यशवंतरावांच्या नंतर दादासाहेब अन्वीकरांनी माझ्या ‘ऊसमळ्याच्या गर्दीत’ या कवितेच्या ओळी व संदर्भ सांगितला.
‘वसंतराव, तुम्ही पोटतिडकीनं शेतीवर राखण करता व तासभर बोलता तेच हा कवी दोन कवितांमधून प्रभावी मांडतो. बघा, कसा चांगला शेतक-यांचा मुलगा शोधून काढलाय् मी!”
‘यशवंतराव, हा तुमचा मुलगा असेल, पण माझा जावई आहे. असल्यानं तुमच्यापेक्षा माझ्यावर त्याचं जास्त प्रेम राहील.’
‘मी काही नवीन सांगितलं म्हणजे तुमचं ते पूर्वपरिचयाचंच कसं असतं, वसंतराव?’ यशवंतरावांचा प्रश्न.
माझ्या धाकट्या भावाचा विवाह त्याच वर्षी झालेला होता. त्याला वसंतराव नाईकांच्या मतदारसंघातली बेलोरा गावची मुलगी केलेली असल्यानं नाईकसाहेब गमतीनं तसं म्हणाले होते. वसंतराव नाईक, वसंतदादा सगळ्यांनी मला सांगितलं, मुंबईत विमानात बसल्यापासून इथपर्यंत तुमच्या कविता, कादंबरी इतर माहिती ह्याशिवाय दुसरं यशवंतराव बोलले नाहीत. फार आपुलकीनं सगळं सांगत होते. इतर मत्री व जिल्ह्यातले पुढारी सांगू लागले की यशवंतरावांचा निरोप होता, कोणी मोठा कवी असा तिकडे आहे त्याला भेटीला घेऊन या आम्ही खूप फिरलो पण कोणी मोठा कवी भेटला नाही. तुम्हांला ओळखतो, पण तुम्हांला यशवंतराव बोलावतील असं वाटलं नव्हतं.
मग माझ्या लक्षात आलं. आठवड्यापूर्वी पळसखेडला मला दोघं-तिघं येऊन भेटले होते. ‘तूसुद्धा थोडीफार कविता लिहितोसच. तुला ठाऊक असेल-कोणीतरी मोठा कवी या भागात आहे म्हणे. त्याची यशवंतरावांशी भेट घालून द्यायची आहे. तुला माहीत असेल तर सांग.’ अशी माझ्याकडेच विचारपूस करीत होते.
हे सगळं ऐकून दादासाहेब अन्वीकर व यशवंतराव खूप हसले व व्यथित झाले. त्यांचा बिचा-यांचा काही दोष नाही असं म्हणून गप्प बसले.
इचलकरंजीनंतर तीन आठवड्यांनी यशवंतरावांच्या ह्या भेटीनं-विशेषत: सगळ्यांसमोर त्यांनी कविता वाचल्या. माझी माहिती दिली, खूप आत्मीयता दाखविली, साहित्यावर चर्चा केली यानं मी भारावून गेलो होतो.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इकडच्या भागातल्या पुढा-यांना, ओळख होणं जरूरी होतं. त्यानंतर सर्व वृत्तपत्रांतून ह्या घटनेच्या निमित्तानं खूप लिहून आलं. चर्चा झाली. यशवंतरावांना एक रसिक-साहित्यिक अशा रूपानं आमच्याकडील लोक आता ओळखू लागले. त्याआधी यशवंतरावांचा कवितेशी संबंध कसा काय येईल? कारण काय? असं बोलणारेही काही महाभाग आम्ही पाहिलेले होते. आठवण आली म्हणजे आता मी त्यांना मोकळेपणी दिल्लीला पत्र पाठवू लागलो. त्यांचीही पत्रं येऊ लागली.