पत्र- २६
दिनांक २१-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
फलटणचे सुभाष शिंदे तुला माहीत आहेतच. उंच वाढलेल्या रामकाठीसारखे उंचच उंच, काटकोळा, गोरापान, तरुण उत्साही कार्यकर्ता, सातारच्या सर्किट हाऊसवर साहेब मुक्कामाला होते. नेहमीची प्रचंड गर्दी वगैरे काही नव्हते. गाड्याचा गराडा नव्हता. साहेब नेहमीच्याच त्यांच्या सुटमध्ये उतरले होते. अनंतराव कुलकर्णी सातार्याच्या समर्थ साप्ताहिकाचे संपादक, साहेबांचे मित्र आणि मी. जरा बरे नसल्याने डॉ. विजयराव मोहिते साहेबांना तपासून गेले. म्हणाले, काही विशेष नाही. पोटाला थोडा विसावा हवा आहे. कुठेतरी खाण्यात काही आले असेल. मी दिल्यात गोळ्या. काळजीचे कारण नाही. तर साहेब निघाले होते सुभाष शिंद्यांकडे फलटणला. मीही त्यांना ओळखत होतो. माझ्या आधीच्या बॅचला श्रीराममध्येच ते शिकत होते. फार कडक. साहेब शिंदेवाडीला जाणार होते. तरुण पोरांना उभे केले पाहिजे. फलटणला तरुण पोरांची मोठी फौज साहेब जमा करीत होते. त्यातला हा एक उत्साही चळवळ्या तरुण. आता तिसर्या पिढीतल्या माणसांना आपल्याबरोबर पक्षात आणि संपर्कात ते ठेवत होते. प्रत्येकाच्या शक्तीचा उपयोक कसा होईल याचा ते विचार करीत. सहकारी संस्थांत सुभाषराव डॉ. भोईट्यांबरोबर काम करीत होते. शेतकरी मेळाव्याला शिंदेवाडीला जायचे. कुणी काहीही म्हणो. विरोधी असो की आणखी काही, प्रस्थापित लोक नवीन तरुण मुलांना काही पुढे येऊ देत नाहीत. आपणच त्यांना ताकद दिली पाहिजे. म्हणून कुणाच्या रागालोभाचा विचार न करता जाणार आहे. तुम्हाला तर फलटण माहीतच आहे. अनंतराव म्हणाले, यशवंतराव, जेवण करून मग बसूयात. औषधही घेता येईल. लक्ष्मण, चला तसे करू. मी म्हणालो मी जाईन घरी. आता जेवणाची वेळ आहे. थोडेसे जेवा, थोडे तरी. चार घास इथे, चार घास तिथे. आम्ही सारे जेवू लागलो. जेवता जेवता मी त्यांना काहीना काही विचारतच होतो. साहेब, सहकारला सुभाषराव काम करतात ही तिसरी पिढी. तुम्ही सर्वांना मदत करता. इतक्या लोकांनी साखर कारखाने काढले. तुम्ही का नाही काढला सारख कारखाना ?
म्हणजे ? सारे साखर कारखाने तर माझेच आहेत. एकही कारखाना राज्यातला असा नसेल ज्याला मी मदत केली नाही. किंवा माझा हातभार लागला नाही.
पण साहेब, हे सारे कारखानदार आज कुठे आहेत या काळात ?
लक्ष्मण, हा काळाचा महिमा हेच खरे. हे सारे मानवी आहे. राजाने राजासारखे वागले पाहिजे. मध्येच अनंतराव निरोप देऊन गेले. आमचे बोलणे सुरू होते.
मी राजासारखा वागलो. कारखाना काढला असता तर त्यांच्या रांगेतला एक झालो असतो. ते माझे काम नव्हते. मी देण्याच्या जागेवर होतो, देत गेलो. सारा सहकार, सर्व सहकारी संस्था. केवढा विस्तार झालाय, पण मी कुठे कुणाचा सभासद नाही. त्यांच्या कोणाच्या स्पर्धेत उभा नाही. आज जे लाखो लोक या चळवळीत आहेत त्या सर्वांमागे शक्ती उभी करायची. गोरगरिबांची, शेतकरी-कामगारांची शक्ती वाढवायची. शेतीच्या प्रक्रियांचा नवनवा विचार करायचा. शेतीच्या मालावर आधारलेले औद्योगिक धोरण म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण नाही का ? उत्पादकालाच मालक करायचे. संपत्तीचे फेरवाटप म्हणजे समाजवाद ना ? गरीबाला उभे करायचे. प्रत्येक माणूस सक्षम झाला पाहिजे. सहकार हा त्यासाठी उत्तम मार्ग. राज्य सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांचे कल्याणकारी राज्य.
साहेब, आपण म्हणता तसे आज आहे का ?,
नाही, तसे नाही हे खरे. त्यात काही वाईटप्रवृत्तीचे लोक आहेत. पण कायद्याने ते नष्ट करता येतील. काम दुरुस्त करावे लागेल. काही मूठभर लोक वाईट असतातच. ते सर्वच क्षेत्रात असतात, नाही का ?
पण तुम्ही एखाद्यातरी नातेवाईकाला कारखाना काढून द्यायचा ना ?
अरे, कुणी सांगितले तुम्हाला माझ्या नातेवाईकांच्या नावे कारखाना नाही ?