• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३२-०८१०२०१२-१

'कुठलल्याही समाजातला कर्तृत्ववान माणूस हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही.  नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतो ते दुधातून येते.  दूध नसेल तर लोणी नाही.  समाजजीवन जेव्हा खळबळलेले असते तेव्हा त्यामध्ये काहीतरी साचत असते.  नवनीत निर्मिणार्‍या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते.  नवनीताला स्वतंत्र अस्तित्व असते ही गोष्ट खोटी असते.  तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान माणसाच्या जीवनासंबंधी खरी आहे. लक्ष्मण एका अर्थाने यशवंतरावांचे जीवन हा मराठी जनतेच्या जीवनाचा प्रसादकण आहे.'

सुप्रिया, हे डॉ. फडकेसरांसारख्या प्रख्यात माणसाचे निरीक्षण आहे.  ते आपण लोकांनी पुन्हापुन्हा वाचले पाहिजे.  सार्वजनिक जीवनातल्या नव्या पिढ्यांनी तर याची पारायणे केली पाहिजेत.  तर त्यांचे नवनीत त्यांना सापडेल. एरवी फसगतच होण्याची शक्यता जास्त.  सदैव माणसांच्या मेळ्यात रमणारे यशवंतराव -

आधीचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादात शिळ, वाजवीत चाललो.

अशी वाट चालत राहिले.  सावधपणे कानोसा घेत.  पुढची साद ऐकणारे यशवंतराव आज नाहीत आणि डॉ. भालचंद्र फडकेसरही नाहीत.  ही माझी जीवाभावाची माणसे.  रक्ताच्या नात्यापेक्षा कैक पटींनी श्रेष्ठ  निःस्वार्थ प्रेम करावे ते यशवंतरावांनी.  पाण्यापेक्षा रक्त घट्ट असते असे आपण सहज बोलून जातो.  पण हे घट्ट रक्त स्वार्थाने आंधळे होते.  तेव्हा भाऊ भावाचा मुडदा पाडताना आपण पाहतो आणि कोणाच्यातरी लेकरासाठी नामदेव तळमळत असतो.  ही नामदेवाची जातकुळी यशवंतरावांची होती.

त्यादिवशी मोठी गंमत होती.  पुणे विद्यापीठातला कार्यक्रम उरकून मी नानासाहेब गोर्‍यांच्या घरी गेलो.  त्यांना घेऊन कुसुरला बंडोगोपाळा मुकादम पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेबांना घेवून जाण्याची जबाबदारी कुसुरच्या मित्रांनी माझ्यावर टाकली होती. मी पोहोचलो तेव्हा नानासाहेब तयार होऊन वाटच पाहत होते.  मी सेवादल सैनिक असल्याने आमचा परिचय नसण्याचा प्रश्नच नव्हता.  नानासाहेबांसारखा मराठीतला शब्दप्रभू मी तरी दुसरा पाहिला नाही.  साधेसोपे रसाळ लेखन वाचायचे तर विनोबांचे मराठी आणि संस्कृत प्रचूर, विद्वत्तापूर्ण मराठी वाचायचे असेल तर नानासाहेबांचे.  नानासाहेबांशी गप्पा मारणे म्हणजे वेचारिक मेजवानी असायची.  अत्यंत उत्तम प्रकारे ते बोलत असत.  समाधीस्थ व्हावे तसे.  आम्ही गाडीने प्रवास सुरू केला.  कामातल्या माझ्या अडचणी, भटक्या-विमुक्त हा शब्द सुद्धा लोकांना माहीत नव्हता.  'उपरा'ने हे मोठेच काम केले होते.  स्वातंत्र्य चळवळीच्या नशेत आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले याच आनंदात स्वातंत्र्यसैनिक मशगुल होते.  स्वातंत्र्याची, ते मिळवल्याची, सत्ताधारी म्हणून काँग्रेस आणि त्याचा विरोध करणारेही पूर्वीचे काँग्रेसवालेच.  वैचारिक मतभेदामुळे वेगळे झालेले असले तरी लोकशाही समाजवादाच्या आग्रहावरून त्यांचे मतभेद असतील.  सामाजिक प्रश्नांचे भान समाजवादी, साम्यवादी यांना होते असे दिसत नव्हते.  ते एकदम कामगारवर्गाची अधिसत्ता बोलत असत.  या देशातल्या जाती काय चीवटपणे आपली मुळे खोलवर रुजवून बसल्या आहेत याचे भान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राममनोहर लोहिया या दोघांना सोडले तर कुणाला होते असे दिसत नाही.  नानासाहेब माझे म्हणणे शांतपणे ऐकत होते.  वर्णसंघर्ष आणि वर्गसंघर्ष एकत्र करावा लागेल असे नानासाहेब सांगत होते.  देशातल्या छोट्या छोट्या जाती, उच्चनीचता, श्रेणीबद्धता हाच मोठा अडसर होता.  साम्यवादी तर जाती व्यवस्थेबद्दल बोलायला तयार नसत.  दलित साहित्य 'उपरा', 'बलुत', 'आठवणींचे पक्षी', 'गोलपिठा' अशा अनेक विषयांवर नानासाहेब माझ्याकडून समजावून घेत होते.  मी त्यांना सार्‍या जातीप्रथेतले शोषण माझ्या परीने सांगत होतो.  आणि बोलता बोलता यशवंतराव चव्हाण या विषयावर आमची गाडी आली.  त्याना अनेक आमच्या समतावादी मित्रांनी सांगितले होतेच, लक्ष्मण आता आपला राहिला नाही.  आपण माणसे तयार करायची नि तयार झालेली माणसे यशवंतरावांनी पळवायची असा एक राग यशवंतरावांवर होताच.  पण एस.एम. असोत की नानासाहेब, त्यांचे विचार इतके उथळ नसत.  पहिल्यांदाच नानासाहेबांनी मला सांगून टाकले.  ज्याने 'उपरा' वाचले आहे त्याला हे समजते की हे अमानुष जीवन या वंचितांच्याच वाट्याला आले आहे.  याची साधी नोंद याआधी आम्ही कुणी केलेली माहितीच नाही.  आम्ही वर्गसंघर्षाची स्वप्ने पाहत होतो.  सत्याकडे आम्हाला दलित साहित्यानेच नेले, हे सत्य कसे नाकारता येईल.  लक्ष्मण, हा प्रश्न सोडवण्यासाठी राक्षसाची मदत घ्यावी लागली तरी घ्या.  आम्हां लोकांची काळजी करू नका.  तुमच्या जागेला मी असतो तर गेला देश उडत असे म्हणालो असतो.  आणि यशवंतरावांबद्दल म्हणाल तर त्यांच्यासारखा माणूस आजतरी कुणी नाही.  स्वातंत्र्यानंतरची जी महाराष्ट्राची नि भारताची बांधणी झाली तीत यशवंतरावांचा फार मोठा वाटा आहे.  'कृष्णाकांठ' वाचल्यावर राहून राहून वाटते की त्यांचा संकल्प पुरा व्हायला हवा.