• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १६-४९२०१२-१

बाबा आढाव, भाई, बापू, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे हे आमचे आदर्श होते.  सातारला आलो आणि समाजवादी युवक दलात काम करू लागलो.  तो सारा तपशील 'उपरा'त आला आहेच, तो तुला ठाऊक आहे.  काँग्रेसबद्दल मनात कडवटपणा भरून होताच.  दलित पँथरच्या चळवळीत काही वर्षे गेली होती.  त्याने तर भाषेलाही चांगले क्रांतिकारक वळण लागले होते.  आणि या अशा बदललेल्या मानसिकतेत मी पुन्हा यशवंतरावांना भेटत होतो.  सातार्‍याच्या मातीत.  १९७३ सालच्या मे महिन्यात मी सातारला आलो.  ते साल ७२ च्या दुष्काळाच्या नंतरचे होते.  पाऊस होता; पण अन्नधान्याचा कोण तुटवडा होता.  रेशनिंगवर मिलो मिळत होता.  मिलो म्हणजे अमेरिकन ज्वारी.  तांबड्या रंगाची.  तिला कसलीही चव नव्हती.  भाकरीही नीट होत नव्हत्या.  लालभडक, जनावरे खाणार नाहीत अशी ज्वारी गोरगरिबांना तासन्तास रांगांमध्ये उभे राहून घ्यावी लागत होती.  तीही पुरेशी मिळायची नाही.  रॉकेलची टंचाई, रॉकेलही रेशनिंगवर होते.  रेशनिंग कार्डधारकांना निदान लिटर-दोन लिटर मिळे.  बाकीच्यांना तेही नव्हते.  सातारला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कास तलावातून होत असे.  पाऊस बेताचा.  त्यामुळे नगरपालिका पाणी फार मोजूनमापूनच सोडत असे.  उघड्या पाटाने शहराला पाणीपुरवठा होत होता.  पाण्यात कायकाय पडलेले असायचे.  एकदा पाण्यात गाढव मरून पडले होते.  गाव तसेच पाणी पित होते.  लोक आपली जनावरे पाटात धूत असत.  फिल्ट्रेशनची पुरेशी व्यवस्था नसल्याने गाळाचे लालभडक पाणी सर्व शहरातल्या नळाला येत असे.  कितीही गाळून घेतले तरी पाण्यातला गाळ जात नसे.  रोज पिण्यापुरते पाणी असे.  नळ कोंडाळ्यांच्या खाली खोल खड्डे करून लोक बादल्यांनी पाणी भरत असत.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शहरात फार ज्वलंत विषय होता.

आम्ही समाजवादी युवक दलाचे तरुण कार्यकर्ते या संदर्भात लोकजागरण करत होतो.  लोकांचा चांगला प्रतिसाद होता.  पाण्यासारखी जीवनावश्यक बाब असल्याने आम्ही तावातावाने असंतोष संघटित करत होतो.  त्यात एकदा कासचा पाट फुटला.  चारपाच दिवस शहराला पाणीपुरवठाच नव्हता.  सारी बोंबाबोंब उडालेली.  नगरपालिका टँकरने पाणी पुरवायचा प्रयत्‍न करीत होती.  आम्ही रिकाम्या घागरींचा मोर्चा काढला होता.  मोर्चाला फार चांगला प्रतिसाद लाभला.  खूप लोक आले होते.  स्त्रियांचा भरणा मोठा होता.  डॉ. दाभोळकर आमचे नेते होते.  शहरात सतत संघर्ष चालू होता.  त्यावेळी यशवंतराव परराष्ट्र मंत्री असावेत.  त्यांना आम्हा लोकांची माहिती होतीच.  आम्ही काढीत असलेले मोर्चे ठाऊक होते.  एकदा, ते सातारच्या सर्किट हाऊसवर आले आहेत असे आम्हाला समजले.  आम्ही तात्काळ एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला नेले.  दाभोळकरांनी आम्हा सार्‍यांना शिष्टमंडळात नेले.  खूप गर्दी होती.  पाय ठेवायला जागा नव्हती.  आम्ही चिठ्ठी आत पाठवली.  चव्हाणसाहेबांनी तात्काळ काँग्रेसचे सर्व नेते बाहेर पाठवले.  गर्दी बाहेर गेली.  सातारच्या सर्किट हाउसच्या हॉलमध्ये साहेब खुर्चीत बसलेले.  साहेब हसतहसत उभे राहिले.  'या, दाभोळकर या' त्यांनी हातात हात घेतला.  अत्यंत सौजन्याने आमचे स्वागत केले.  'बसा, बोला काय काढलेत ?'  दाभोळकरांनी सारा विषय मांडला.  धान्य, रॉकेल, पाणी या प्रश्नांसंबंधी बोलले.  कासचा पाट फुटल्याचे आणि त्यामुळे चार दिवस पाणी नसल्याचे मी सांगितले.  ते क्षणात चिंतेत पडले.  अत्यंत शांतपणे सारे ऐकले.  समोर बेल होती ती वाजवली.  एक माणूस आत आला.  त्याला म्हणाले, 'जिल्हाधिकार्‍यांना बोलवा.'  तात्काळ जिल्हाधिकारी समोर उभा राहिला.  त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले, 'हे तरुण माझे मित्र आहेत.  शहरात फार चांगले काम करत आहेत.  त्यांनी मला जी माहिती दिली, ती फार गंभीर आहे.'  डॉ. दाभोळकरांनी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांना आकडेवारीसह सर्व सांगितले.  चव्हाणसाहेब म्हणाले, 'काय करता येईल सांगा.  पाट किती दिवसांत दुरुस्त होईल ?'  कलेक्टर म्हणाले, 'सर दोन-तीन दिवस तरी लागतील.'  साहेब म्हणाले, 'चार दिवस गृहीत धरूया.  एक दिवस जास्त.  पण, पाच नाही.  दुसरे, रेशनिंग.  या तरुण मुलांकडे गाववार आकडे आहेत.  लोक धान्य चोरून विकताहेत.  सारा तपशील दाभोळकरांकडे आहे.  तो घ्या.  संबंधितांना तात्काळ कायद्याने वठणीवर आणा.  किती दिवस लागतील सांगा.'  कलेक्टर 'सर...सर...सर' करत राहिला.  साहेबांनी सौजन्याने पण ठामपणे आदेश दिला.  'पंधरा दिवसांच्या आत मला दिल्लीला समजले पाहिजे, किती लोकांवर कारवाई झाली ते.  रॉकेल, रेशनिंग तात्काळ पुरवठा करा.  अडचण आली तर मला सांगा.  चला, डॉक्टर आता काय राहिले.'  कलेक्टरला म्हणाले, 'स्वतः लक्ष घाला.  पुन्हा या संबंधी चर्चा नाही.'  कलेक्टर बाहेर गेले.  साहेबांनी आम्हा सर्वांचा परिचय करून घेतला.  आम्ही मनातून ठरवून गेलो होतो.  असे बोलू नि तसे बोलू.  प्रत्यक्षात या वागणुकीने ढेकळासारखे विरघळून गेलो.