• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १४-२३८२०१२-३

वेणूताईंना बरं नाही म्हणून भेटायला आलेल्या यशवंतरावांना राजेसाहेबांनी पूर्वी ब्रिटिश रेसिडेंटला सांगून अटक करवली होती.  त्या हे कधीच विसरू शकल्या नव्हत्या.  अन् साहजिकच होतं ना ?  त्यानंतरच त्यांचं अपत्यही गेलं होतं.  या विषयावर त्या बोलत नसत.  साहेबांनी त्यांचंच ऐकलं आणि ते त्यांच्या कामाला लागले.  आपल्या तिकिटात काही अडचणी आहेत हे महाराजांना समजलं.  ते चव्हाणसाहेबांपुढे उभे राहिले.  धोतराचा सोगा पुढे केला आणि 'यात फलटणचं तिकीट टाका' म्हणू लागले.  साहेब उठले, त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाले आता वयाचा विचार करा.  घरातल्या इतर कुणाला तिकीट मागा.  त्यांनी आपला आग्रह कायम ठेवला.  साहेब एवढंच म्हणाले, 'ठीक आहे, मी तुमच्या आडवा येणार नाही'.  महाराज समजले.  तिकीट नक्की झालं.  ही गोष्ट जेव्हा आबासाहेब वीरांना समजली तेव्हा ते भलतेच चिडले.  साहेब तेव्हा दिल्लीत राहत होते.  आबांचा मोठा दबदबा होता तेव्हा जिल्ह्यात आणि राज्यातल्या काँग्रेसमध्ये.  साहेबांना थेट बोलणारा आबा हा त्यांचा मित्रही होता.  त्यांनी साहेबांना विचारल्यावर ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे सौजन्यानं वागले.  घडलेला प्रसंग सांगितला.  आबांनी आग्रह धरला आणि तिकीट वाटपा आपण फलटणमध्ये पडणार नाही, असा शब्द घेतला.  त्यांच्यावर खूप प्रेशर आलं पण, तिकीट मलाच मिळालं.  महाराजसाहेब पुन्हा उभे राहिले अपक्ष म्हणून.  ते संस्थापिक, मंत्री. ते सर्वार्थानं समर्थ; मी सर्वार्थानं दुबळा.  तरुण होतकरू, पाच वर्ष मतदारसंघात केलेलं काम आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते.  आबा आणि साहेब आमची दैवते.  त्या बळावर उभा राहिलो आणि जिंकलो.  अगदी काठावरल्या मतांनी.  मग मात्र पुढे तीन वेळा आमदार झालो.  महाराजांचं राजकारणातलं प्रस्थ संपलं.  गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत काँग्रेस आणि चव्हाणसाहेबांचा शब्द अखेरचा असायचा.  माझ्यासारखी तरुणांची फौजच साहेबांनी जमा केली होती.  पंचायत राज हे राज्यकारभाराचं प्रशिक्षण केंद्र व्हावं.  त्यातून नेतृत्व उदयाला यावं, ते प्रशिक्षित असावं, लोकांमधून आलेलं असावं, लोककल्याणकारी राज्य व्हावं, ही त्यांची विचारसरणी होती.''

मधेमधे चहा येत होता.  मी त्यांना बोलतं करत होतो.  गाडी जरा भलतीकडे गेली तर ती पुन्हा रुळावर आणण्याचं काम करत होतो.  बोलायचे थांबले की, थोडं इकडचं तिकडचं बोलायचं.  बोलणे सुसंगत करून घ्यायचं.  हातात पेन्सिल नाही, कागद नाही, टेपरेकॉर्डर नाही.  नुसत्या खुल्या गप्पा.  फार छान असतात अशा साहेबांच्या आठवणी.

सुप्रिया, काही वेळा यांचा हेवा वाटतो.  आपण त्यानंतरच्या काळात जन्माला आलो याची खंत वाटते.  शाहू महाराजांच्या कथा ऐकताना जसं आपण काळाचं भान विसरतो ना, तसंच चव्हाणसाहेबांचं सारं आयुष्य आहे.  एक नितांतसुंदर जगणं.  आमच्या जिल्ह्यात चंद्रहार पाटील, कृष्णचंद्र भोईटे, प्रतापराव भोसले, दादासाहेब जगताप, शंकरराव जगताप, प्रभावती सोनावणे, विलासराव पाटील उंडाळकर, पी.डी.पाटील अशी मोठी टीमच आमदार म्हणून निवडून आणली होती.  नवं नेतृत्व बहुजनांमधून आलं पाहिजे, सत्ता पाझरत सामान्यातल्या सामान्य माणसाकडे संक्रमित झाली पाहिजे, त्यासाठी त्याला प्रशिक्षण मिळालं पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, गरीबातल्या गरीब माणसाला राज्य आपलं वाटलं पाहिजे.  जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान संधी मिळायची तर नवं नेतृत्व उभं केलं पाहिजे.  त्यांना सत्तेचा आधार दिला पाहिजे.  कार्यकर्त्यांची शक्ती वाढवली पाहिजे.  कृषी औद्योगिक समाज, समाजवादी समाजरचना हे त्यांचं स्वप्न होतं.  भोईटेसाहेबांचा निरोप घेताना अशा कितीतरी विचारांनी डोक्यात गर्दी केली होती.  हा जातिनिष्ठ, श्रेणीबद्ध समाज मला केव्हातरी न्याय देईल, या भ्रमात मी कधीच नव्हतो.  पण बहुसंख्याक असलेल्या समाजातील तळातल्या सामान्य माणसाला तरी काही मिळेल ही शक्यताच आता उरलेली नाही.  सारे सरंजामदार लोकशाहीच्या मतपेटीच्या आधारेच जिल्ह्यात सुस्थिर झाले आहेत.  पण उर्ध्वगामी असलेला हा समाज मुजरे घालण्यातच दंग आहे.  सारे जुने वाडे उल्हसित आहेत.  आमदार, खासदार, मंत्री सारे तेच आहेत.  पूर्वी घोडे होते, आता गाड्या आहेत.  नजरेतला धाक तोच आहे.  सामान्य गेणबा कंबरेत वाकलेलाच आहे.  यशवंतरावांना हे अपेक्षित होतं काय ?  आम्ही निघालो कुठे ?  पोहोचलो कुठे ?  या प्रश्नांची उत्तरं आमच्या पिढीला द्यावीच लागतील.  भोईटेसाहेब थकलेत.  परवाच केशवराव पाटीलअण्णा गेले.  ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, ते काळाच्या पडद्याआड जात आहेत.  बरं झालं, साहेब गेले.  हे त्यांच्याच्यानं पाहावलं नसतं.  नवे सरंजामदार सरदार पाहण्याचे दिवस त्यांना दिसले नाहीत, हे बरंच झालं !

ती. सौ, वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका