बाकीचे चिर्याचिर्यावरनं वाड्यावर जायाचे. कौलं काढायची. पाटील झोपला आसंल तिथं उतरायचं. दोगांनी उशाला, दोगांनी पायथ्याला कुर्हाडी घिवून उभं राहायचं. बाकीच्यांनी माल भरलेल्या गोण्या खांद्यावरनं कौलावर आन कौलावरनं वाड्याबाहेर आन तितनं गावाबाहेर न्यायच्या. बायापोरांनी दंगा केला तर, तरण्या पोरांनी दंगा केला तर कुर्हाडीनं घाव घालायचं. बायांच्या अंगाला कुणी हात लावायचा नाही, असा नियम. एखाद्यानं लावला तर पहिला बळी त्याचाच. दागिणं काढून घ्यायचे. आयाबहिणीला हात लावायचा नाही. एकएकदा मोठी गंमत व्हायची. बाळंतिणीसाठी उतरंडीत लावल्याली बिदागी यांना घावायची. बिदागी म्हणजे बाळंतिणीसाठी तुपात खारका मुरवत ठेवलेल्या आसायच्या. त्या खारका गड्यांना घावल्या, की तिथंच ते खात बसायचे ! वेळ झाला की निघायचे. गडी गावाच्या बाहेर गेल्यावर कुत्री बोंबलायला लागायची. तोवर गडी पार पशार झालेले आसाचे. अशी गावंच्या गावं लुटली जायची. मोठी दहशत होती त्या काळी रामोश्यांची. आणलेला माल गावच्या पाटलाकडं ठेवायचा ! हजेर्या व्हत्या. दिवसातून तीन वेळा पोलिस पाटील हजेरी घ्याचा. सारा माल त्याच्याकडेच असल्यानं तो सारे गडी गावात हजर व्हते, रात्रीपण हजर व्हते, अशी खोटी हजेरी मांडायचा. प्रकरण कोर्टकचेरीत गेलं तरी सारी टोळी सहिसलामत सुटायची. बोंबाबोंब झाली नाही म्हंजे अर्धा माल पाटील या सर्वांना वाटून द्यायचा. राजापूरची रामोश्यांची टोळी फार प्रसिद्ध होती. ते पार कलकत्यापर्यंत जाऊन दरोडे घालत...
तर काळोखाची अशी मोठी दहशत, भीती होती. शिवाय छोट्या मोठ्या भुरट्या चोर्या. शेतातल्या पिकांच्या, कपाश्या, कणसं, शेंगा.... भुरट्या चोरांचा रात्री खूप सुळसुळाट असायचा. आमचे लोक मोठ्या संख्येनं चोर्या करत असत. दिवसाला तीन वेळा, रात्री तीन वेळा हजेरी असायची. पण या कायद्याला न जुमानता आमचे लोक दरोडे घालत. गाव बेजार व्हायचा. आमच्यातल्या चांगल्या माणसांनाही पोलिस खूप त्रास द्यायचे. कधीकधी नेवाती टोळ्या, कधी पारधी टोळ्या, कधी मुसलमानांच्या फिरस्त्या परमुलखातल्या टोळ्या खेड्यापाड्यात हैराण करत असत. नेवाती गावचे मुसलमान लोक हजारो गाई म्हशी, घोड्यांसह यायचे. गाव कामगारास आतल्या अंगाने पैसे देऊन झुडपी जंगम चारायला विकत घ्यायचे. पण हे केवळ निमित्त, चोर्या करणं हाच हेतू. शेतात राखणदार असला तरी पाण्यावर जाताना किंवा या गावाहून त्या गावाला जाताना ते आपली गुरं शेतकर्यांच्या शेतात चारू लागत. रात्री-बेरात्री रानंच्या रानं चारून फस्त करत. जनावरंही इतकी तरबेज असायची की, परक्या माणसाचा वास आल्याबरोबर चौखूर उधळत असत. रात्रीच्या वेळी शेतात राखण कोण करणार ? त्यामुळे या टोळ्यांचं काम बिनधोक होत असे. इराणी, बलुची, पठाण, लोकांच्या टोळ्या रानोमाळ हिंडत असत ते असतच. चाकू, तलवारी, बरचे, काश्या, सुर्या, कापडी बूट, सोन्या-रुप्याची खोटी नाणी, खोटे जवाहीर विकण्याच्या निमित्तानं येणारे आणखी वेगळे लोक येत, ते वेगळेच. त्यानं 'घरच्या भीतीनं घेतलं रान, वाटेत भेटलं मुसलमान' अशी म्हण बायापोरांच्या तोंडी असायची. लालबुंद, उंचेपुरे, धट्टेकट्टे मुसलमान पाहिले तरी आमची चड्डीत 'होत' असे ! अशा टोळ्यांवर टोळ्या आल्या, की गावाची पाचावर धारण बसत व्हती. जो तो जीव मुठीत धरून जगत असे. दारांना आतून कड्या घालून बसायचे. आपल्या दारात गडी आले तर काय ? अशावेळी बाहेरच्या टोळ्यांचा प्रतिकार तानाजी नाईकाची टोळी करत असे. सारा गाव एक होऊन या रामोश्यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवाल्यांचा बंदोबस्त करीत असे. रातच्याला गस्त घालीत. प्रत्येक आळीतली तरणी पोरं टेंबं धरून रात्ररात्र 'जागते रहो' चा पहारा देत. बायापोरांनी झोपायचं. गरीब माणसं बिनघोर असायची. त्यांच्या झोपड्याकडे कशाला येतील टोळीवाले ? सारं अंधाराचं राज्य होतं. रात्र चांदण्याची असो की अंधाराची टोळ्यांना फरक पडत नसे. ते आपलं कसब कामाला लावत.
सुप्रिया, असं दहशतीचं वातावरण. इंग्रजांचं राज्य येवो अथवा संस्थानिकांचं, खरं राज्य असायचं ते या दरोडेखोर टोळ्यांचं, त्यांना सामील असलेल्या गाव कामगारांचं. या सर्वांना काहींना काही वाटतच हे दरोडेखोर टोळ्यांतले लोक आपला निर्वाह करत असत. भिकारी, टोळीवाले, अज्ञानाच्या अंधारातच असत. पण गावाबाहेरही अंधारातच असत. माझी आजी फार छान सांगायची-
महादेव आला ईश्वरस्वारी
बी पेरले धरणीच्या उदरी
मेघ बरसला पिकल्या मोत्याच्या घागरी
पाचा कणसांसाठी महादेव करून गेला चोरी
फिरून घेतली पाच कणसे भेंडे उडविले चारी
महादेवाच गळा बांधीला एका वेळावरी
सोड बळीराया तुझे भाग्य आहे थोरी
आंध्रव, गंध्रव राजा स्वर्गाच झाला
अंकली टंकली राजा निर्वाणाचा टाळी
असा पवाडं गाते तुझ्या धर्माची साळी