• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - महाराष्ट्रांतील बुद्धिवाद 4

दोन उल्लेखनीन घटना

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, म्हणजे गेल्या बारा-चौदा वर्षांत तरी, महाराष्ट्रांत बुद्धिवादाचें पुनरुज्जीवन झाल्याचें दिसून येंते काय? दुर्दैवी घटना म्हणजे महात्माजींचा वध, त्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. त्यानंतर वड्याचें तेल वांग्यावर काढण्यासारखे जे प्रकार झाले, ते म्हणजे समुदायशक्तीचा भयानक आविष्कार होत. हा आविष्कार निषेधार्ह होता. त्याचा सार्वत्रिक निषेध झालाहि. परंतु याविषयीं कांही स्पष्ट बोललें पाहिजे. महाराष्ट्रांतील एका तरुणानें महात्माजींचा खू केला हा कांही योगायोग नाहीं. माथेफिरु सर्वत्र असतात. त्यांतलाच हा एक अशी उडवाउडवी करून उडवून लावण्यासारखा हा प्रकार नाहीं. शेक्सिपअर म्हणतो त्याप्रमाणे या वेडांतहि एक पद्धती आहे. यापेक्षा याविषयी अधिक न न बोलणे बरें. परंतु हें वेड आणि समुदायशक्तीचे वेडाचार यांचा क्रियाप्रतिक्रियारुप संबंध आहे ही गोष्ट नजरेआड करणें म्हणजे स्वत:ची स्वत: फसवणूक करून घेण्यासारखें आहे. विचारशक्तीला, विवेकबुद्धीला कौल लावण्याची वृत्ति नष्ट झाल्याचें हें लक्षण आहे. जर सुशिक्षितांमध्ये हें लक्षण दिसत असेल तर अशिक्षित समाजाला तरी दोष करा द्यावा. ?

संयुक्त महाराष्ट्राचें आंदोलन ही यानंतरची नमूद करण्यासारखी घटना. आतां महाराष्ट्र राज्य झाल्यानें आंदोलनाचा धुरळा खाली बसला आहे. किमान अल्पसंख्य विचारवंत तरी डोकें शांत ठेवून विचार करूं शकतील. या आंदोलनांत जें घडलें तें सारें महाराष्ट्र बुद्धिवादी असल्याचें लक्षण समजावें काय? मला तसें वाटत नाहीं. पाणी ढवळल्यानंतर तळाचा गाळा वरती यावा तशा सर्व अपप्रवृत्ती वरती आल्या. असहिष्णुतेने परिसीमा गांठली होती. ज्या 'द्रोहा' च्या कल्पनेचा मीं वर उल्लेख केला, त्याला आता महाराष्ट्रद्रोहाचें स्वरुप आलें होतें. या प्रकारांत विवेकाला कुठे स्थान होते ? आणि हें सारे महाराष्ट्रनिष्ठेने चालले होतें काय? नांव नको. प्रत्येक पक्षाला आपली पोळी भाजून घेण्याची नामी संधि प्राप्त झाली होती. ज्यांना राष्ट्रनिष्ठेचेंहि वावडें ते क्षणांत महाराष्ट्रनिष्ठ बनले. कशा साठी? तर मतासाठी ! लोकांच्या प्रामाणिक श्रद्धेचा आणि भावनेचा दुरुपयोग करून घेण्याचा एवढा प्रयोग महाराष्ट्राच्या इतिहासांत यापूर्वी कधी झाला नसेल. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर हें पितळ आतां उघडें पडलें आहे. लोकांना आतां स्पष्ट दिसलें कीं अखेर महाराष्ट्रनिष्ठा हें एक पांघरूण होतें. म्हणजे महाराष्ट्र बुद्धिवादी आहे या विधानाला अर्वाचीन इतिहासाचा पोषक आधार मिळत नाहीं. महाराष्ट्रांतील दिग्मजाप्रमाणें होऊन गेलेल्या त्या पिढीचा काळ सोडला कीं महाराष्ट्रांत वैचारिक अराजक निर्माण झाल्याचाच विदारक प्रत्य्य येतो.

