• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -स्वातंत्र्य साधनांत भारत महाराष्ट्र संबंध -2

फडके व चाफेकरबंधु यांची कृत्यें आकस्मिक उत्पाताप्रमाणे भासतात, म्हणून महाराष्ट्रांतील लोकजागृतीच्या उद्योगाचें शांत व्यापक स्वरुप निदर्शनास आणणें विषयाच्या स्पष्टीकरणार्थ अवश्य आहे. ह्या उद्योगाच्या इतिहासांत ज्या पुरुषापुढें देशांतील सर्व पुढारी मान झुकवितात तो महादेव गोविंद रानडे हा होय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी जी प्रमुख संस्था काँग्रेस तिची पायाभरणी करणारे रानडे होते याविषयीं दुमत नाहीं. त्यांचा संबंध आला नाहीं अशी त्यांच्या ह्यातींत महाराष्ट्रांत एकहि महत्त्वाची संस्था नव्हती. समाजाच्या उद्धाराची सर्व अंगे विकसित व्हावीं अशा विशाल दृष्टीने मरेपर्यंत त्यांचा उद्योग चाललेला होता. त्यांच्या पुढाकारानें पुण्याच्या सार्वजनिक सभेची कार्यक्षमता आणि मानमान्यता इतकी वाढली कीं सार्वजनिक सभेची उपेक्षा करणें सरकारालाहि जड जाऊं लागलें. या सभेमार्फत १९ व्या शतकाच्या शेवटच्या पंचविशींत दोन वेळां स्वदेशीचा पुरस्कार झाला. १८७१ मध्यें स्वदेशी व्यापाराविषयी स्वतंत्र व्याख्याने देऊन रानड्यांनी सार्वजनिक काकांसारख्या अनेकांना स्वदेशी व्रताचें आचरण करावयास लाविलें. हें वृत्त मुद्दाम येथे नमूद करण्याचें कारण एवढेंच कीं, १९०५ सालीं बंगालच्या फाळणीने माजविलेल्या शोभांतून उद्भवलेल्या स्वदेशीच्या माहात्म्यासमोर १९०५ सालापूर्वी अनेक वर्षे स्वदेशी व्रतांच्या लाभाची महाराष्ट्राला असलेली जाणीव डोळ्यांआड होऊं नये. येथेंच पुन: एकवार १८४८ तील लोकहितवादींच्या 'स्वदेशी' विषयक चर्चेंची आठवण द्यावीशी वाटते. रानड्यांना देखील तीस कोटी जनसंख्येचा भारत देश इंग्रजांच्या राज्याखालीं यावच्चंद्रदिवाकरौ राहील असें वाटत नव्हतें. तो स्वतंत्र झालाच पाहिजे अशी त्यांची खात्री होती. परंतु त्यांची स्वातंत्र्यासंबंधींचे विचार व्यक्त करण्याची पद्धत निराळी होती. महाराष्ट्राचा रानड्यांना उत्कट अभिमान होता व ज्या प्रदेशानें एकदा सा-या भारताला पारंतत्र्यांतून सुटण्याचा चमत्कार दाखविला, त्याच प्रदेशानें-अर्थात् महाराष्ट्रानें - इंग्रजी राज्याची पकड सैल करणा-या सर्व चळवळींच्या अग्रभागीं राहावें, अशी आकांक्षा ते खाजगी संवादांतून प्रगट करीत असल्याच्या अनेक विश्वसनीय आख्यायिका आहेत. यांतील कांही आख्यायिका आगरकर-टिळकांच्या शिक्षणक्षेत्रांतील कामगिरीच्या ऊहापोहांतील आहेत. पोटापुरतें वेतन घेऊन नव्या पिढीला शिक्षण देण्याचा जो संप्रदाय आगरकर-टिळकांनी उभारला त्याचें अनुकरण पंजाबांत शिक्षणसंस्था निर्माण करणारा-या आर्यसमाजाच्या लोकांनी केल्याची साक्ष उपलब्ध आहे. इंग्रजी अमदानींत महाराष्ट्रांतील कर्तव्य शक्तीची विविध प्रकारें जोपासना करून ती वाढीस लावण्याच्या प्रयत्नांत रानड्यांची थोरवी भरलेली आहे. त्या थोरवीचा थोडा तपशील येथे सांगितला, परंतु तेवढ्याने हा तपशील संपत नाही, तरीसुद्धा त्याच्या विस्तारांत न पडतां गोखले-टिळकांकडे वळणें बरें.

