाबा पूर्वी आमदार होते.  साहेबांचे परमभक्त.  उंचापुरा देखणा माणूस,  गोरापान उभ्या चणीचा चेहरा, पांढरेशुभ्र धोतर, पांढरा नेहरू शर्ट, गांधी टोपी, पायात कोल्हापूरी वहाणा, बोलके डोळे नि बोलका माणूस.  उभ्या दांडीचे नाक, पांढरेशुभ्र दात, हसले की मोगरा फुलल्यासारखा वाटायचा.  संभाजीबाबांबद्दल साहेब मला सांगत होते.  त्यांच्या खूप आठवणी, सामाजिक जाण फार उत्तम. संभाजीबाबांचे घर नदीकाठी होते, दोन मजली.  बाबांनी आमचे स्वागत केले.  माडीवर बैठक होती.  गप्पा सुरू होत्या, गावगाड्यातली म्हारकी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  तर सुप्रिया, दोघांचा संवाद ऐकण्यासाठी खरेच तुम्ही मुले हवी होता.  संभाजीबाबा मोठे अभ्यासू व्यक्ती.  वक्ता आणि श्रोता म्हणूनही चौफेर घडण.  अत्यंत पुरोगामी, साहेबांचे पक्के अनुयायी.  बोलघेवडे नव्हते.  ते महारांची कामे सांगत होते, महार म्हणजे हरकाम्या, पट्टीसाठी लोकांना बोलावणे, तगादा लावणे, गावचा वसूल तहसिलात घेऊन जाणे, कागदपत्रे परगावी पोहचवणे.  पाटील-कुळकर्णीबरोबर गावात, शिवारात हिंडणे, परगावी जाणे, गावात आलेल्या अधिकार्‍यांची जनावरे सांभाळणे, दाणापाणी देणे, शेणलिद काढणे, गावांची वेठबिगार वहाणे, वाट दाखवणे, वाटसरूंना जंगलातून नेऊन पोहोचवणे, दवंडी देणे, गावाची शिव व शेताचे बांध ध्यानात ठेवणे, भांडणात पुरावा देणे, पिके व खळी राखणे, रात्री काळी-पांढरीत गस्त घालणे, गावची जंगल व झाडे जतन करणे, जंगली जनावरे मारणे, चोरवाटा व माराच्या जागा यांची माहिती मिळवणे.  आल्यागेल्याची खबर काढणे.  वहिमी लोकांची पाटलास खबर देणे, चोरीचा तपास लावणे, माग काढणे, चावडीपुढे, वेशीपुढे व गावचे रस्ते झाडणे, गाव साफ ठेवणे, मेलेले जनावर ओढणे, याशिवाय बरीच काम होती.  चव्हाणसाहेब म्हणाले, बाबा, ही झाली गावकीची कामे.  अजून खाजगीची कामे राहिली ना ?  हा साहेब, गावकीची कामे करणाराला काय म्हणत त्याचा एकच शब्द आहे, तो काय बरे ?  साहेब म्हणाले 'पाडेवार'.  हो साहेब, पाडेवार आन् खाजगीची कामे करणार्‍या महाराला राबता किंवा घरमहार म्हणत.  वतनदार महाराची कामे खाजगीकडे असत.  कुणब्याचे बी औतकाठी या ओझ्याची.  औतकाठी यांची ने आण करणे.  दारापुढे झाडणे, गुरांचे गोठे साफ ठेवणे, सरपण आणणे, सरपन फोडणे, मुर्‍हाळी जाणे, चिठ्ठयाचपाट्या परगावी नेणे अगदी सगळ्यांत वाईट म्हणजे मौतीची खबर परगावी पोहचवणे, सरण वाहणे.  बाबा शंकरराव खरातांचे सांगावे वाचलेत काय ?  साहेब म्हणाले.  होय साहेब.  वाचले, खरेच या लोकांचे दुःख आपल्या लोकांना समजायचे नाही.  जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.  दहादहा कोस मेलेल्या मयताचा सांगावा घिऊन जायचे.  तहान-भूक काही असो, महार लांबून दिसला तरी नांदायला गेलेली मुलगी समजून चुकायची काहीतरी अपशकुन आला.  तो दारात आला आणि सांगू लागल्याबरोबर रडारड कालवा सुरू व्हायचा.  तो महार कसा आला, कसा गेला, पाणी सुद्धा कुणी विचारायचे नाही.  शंकररावांच्या कथा मुळातूनच वाचल्या पाहिजेत.  तराळ अंतराळ, तराळकी, येस्करकी, आणि मेलेले ढोर ओढणे, त्याची चिरफाड करणे, त्याच्या मांसाचे वाटे घालणे, ते वाळवून ठेवणे.  बाबा आपल्या लोकांनी कधी नाही याचा विचार केलाय का ?  मेलेली ढोरे आपली आपण ओढली का ?  साहेब विचारत होते.  खरे तर हे सारे प्रश्न माझ्या मनात होते.  ते साहेब विचारत होते.  नुसता कल्पनांनी सुद्धा घाम फुटतोना आपल्याला ?  मेलेल्या जनावरांच्या अंगावरल्या माश्या कल्पनेने पाहिल्या तरी बाबासाहेबांच्या धर्मांतराचा अर्थ शहाण्याला समजतो.  तो आपल्या लोकांना समजत नाही.  बरं पिढ्यानपिढ्याची ही घाणीची कामं ज्यांना करायला लावली, ज्यांनी सार्‍या गावाची स्वच्छता करायची त्यांनाच शिवून घ्यायचे नाही.  या संबंधी कुणी कधी बंड केल्याचे दाखवा किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये अस्पृश्यतेचा साधा निषेध केल्याचे दाखवा.  हे बंड बाबासाहेबांना करावे लागले.  हे काम कुणी केले असते का ?  बाबा, आपले लोक विचारच करीत नाहीत.  वहिवाटीने जगतात.