महाराष्ट्राच्या इतिहासाची सामान्य रेखा
- वा. वि. मिराशी
माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांच्या अभिनंदनपर ग्रंथांत उपरिनिर्दिष्ट विषयावर छोटासा लेख लिहावा अशी चालकांकडन विनंती आली. तदनुसार महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या सद्य:स्थितीविषयी संक्षिप्त माहिती देत आहें.
भारताच्या प्राचीन इतिहासाप्रमाणे महाराष्ट्राच्याहि प्राचीन इतिहासाचे प्रागैतिहासिक काल, वेदपुराणकाल आणि ऐतिहासिक काल असे तीन ठोकळ भाग पडतात. त्यापैकी प्रागैतिहासिक कालविषयी अद्यापि फारसें संशोधन झालें नाहीं. पुराणाश्मयुग व नवाश्मयुग या कालांतील कांही अवशेष नागपूर जिल्ह्यांतील, कळमेश्वर, नवेगांव वगैरे ठिकाणीं सापडले आहेत, पण या दृष्टीने सबंध महाराष्ट्राची सूक्ष्म पाहणी होणें जरूर आहे. नागपूर, चांदा व भंडारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणीं मोठमोठे दगड लावून बनविलेलीं शवस्थानें दृष्टीस पडतात, त्यांचेंहि उत्खनन करून अभ्यास करणें जरूर आहे.
ऋग्वेदांत महाराष्ट्रांतील विदर्भादि देशांचा उल्लेख येत नाही, पण विंध्य पर्वत ओलांडण्याचा मार्ग दाखवून ज्याने आर्यांचा दक्षिणापथप्रवेश सुकर केला त्या अगस्त्य ऋषीनें व त्याची पत्नी लोपामुद्रा हिनें रचलेल्या ऋचा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळांत घेतल्या आहेत. उपनिषदांत विदर्भांतील कांही ऋषींचा उल्लेक आहे. प्रश्नोफनिषदंत विदर्भ देशाच्या भार्गवाचें बृहदारण्यकोपनिषदांत विदर्बी कौण्डिन्य ऋषीचें नावं आलें आहे. त्यावरून त्या काळांत विदर्भ प्रसिद्ध होता असें दिसतें. त्यानंतर पौराणिक कालांत अयोध्येचा अज, द्वारकेचा कृष्ण आणि निषध देशाचा नल या राजांच्या विदर्भांतील राजकन्यांशी झालेल्या विवाहांचे वर्णन हरिवंशांत व पुराणांत येतें. महाभारतांत पांडवांच्या तीर्थयात्रेच्या वर्णनांत महाराष्ट्रांतील पयोष्णी (पूर्णा), वेणा (वाहनगंगा), वरदा (वर्धा), गोदावरी इत्यादि नद्यांचा व जमदग्निपुत्र परशुरामाचें वास्तव्य असलेलें शूर्पारक ( ठाणे जिल्ह्यांतील सोपारा), वराहतीर्थ, रामतीर्थ इत्यादि तीर्थस्थानांचे वर्णन आहे.
महाराष्ट्राचा ज्ञात ऐतिहासिक काळ
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालाला मौर्य राजवटीपासून सुरुवात होते. अशोकाचा शिलालेख सोपारा येथे आणि त्याच्या महामात्र नामक अधिका-याचा चांदा जिल्ह्यांतील देवटेक येथें सापडला आहे. तसेंच त्याच्या शिलालेखांत पश्चिम महाराष्ट्रांतील राष्ट्रिक आणि विदर्भातील भोज लोकांचा उल्लेख आहे. त्यावरून महाराष्ट्र त्याच्या साम्राज्यांत मोडत होता यांत संशय नाहीं. त्याच्या निधनानंतर लौकरच सातवाहनांनी आपलें स्वातंत्र्य पुकारलें. त्यांची राजधानी मराठवाड्यांतील प्रतिष्ठान (पैठण) येथे होती. सातवाहनांच्या काळांत वैदिक धर्माला पुन: राजाश्रय मिळाला. सातवाहननृपति प्रथम सातकर्णि व त्याची राणी नागनिका यांनी अश्वमेध, राजसूय, गवामयन इत्यादि अनेक श्रौत याग करून हजारों कार्षापण नाणीं, घोडे, गाई यांच्या दक्षिणा दिल्या. त्यांचा बौद्ध धर्मांलाहि उदार आश्रय होता. बौद्ध भिक्षूंकरिता त्यांनी नाशिक, कार्ले वगैरे ठिकाणी लेणीं कोरविलीं आणि त्यांच्या योगक्षेमाकरितां गांव दान दिले. सातवाहनांचे राज्य महाराष्ट्रांत साडेचारशें वर्षे टिकलें. या काळात प्राकृत वाड्मयाला मोठा बहर येऊन त्यांतील गाथासप्तशतीसारख्या उत्कृष्ट जानपद काव्याची निर्मिती झाली.
मध्यंतरी कांही काळ पश्चिम महाराष्ट्र शकवंशी क्षत्रपांच्या अमलाखाली आला होता. नहपान व त्याचा जावई ऋषभदत्त यांचे लेख नाशिक वगैरे ठिकाणीं मिळाले आहेत. त्या कालांत सातवाहनांना विदर्भात आश्रय घ्यावा लागला होता. पण पुढे लौकरच गौतमीपत्र सातकर्णीने त्यांचा उच्छेद करून पुन: पश्चिम महाराष्ट्र आपल्या अमलाखाली आणला.
सातवाहनांच्या कालानंतर महाराष्ट्रात अनेक राज्यें उदयास आलीं. पश्चिम महाराष्ट्रांत आभारी राजांनी आपलें राज्य स्थापलें. त्यांचे व त्यांचे मांडलिक त्रैकूटक राजे यांचे लेख नाशिक व कान्हेरी येथें सापडले आहेत. आभीरांचे साम्राज्य पश्चिम महाराष्ट्र, गुजराथ कोंकण या प्रदेशांवर पसरलें होतें. त्रैकटकांची चांदीची नाणींहि पश्चिम महाराष्ट्र, कोकण व गुजराथ येथें सांपडली आहेत. आभीरांनी स्वत:चा शक चालू केला होता तो पुढे कलचुरिचेदि शके या नांवाने दीर्घकाल महाराष्ट्र, उत्तर भारत व छत्तीसगड या भागांत प्रचलित होता.