• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 3

गांधीजींना अधिकाधिक त्याग हवा होता. १९३३ मध्यें हरिजन दौ-याच्या वेळीं गांधीजी नागपूरला आले. त्यांना थैली अर्पण करण्यांत आली. त्या वेळचे नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कै. नगकेसरी अभ्यंकर यांच्या पत्नीने अंगावरचे दागिने गांधीजींना अर्पण केले. "बापू, हे शेवटचे दागिने माझ्या पत्नीजवळ होते. आतां दागिना राहिला नाही." – अभ्यंकर म्हणाले, "ठीक, परंतु तुम्हांला अजून जेवण मिळण्याची तर चिंता नाही ना ? अभ्यंकरांना जेवणहि मिळणं कठीण झालं आहे असं ऐकेन त्या दिवशी मी आनंदने नाचेन"- गांधीजी म्हणाले गांधीजी एवढे कठीण परीक्षक होते.

गांधीजींच्या हाकेला ओ देणा-या यशवंतरावांनी मागेपुढे पाहिलें नाही. घरादाराची, जीविताची पर्वा केली नाही. एकामागून एक आलेल्या संकटांना तोंड दिलें. १९३२ मध्ये १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. १९४१ मध्यें वकिली सुरु केली. १९४२ जूनमध्ये विवाह झाला. १९४२ च्या 'करूं या मरूं' या स्वातंत्र्यलढ्यांत उडी घेतली. पुढे ते भूमिगत झाले. थोरल्या बंधूंच्या मृत्यू झाला. नवविवाहित पत्नीला अटक झाली व ती पुढे अतिशय आजारी पडली. परंतु यशवंतराव या कठीण दिवसांत डगमगले नाहीत; ध्येयापासून त्यांचे मन विचलित झालें नाही.

अशा वेळी त्यांच्या वीर मातेने व सहनशील पत्नीने केवढें धारिष्ट दाखविलें ! यशवंतरावांच्या मोठेपणाचें श्रेय ह्या उभयतांनाच आहे.

"मी महात्मा झालों, याला कारण माझी कस्तुरबा !" हे उद्गार काढून गांधीजींनी स्त्री जातीचा मोठा गौरव केला. तसाच प्रभाव वेणूताईंच्या त्यागाचा यशवंतरावांच्या मनावर आहे. वेणूताईंच्या अशक्त प्रकृतीबद्दल कोणी प्रश्न काढला की यशवंतराव म्हणतात, "तिची प्रकृति खराब व्हायला मी कारणीभूत आहे." स्त्रियांच्या बाबतींत त्यांची दृष्टि नेहमी अत्यंत सहानुभूतिपूर्ण असते. त्यांची हेटाळणी अथवा गैरसोय होत आहे असें दिसून आल्यास त्यांना ते खपत नाही. एकदा असा एक प्रसंग घडला. अब्सेंली हॉलमधील कामकाज आटोपून बाहेर जावयास उठतांना सहज त्यांना दिसलें की, विधानसभा भवनांतील प्रेक्षकांच्या गॅलरीत कांही महिला जागेच्या अभावीं सारख्या उभ्या आहेत. असें पाहतांच ते बेचैन झाले. त्यांनी ताबडतोब त्यांच्या बसण्याची व्यवस्था करविली. जेव्हा त्या बसल्या तेव्हा ते मजजवळ म्हणाले, " झाले माझें काम, मी चाललों आता. याकरिताच एवढा वेळ थांबलो होतो."

जवाहरलालजी म्हणतात, गांधीजी म्हणजे शेतकरी ! त्यांचा दृष्टिकोण संपूर्ण शेतक-यांचा होता. हिंदुस्थानच्या शेतक-यांच्या म्हणजे बहुजन समाजाच्या जीवनाशी ते तादात्म्य पावले होते. बहुजन समाजविषयीचें त्यांचें प्रेम इतकें अगाध होतें की, "हे लोक आहेत म्हणून माझें अस्तित्व आहे." असें गांधीजी म्हणत, आज यशवंतरावजींचा विचारपिंड तंतोतंत असाच आहे.

"मुख्य मंत्रिपदाची जिम्मेदारी मी शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी घेतलेली आहे. तेव्हा मी जर माझ्या जिम्मेदारीच्या कामांत फसलों, चुकलों तर शेतकरी फसला आणि कामकरी फसला असें होईल," असे त्यांचे विचार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी आज जर ह्यात असते तर त्यांना यशवंतरावांकडे पाहून त्यांचे किती कौतुक वाटलें असतें. त्यांना धन्यता वाटली असती की, माझ्या स्वातंत्र्यलढ्यांतील एक तरुण शेतकरी सैनिक महाराष्ट्र राज्याचें मुख्य मंत्रिपद भूषवीत आहे व शेतक-यांचा कैवार घेऊन त्यांच्या कल्याणाची प्रतिज्ञा करीत आहे !

सर्व प्रकारचें शोषण – मग तें आर्थिक असो, बौद्धिक असो, धार्मिक असो अथवा राजकीय असो – गांधीजींना नाहीसें करावयाचे होतें, यशवंतरावजींचीं पावलें आज या दिशेने पडत आहेत.

गांधीजींची ईश्वरनिष्ठा अगाध होती. यशवंतरावहि शेवटीं ईश्वरी इच्छेवर अवलंबून राहून निश्चिंत होतात. मी कितीदा तरी पाहिलें आहें की, जेव्हा केव्हा एखादा गुंतागुंतीचा अत्यंत पेचाचा प्रसंग उद्भवतो, काय करावें आणि काय करूं नये असें जेव्हा त्यांना होऊन जातें, तेव्हाते म्हणूं लागतात, "ठीक आहे, आता मला ईश्वर जें सुचवील अथवा जी प्रेरणा देईल तसा मी निर्णय घेईन."

"हातीचें सुकाणू सोडितां मी जाणें ।
होतोसी त्वरेनें तूं कर्णधार ।
व्हावयाचें कार्य सहज होईल ।
व्यर्थ ती जाईल धडपड ।।"

या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या वचनानुसार अडचणीच्या वेळीं, गोंधळलेल्या मन:स्थितींत, यशवंतराव आपल्या विचारांच्या नावेचें सुकाणू ईश्वराच्या स्वाधीन करतात आणि त्यांतून ते सुखरुपपणें पार पडतात.