यशवंतराव म्हणाले, मलाही तसं वाटतं, पण लिहिणं फार कठीण आहे. पट फार मोठा आहे. महत्त्वाच्या घटनांनासुद्धा न्याय देणं कठीण वाटतं. त्यापेक्षाही अवघड म्हणजे लिहिण्याची पद्धतच मला अजून सापडत नाही.
नेमाडे म्हणाला, ते काहीच कठीण नाही. ह्या ह्या पद्धतीनं लिहिणं सोपं. त्यापूर्वी अशी अशी काळजी घ्यावी लागेल. वर्षभरात टिपणं, कालक्रम व मुख्य घटनांचा आलेख नीट झाला तरच नंतर दोन-तीन वर्षांत दोन भागांत आत्मचरित्र व्यवस्थित होऊ शकतं. आता पुन्हा तेच ते राजकारण नको. कुठे मोठी जागा दिली तरी घेऊ नका. स्वीकारूच नका. तुम्ही लिहिणं हे त्यापेक्षा फार फार मह्त्त्वाचं आज तरी आहे.
यशवंतरावांनी राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्यपूर्व इतिहास, साहित्य-कला, देश-परदेस ह्या सगळ्यांची बांधणी करण्याचं सूत्र सांगितलं. तशी मांडणी करून दाखविली.
नेमाडेंचं म्हणणं असं की हे सगळं डोक्यातून काढून टाकावं. सगळंच येणं शक्य नाही. म्हणून लहानपण, देवराष्ट्र, क-हाड असंच सरळ सुरू करावं. पुढे आपोआप सुचत जाईल तसं लिहावं. पण ताबडतोबीनं टिपणं व आराखडा तुमच्या तुम्ही तयार करा. पुन्हा सहा महिन्यांनी आपण एकत्र बसू. पण हे तुम्ही लवकर मनावर घ्यावं व सुरू करावं. ‘कृष्णा काठ’, ‘सागर काठ’, ‘यमुना काठ’ अशा तीन भागांत लीहून होणा-या त्यांच्या आत्मचरित्राची अशी पक्की मुहूर्तमेढ औरंगाबादेला नेमाडेच्या भेटीत झाली होती. इतरही खूप लोकांचा तसा आग्रह होताच.
कोसला व कादंबरी चतुष्ट्य वाचून नेमाडे या लेखकावर यशवंतरावांनी प्रेम केलं. कधी भेटी नाहीत. नेमाडे यांच्या समीक्षेच्या बंडखोर लेखांमुळेही त्यांना आकर्षण होतं. ‘लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ व भाषा व शैलीच्या संबंधी लिहिलेले एक-दोन लेख, त्यातला स्पष्टपणा, रोखठोक मतं, भाषेतलं देशीपण व खेड्यातल्या संस्कारांचा, गावपणाचा उमटत राहिलेलाल लेखनातला चेहरा यशवंतरावांना महत्त्वाचा वाटत होता. वेळोवेळी नियतकालिकं, अनियतकालिकं व नेमाडेंची पुस्तकं मी व इतरांनी यशवंतरावांना दिलेली होती. काही त्यांनी अगोदरच वाचलेली होती. खेड्यातल्या संस्कृतीत देशीपणा घेऊन आलेले व जनत करीत राहिलेले यशवंतराव नेमाडेसारख्या माणसांना आपले वाटले व त्यांची मैत्री पत्रानं, भेटीनं कायम राहिली. परंपरा व नवता या दोघांतलं चांगलं घेऊन चालणारे यशवंतराव अशी माणसं भेटली म्हणजे खूप प्रसन्न असायचे. असे त्यांचे मित्र कोणत्याही क्षेत्रातले असोत, वयाचं अंतर कितीही असो, त्यांच्याशी ते बरोबरीच्या नात्यानं वागत व मन खूप मोकळं करून बोलत.
१९८४ दिलीप पुरूषोत्तम चित्रे त्या वेळी ‘भारत भवन’ च्या वागर्थ’ चा संचालक झाला होता. भारत भवन व भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या वतीने दिल्लीला जागतिक कविसंमेलन आयोजित केलं होतं. बेचाळीस देशातले नामवंत कवी आलेले होते. भारतातल्या कवींची त्यासाठी निवड केलेली होती. मराठीतले अरूण कोलटकर, चंद्रकांत पाटील, नामदेव ढसाळ व मी असे चारच कवी निमंत्रित होते. त्यातही अरूण व चंद्रकांत काहीतरी अचानक उद्भवल्यानं आलेच नाहीत. मी व नामदेव अशा दोन नामदेवांनीच तिथे उपस्थिती लावली. (पंजाबापर्यंत जाऊन आलेल्या संत नामदेवाचीही त्या वेळी मला फारच आठवण येत होती!)
यशवंतरावांनी सांगितलं. माझी स्वत:ची इच्छा आहे, आणि दिल्लीतल्या मराठी लोकांची सर्वांचीच खूप इच्छा आहे म्हणून त्याचं खाजगी स्वतंत्र काव्यवाचन ठेवावं. तशी आखणी तुम्ही करा. इथे माझ्याकडे कार्यक्रम ठेवावा. मी सगळी व्यवस्था आनंदानं करीन. तसं कळवा.