• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १७-६९२०१२

पत्र - १७
दिनांक ०६-०९-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

दिवस आता खूपच बदलले होते.  माझ्या विचार करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला होता.  पूर्वी मी सातार्‍यातून कोल्हापूरला गेलो होतो, आता मी कोल्हापूरच्या तालमीत तयार होऊन सातारला आलो होतो.  पुलाखालून बरेच पाणी गेले होते.  जात नावाची गोष्ट मला गवसली होती.  पूर्वी पाठ्यपुस्तकांशिवाय मला काहीच माहिती नव्हते.  समाजवादी युवक दलात सामील झालो आणि वैचारिक प्रगल्भता वाढली.  विचार तपासायचा असतो, त्यासाठी व्यासंग करावा लागतो हे समजले होते.  पुस्तके घेण्याची ऐपत नव्हती.  पण नगर वाचनालयात वर्गणीदार होता येत होते.  प्रमोद कोपर्डे, किशोर बेडकिहाळ आणि मी तासनतास ग्रंथालयात असायचो.  संध्याकाळी नगरवाचनालयाच्या कट्ट्यावर आमचा अड्डा जमायचा.  त्यावेळी 'मागोवा'चा एक ग्रुप फार काम करायचा.  आदिवासींमध्ये, दलितांमध्ये काम करण्याची क्रेझ होती.  दाढी वाढवायची, केस वाढवायचे, बिन इस्त्रीचा खादीचा पायजमा, लांबलचक नेहरूशर्ट, मनगटाजवळ घडी घालून मुडपलेला, डोळ्याला चष्मा, बगलेत शबनम बॅग, तोंडात सिगारेट आणि अर्धा कप चहा हे क्रांतिकारकाचं आधुनिक रूप.  तोंडात मार्क्स, ट्रॉट्स्की, माओ, यांचे संदर्भ आणि नावे.  कोटेशन्स, 'दास कॅपिटल', वर्ग, कष्टाफ्री वर्गाची अधिसत्ता, पीपल्स डेमॉक्रसी, भांडवली लोकशाही, अशा अत्यंत अवघड शब्दांत कोणी बोलू लागला की आमच्यावर दांडगे दडपण येत असे.  फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा, माओ हे आमचे आदर्श होते.  तेव्हा फुले, शाहू, आंबेडकर ही काही आताच्यासारखे चलनी नावे नव्हती.  फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांनी केलेली क्युबातली क्रांती आपणच केली असल्यासारखी मोठी नशा त्या काळात आम्ही अनुभवली होती.  सारी प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकीत आहोत, आपणच चे गव्हेराच्या भावनांचे पारायण करीत आहोत, ड्रॅगन जागा झाला आहे, तो आपणच आहोत अशी स्वप्ने तरुण मनाला पडत असत.

जावळी तालुक्यातल्या, महाबळेश्वर तालुक्यातल्या जंगलाकडे पाहिले की वाटायचे, हीच जंगले उद्याच्या क्रांतीला साथ देणार आहेत.  सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत वेड्यासारखे आम्ही हिंडत असायचो.  कुठेतरी मनाने या जागतिक क्रांतीशी स्वतःला जोडून घ्यायचो.  भूक लागली तरी दाबून धरायची, डी क्लास व्हायचे, भणंग राहायचे, असे राहिल्याने क्रांती होते, असे आमचे समज होते.  ही झापडे उतरायची ती एखादी घटना जेव्हा कानफटांत खाडकन् मारायची तेव्हा.  हे वर्गबिर्ग काही खरे नाही.  आपण पहिल्यांदा महार, मांग, चांभार, ढोर, कैकाडी, माकडवाले आहोत.  अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त आहोत 'वर्ग' नाही घरी चूल पेटायची बोंबाबोंब आणि स्वप्न पडायची क्रांतीची.  'युटोपियन सोशालिस्ट' ही शिवी वाटायची.  जमिनीवर पाय यायचे ते एखाद्या सामाजिक धक्क्याने.  असे धक्केही रोजच बसत.  पण पुस्तकात झालेल्या क्रांत्या आणि आपले वास्तव काही जुळायचे नाही.  समाजवादी युवक दलातले आम्ही तरुण पेटून उठायचो.  काहीजण नोकर्‍या करत.  ते जास्त वाचन करत.  आम्ही तुलनेने कमी वाचायचो.  पण चळवळ गतिमान करण्यासाठी खेड्यापाड्यातून माणसे पेटवीत उठायचो.  आमच्या ग्रुपमध्ये पार्थ पोकळे नावाचा एक उमदा तरुण सामील झाला.  गोरापान, उंचापुरा, पैलवानकी केलेली, कोल्हापूरच्या स्पर्धांमध्ये नावाजलेला.  दलित असल्याने त्याचे माझे पटकन जमले.  तो शिक्षकाची नोकरी करायचा, पण तळमळ, पोटतिडीक फार वरच्या दर्जाची.  मी नुकताच सरकारी नोकरीत शिरकाव केलेला.  त्यामुळे माझा मार्क्स थोडा पातळ झालेला.  चूल पेटवायची तर क्रांतीला लगाम घालावाच लागला.  परंतु काम काही बंद केले नव्हते.  कधी दाभोळकरांच्या स्कूटरवर तर कधी पार्थच्या मोटरसायकलवर ऑफिस सुटले, की खेड्यापाड्यातल्या दलित वस्त्या धुंडाळायच्या.  उत्साहाला पारावार नव्हता.  खेडी म्हणजे नरक, जातीचे उकिरडे.  आमची माणसे नागवली जात होती.  पार्थ पोकळे आणिमी समाजवादी युवक दलाच्या बिनीच्या तोफा.  बाकीचे मित्र मध्यमवर्गीय, शहरातले.  आम्ही पक्के खेड्यातले, त्यांच्या भाषेत बोलणारे.  त्यामुळे आपोआपच कामाचे वाटप, श्रमविभागणीनुसार.  आम्ही 'राबणारे' !