गोखल्यांनी कायदेमंडळांतील राजकारणाकडे आपलें सारें बुद्धिबळ केंद्रित केलें होतें. कायदेमंडळांतील प्रतिपक्षी अंमलदारांच्या प्रतिगामी धोरणांतील डावपेच उघडकीस आणून त्यांच्या युक्तिवादाचा कोंडमारा करण्याची गोखल्यांची हातोटी त्यांच्या ह्यातींल व त्यांच्या मागून कुणालाच साधली नाही. नामदार या शब्दाची यथार्थता एकागोखल्यांनीच पटविली. म. गांधींनी त्यांना गुरु मानलें, ही एकच गोष्ट गोखल्यांची महती पटविण्याला पुरेशी आहे.

टिळकांनी जनतेच्या आकांक्षांना वाचा फोडून जनतेच्या जागृतीचा वेग वाढविला. त्यांच्या चरित्रांतील अपूर्वता तुरुंगवासांत आहे. त्यांच्या आधीं राजद्रोहाच्या खटल्यांत बंगाली वृत्तपत्रकारांनी तडजोड स्वीकारून तुरुंग टाळल्याचें उदाहरण आहे. टिळकांनी तडजोडीचा म्हणजे दिलगिरी प्रदर्शित करण्याचा मार्ग चोकाळण्याला नकार दिला, आणि आनंदाने तुरुंगवास पत्करला. कारावासाचें भय टिळकांनी घालविलें, त्या योगाने त्यासंबंधांतला अग्रमान महाराष्ट्राने आपलासा केला.

प्रस्तुत विवेचन विषयांचें 'नांव' स्वातंत्र्यसाधनांत भारत-महाराष्ट्राचे संबंध' असें आहे. स्वातंत्र्यसिद्ध्यर्थ जेवढ्या घडामोडी मागील सव्वाशे वर्षांत देशामध्ये घडल्या त्यांत महाराष्ट्र इतर देशांच्या मागे तर नाहीच पण अघाडीवर होता, तो बोध होण्याइतकी माहिती येथे सादर केली आहे. सारांशाने असें म्हणतां येईल की, भारताच्या इतर प्रदेशांनी महाराष्ट्राकडे अनेक बाबतींत गुरुत्वाच्या नात्याने पाहावें, अशी त्याची योग्यता आहे. महाराष्ट्राला इतर प्रदेशांनी गुरु समजावें असा निष्कर्ष मांडला, तो दुरभिमानाचें पोषण करण्यासाठीं मांडलेला नाही. दुरभिमान व त्याच्यापायी इतरांची मानखंडना करण्याची वृत्ति इतकी स्वभावसिद्ध आहे की तिच्यासाठी इतिहासाचा आधार घेण्याची गरज नाही. हें गुरुत्व कायम राखायचें असेल तर ज्यांनी या श्रेष्ठ स्थानाचा वारसा महाराष्ट्राला दिला त्यांच्या अतृप्त आकांक्षा तृप्त करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने अंगावर घेऊन इतर प्रदेशांना आदर्श व्हावे; हेंच त्याचें एकमेव अपरिहार्य कर्तव्य आहे. गुरुत्वाच्या पदवीवर चढलेल्या पूर्वजांनी कुणाचा द्रोह केला नाही, कुणाचा मत्सर बाळगला नाही, कुणाच्या प्रगतीला आडकाठी केली नाही. स्वराज्यापूर्वीचा काळ जागृति, संघटना आणि स्वराज्यप्राप्तीची चळवळ यांच्यांत सारी शक्ति वेचण्याचा होता. आता महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण उत्कर्ष होण्यासाठी बुद्धीचें व शरिराचें बळ खर्ची घालण्याचा काळ आलेला आहे. म्हणून पूर्वजांच्या निर्दोष अभिमानाने पुढची वाटचाल महाराष्ट्राने शेवटास न्यावी. ही वाटचाल स्वतंत्र महाराष्ट्र झालें म्हणून सोपी आहे, अशा भ्रमांत  न पडण्याची काळजी घ्यावी. अद्यापि महाराष्ट्रीय समाजांत भावभावनांचा एकजिनसीपणा उत्पन्न झालेला नाही. तो होण्याकरिता समाजाच्या सर्व थरांना व घटकांना स्वार्थत्यागाच्या क्लेशमय दिव्यांतून जावें लागेल व अशा दिव्याच्या यातनांतून कार्यक्षमतेने बाहेर पडण्याचा रगेल कस महाराष्ट्रीयांत भरपूर आहे हें ध्यानांत येण्यासाठी महाराष्ट्राच्या गुरुत्वाची कथा जिज्ञासूंपुढे थोडक्यांत ठेवली आहे.