ना. यशवंतरावांच्या यशाचें मर्म

या अजराकांतून सुराज्य निर्माण करणाच्या प्रयत्नांत ना. यशवंतराव चव्हाण यांना थोडेंबहुत यश लाभलें याबद्दल त्यांना धन्यवाद. आंदोलनांत त्यांची खरी कसोटी लागली. लोकमताच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याला विचाराचेंच बळ असावें लागतें. आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम श्रद्धा असल्याखेरीज हें बळ अंगी येत नाही. या दिव्यांतून पार पडल्यानंतर महाद्विभाषिकांच सत्तीचें वाण पत्करणें ही दुसरी कसोटी होती. त्या कसोटीलाहि ना. यशवंतराव उतरले. कारण महाद्विभाषिक राबवीत असतांना त्यांनी दोन गोष्टी केल्या. त्यामध्ये त्यांच्या अंगी असलेले विचारप्राधान्य आणि मुत्सद्देगिरी हे दोन गुण प्रकर्षाने प्रकट झाले. एक, लोकमताचें वास्तव स्वरुप त्यांनी कधीहि दृष्टीआड केलें नाही. त्याला तुच्छ लेखलें नाही किंवा त्याचे फाजील लाड केले नाहीत. लोकमत विरोधी आहे हें सत्य ओळखणें ही बुद्धिवादाची पहिली पायरी. पण तें विरोधी आहे म्हणून बदलून घेण्याची खटपट करावयाची नाही असा याचा अर्थ नाही. द्विभाषिक राबवणें याचा अर्थ लोकमत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणें असा होता. यापुढची पायरी म्हणजे असा प्रयत्न करुनहि लोकमत बदललें नाही तर आपला प्रयत्न अयशस्वी झाला अशी प्रांजल कबुली देणें. स्वपक्षांतील सर्वश्रेष्ठ नेत्यांना आपलें स्पष्ट मत सांगण्यालाहि तितकेंच धैर्य असावें लागतें.

ना. यशवंतरावांनी द्विभाषिकाचा कारभार पाहतांना दुसरी चांगली गोष्ट ही केली की, त्यांनी विरोधकांच्या विरोधाची नांगीच मोडून काढली. खरें सांगावयाचें तर लोकमत-लोकमत असा जो ओरडा केला जातो, तें वास्तविक असतें अल्पसंख्य ओरड्याचें मत (Noise-making minority ). या अल्पसंख्यांना आरडाओरड करण्यास संधि दिली नाही की 'लोकमता'चे वास्तव स्वरुप कळूं लागतें. आणि या कार्यात ना. यशवंतरावांच्या अंगच्या गुणाचा खरा आविष्कार दिसून आला. आंदोलनानंतर झालेल्या निवडणुकींत मिळालेल्या भरघोस यशाने विरोधकांच्या डोळ्यांवरहि यशाचा कैफ चढल्यासारखा झाला होता. ना. यशवंतराव झाले तरी मागच्याचीच री ओढणार आणि मग आपलें चांगलेच फावणार या अपेक्षेने विरोधक खुषींत होते. 'अक्रोद्येन जतेत्क्रोधं' ह्या बुद्धिवादाच्या नव्या शस्त्रांची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे रान उठविण्यास संधि सापडेना. दुसरें, द्विभाषिक राबवितांना महाराष्ट्रावर अन्याय होणार ही अपेक्षाहि त्यांनी सफल होऊं दिली नाही. कारण द्विभाषिक राबविण्याचें वचन दिलें याचा अर्थ द्विभाषिकांतील कांही विशिष्ट गटांना राजी राखण्याचे वचन दिलें असा कधीच नव्हता. जे दोन समाज एकत्र आले त्यांना धारवाडी काट्याने न्याय देणे हाच द्विभाषिक राबविण्याचा वास्तव अर्थ होता. विरोधक त्याविषयी अवास्तव अपेक्षा बाळगून त्या अर्थाचा अनर्थ करतां येईल की काय याची वाट पाहत होते. तशी संधि न देण्याच्या कार्मी ना. यशवंतरावांनी अभूतपूर्व यश मिळविले.

"Those who came to scoff have stayed to pray" अशी आजची स्थिती आहे. ना. यशवंतरावांनी घेतलेल्या ठाम बुद्धिवादी भूमिकेचा हा महान् विजय आहे. पण त्याचबरोबर तें एक सतीचें वाण आहे. महाराष्ट्र राज्य निर्माम करण्याचें कार्य तर मोठेंच. पण त्या महाराष्ट्राचा एकसंघ विकास करून राष्ट्रीय कोंदणांत त्याला योग्य स्थान प्राप्त करून देण्याचें कार्य त्याहिपेक्षा मोठें आहे. पूर्वीचे विरोधक आताचे भक्त बनले. फार चांगली गोष्ट झाली. पण हें यश जसें चमकणारे तसेंच डोळ्यांपुढे अंधार निर्माण करणारें असे असतें. ज्या धिम्मेपणाने त्यांनी पूर्वी पावलें टाकलीं, ज्या सौजन्याने त्यांनी विरोध शमविला आणि ज्या दृढबुद्धीने त्यांनी भावना विचाराच्या काबूंत राखल्या, त्या सर्व सद्गुणांची आता खरी कसोटी आहे. या सलग महाराष्ट्रांत भावनात्मक ऐक्य निर्माण करून आणि महाराष्ट्रांतील बुद्धिशक्ति विधायक कार्यास जुंपून, अखिल देशाच्या राजकीय जीवनांत महाराष्ट्र एक मान्यवर व मातबर घटक बनविण्याच्या कार्यात ना. यशवंतराव चव्हाण यांना यश लाभावें, अशी या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतों.