• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १३-२०८२०१२

पत्र - १३
दिनांक २०-०८-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.


बघता बघता मी मराठी सातवी पास झालो.  आता शाळा बंद होणार.  घरची शिकवायची ऐपत नव्हती.  मला तर शिकायचं व्हतं.  बानं स्पष्टाणे सांगून टाकलं, लगीन करा, आन् रिकामं व्हा. पोटापुरती शाळा झाली.  कुठंतरी हातापाया पडून नोकरी लावून काय व्हतंय का बगू.  मास्तर, तलाठी, पाटकरी अशा नोकर्‍या त्या काळात सातवी पास झाल्याला मिळायच्या.  तसं कायतरी बगू.  म्हणून शाळंच्या नावानं त्यानं बोलणं बंद केलंतं.  आईच्या मागं म्या टुमनं लावलंतं, मला पुढं शिकायचंय.  आई म्हणाली, 'ही चिलीपिली सांभाळू, का तुला शिकायला धाडू, सांग.  मला बी वाटतंय त्वा लय शिकावा.  पर आपल्या गरिबीची, घरादाराची परवड हाय.  करावी तरी काय इगत करावी ?  मी काय तुला पैसाआडका देणार न्हाय.  शिकायचं म्हंजी त्वांडाचं काम न्हाय.  पैका लागणार, जेवायला खायाला लागणार.  ते कोण देणार ?  आमचा थारा एका जागंला न्हाय.  हातावरलं पॉट.  पॉट निहील तिकडं जायाचं.  आतापासून कंच्या बी मास्तरच्या पाया पडून बा तुझा घालीतच होता की साळंत.  पर आता म्होरल्या शाळंच कसं करायचं ?'  चारी बाजूनं अंधारून आलेलं.  मदतीला कुणी नाही.  त्यात निरगुडी माझ्याचमुळं सुटलीती.  तो सारा तपशील मी 'उपरा'त लिहिला आहेच.  तू तो वाचला असशीलच.  मला मदत करणारे आकोबा सस्तेगुरुजी, रामभाव सस्ते आता निरगुडीत, तर मी सोमंथळीत.  माझं वय लहान.  मी काय करणार होतो ?  मनाचा निर्धार पक्का होता.  काय झालं तरी शाळा मध्येच सोडायची न्हाय.  मी आईला सांगितलं, 'फलटणला प्रवेश घेतो.  चालत जाऊन-येऊन शाळा करतो.  तुम्ही नसाल तवा, माझं मी सयपाक करून राहतो.  न्हाय तर गावात मिळंल ती कामं करून पॉट भरतू.'  आईचा जीव कासावीस झालाता.  तिच्या डोळ्यांतनं धारा लागल्यात्या.  'येवढा शहाणपणा कसा आलं रं लेकरा तुला, र्‍हाई तू घरी, घर बी राकन व्हईल आन् शाळ बी करा.  म्या तुला जमलं तसं जवारी, मिठ, मिरच्या पुरवीन.  तुझं तू हातानं कयन खा.  कामाला इलाज न्हाय.  घावल ती कामं कर.  आन् भागीव.'

सुप्रिया, त्यावेळी मी अशा वाटेवर व्हतो, जिथून माझ्या आयुष्याचं वारू कुठंही भरकटलं असतं.  पण आईनं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला.  मला तिची शिकवण फार मोलाची वाटायची.  'आपुन बदनामी जातीतली माणसं.  पयल्यावाणी करू नकुस.  पायरीनं र्‍हा.  कुणाच्या वाळ्यापालवर पाय देवू नको.  सोनं पडलं असलं तरी त्याला हात लावू नकू.  काय ग्वॉड तर काम ग्वॉड.  कुणाच्या बी हातातलं काम घी, मन लावून कर.  कामानं माणूस मरत न्हाय.  कामच माणसाला जगवतंय.  कुणी काय दिऊ दे, नाही दिऊ दे.  दिलं तर घे, उचलू नकोस.  एकटा राहणार हाईस, कुणाच्या वंगाळ संगतीला लागू नकोस.  सारं आभाळ फाटल्यालंच हाय.  वावटळीत असा दिवा लावायचा कर्मकठीण हाय.'

त्यावेळी आम्ही बॅन्ड वाजवत व्हतो.  आमचा बॅन्डचा ताफा व्हता.  एप्रिल, मे-दोन महिने मी बॅन्ड वाजवत व्हतो.  त्यानं माझे पेसे मला मिळणार व्हते.  त्यामुळे शाळंच्या वह्या, पुस्तकं, कपडे भागवणार व्हतो.  बानं आता सारं आंग काढून घेतलंतं.  मी आन् आईच ठरवत व्हतो.  मी फलटणला प्रवेश घ्यायला गेलो.  सारी गावातली,  खेड्यापाड्यातली पोरं हायस्कूलला फलटणला जात.  तिथं मुधोजी हायस्कूल म्हंजे श्रीमंत लोकांचं, शहरातल्या लोकांचं, हायस्कूल. मी प्रवेशाला गेलो. जवळ नवा दमडा नाही.  कुणाला भेटावं, काय सांगावं, कसं बोलावं ?  काहीच माहिती नव्हतं.  प्राचार्य ना. मा. भोसले यांनी दाखवलेल्या औदार्यामुळे एक पैसाही खर्च न करता प्रवेश मिळाला.  ना वाशिला, ना पैसा.  माझ्यासारखी शेकडो मुलं श्रीराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेत व्हती.  हे हायस्कूल श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेचं.  चव्हाणसाहेबांचे बरेच नातेवाईक या संस्थेत व्हते.  नामदेवराव बेडके संस्थेचे अध्यक्ष होते.  बाबासाहेब मोरे चव्हाणसाहेबांचे मेहुणे.  तर दत्ताजी बेडकेंना साहेबांच्या बंधूंची मुलगी दिलेली.  फलटणमधले हे बेडके कुटुंबीय चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्था चालवत व्हते.  त्यानं बबनराव अडसूळ, शहा वकील, स.रा. भोसले, बाळू मेटकरी अशी चव्हाणसाहेबांना मानणारी मंडळी झटत व्हती.  मला शाळेत प्रवेश मिळाला याचा खूप आनंद झाला.  माझ्यासारखी शेकडो गोरगरिबांची मुलं शिकायला येत व्हती. थोडीशी शहरातली पोरं असत, झाकपक; बाकी सारी यथातथाच.  धडप्यातली भाकरी बांधून आणायच्या, मधल्या सुट्टीत कॅनॉलवर सोडायच्या. शाळेजवळून कॅनॉल वाहत व्हता.  या कॅनॉलवर मी अनेकदा रडत बसायचो.  आईची खूप आठवण यायची.  नको ही शाळा, असं वाटायचं.  पण का कुणास ठाऊक, शाळा हेच जग झालं व्हते. त्या काळात शाळंला महिना पाच रुपये फी असायची आणि गरीब पोरांना ती नादारीतून माफ व्हायची.  त्याचा फॉम भरायचा. मी काही भरला नव्हता.  आता काय करायचं ?  नादारीच्या फॉर्मला १० पैसे लागायचे.  दहा पैसे बी नव्हते. कसंतरी करून ते मिळवले.  अर्ज कसातरी भरला.  तलाठ्याकडे गेलो.  तो म्हणाला, माझी सही नाही चालत.  सरपंचाकडे जा. सरपंचाकडे दोनचार हेलपाटे मारले.  त्यानं सही आणि शिक्का दिला. मला यातलं काहीसुद्धा कळत नव्हतं.  एवढंच कळालं, की आता शाळंत आपणाला फी भरावी लागणार नाही.  फी माफीची सवलत मिळाली.