त्याच्या ह्या सगळ्या वागणुकीनं आम्ही सगळे करपून चाललो आहोत. फारच बेअब्रू होते आहे. हा कायमचा बिघडला व दुसराही त्याच वाटेनं किंवा आणखी वेगळ्या वाममार्गानं गेला तर कुणाकुणाला सावरू? आणखी एक भाऊ त्याच्या चुकीच्या मतांवर चालत असतो. त्याला समजत नाही, आकलन नाही, हे कितीदा व कसं सांगावं? त्याला ते अपमानास्पद वाटतं. पण पुन्हा शेती व संसार ओस पडणार व मलाच सगळे दोष देणार. मला सोसायला माणूस म्हणून मर्यादा आहे. तुम्हीसुद्धा काहीच मला मदत करू शकणार नाहीत इतके माझे प्रश्न चक्रम करणारे आहेत. कुणालाच काही गांभीर्य नाही. घरी हे सगळं असताना मुंबईत मी काय करू? माझा थोडासुद्धा दोष नाही. मी जन्मभर असाच ह्यांच्या गुंतागुंतीत किती काळ राहणार? त्यांना आता समज आली. उभं करून दिलं. जबाबदारी स्वीकारली पाहिजे ती नीट स्वीकारता तर नाहीतच पण रोज मला पैसा मागतात व हे असलं नामुष्कीचं समोर आणतात. मी मनानं फार अस्वस्थ आहे. तुम्हांला काय, कुणालाच मला आहे हे सांगायचं नाही. तो मला माझा मूर्खपणा वाटतो. त्यांची समज वाढत नाही व मला ते समजून घेत नाहीत हे दुर्दैव आहे. संसार कुटुंब असं विस्कळीत झाल्यावर, पैसा नसल्यावर कोणी कुत्रंसुद्धा विचारणार नाही. कर्ता पुरूष म्हणून दोष तेवढा सर्व करूनही माझ्याच वाट्याला येणार. मला काहीच सुचत नाहीय्...”
यशवंतरावांनी दीर्घ सुस्कारा सोडला. वेणूताई शब्दही बोलल्या नाहीत. “नामदेवराव, तुम्ही आत्ता इथेच बाजूच्या खोलीत झोपा. आपण सकाळी भेटू” – यशवंतराव.
आता मलाही या गोष्टी बाहेर सांगणं विशेषत: यशवंतरावांच्या सारख्यांना सांगणं चुकीचं वाटत होतं. जवळपास नंतर चुकूनही असा विषय मी काढला नाही. त्यावर कुठे भाष्य केलं नाही. घरच्या या लोकांचेही लाड फार चालले आहेत. त्यांच्यासाठी आपण उगाच अधिक करतो व ते उलट बेजबाबदार होताहेत दिवसेंदिवस. हे बरोबर नव्हतं. यशवंतराव, शरदराव यांनी आमच्यासाठी किती करावं? प्रत्येक संकटात ते उभे आहेत पण साहित्याची, लिखाणाची, सभागृहातल्या कामकाजाची, बाहेरच्या समाजात त्यांच्यासाठी व समाजासाठी फिरून आमदार म्हणून विशेष काही करण्याची जबाबदारी माझी आहे किंवा नाही- घरच्या सगळ्यांना याची बिल्कुल जाणीव नव्हती. आता मी बाहेर वेळ द्यावा, त्यांनी घरचं शेतीचं नीट पाहावं, त्यातली सगळी काही जाबाबदारी स्वीकारावी असं बिल्कुल कुणाला वाटत नव्हतं. उलट ते फार निष्काळजीपणे माझ्यावरच अवलंबून राहू लागले हे एकार्थी फारच निष्क्रियतेचं लक्षण होतं. पण फार बोलता येत नाही. असं कौटुंबिक दुखणं मी उगाच घेऊन बसलो व सातत्यानं यशवंतरावांसारख्या माणसांजवळ नको ते प्रश्न अधिक सांगत गेलो. जाणीवपूर्वक यात दुरूस्ती करायचा मी प्रयत्न केला. यशवंतराव या प्रश्नांवर खिन्न होऊन काहीच बोलले नाहीत. हे अगदीच बरोबर होतं. त्यांच्या घरी मला रात्रभर झोप आली नाही. त्यांनी सुखाच्या गोष्टीसाठी नव्या घरी विरंगुळा म्हणून प्रेमानं बोलविलं होतं.
यशवंतराव दिल्लीच्या राजकारणानं त्रस्त होते. फारच दु:खी होते. सकाळी भेटायला आलेल्या नेतमंडळींच्या संवादांतून ते स्पष्ट होत होतं. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती यशवंतरावांच्या खूपच विरोधात गेली होती. शरदराव हे पुलोदचे मुख्यमंत्री. यशवंतरावांच्याच आशीर्वादानं झालेले आहेत असं आता जाहीरपणानं सभांमधून लोक बोलत व त्यांच्यावर तीव्र टीका करीत होते. वसंतदादा, मधुकरराव चौधरी, यशवंतराव मोहिते आणि कित्येक बडी मंडळी राजरोस यशवतंरावांसाठी व्यूहरचना करीत. शरदरावांसाठीही करीत. यशवंतरावांच्या क-हाडच्या दुस-या दिवसाच्या सातारा जिल्ह्याच्या कार्यक्रमांमध्ये, सामान्य माणासांमध्ये दुसरा विषय नव्हता. समर्थक व विरोधक असा जोराचा खेळ महाराष्ट्रात व दिल्लीत चाललेला होता. यशवंतराव कार्यक्रमांमध्ये फारच मलूल दिसले. भाषणांमधूनही त्यांचा तुटकपणा जाणवत होता. राजकारणावर त्यांना मर्यादित बोलायचं होतं व माझ्यासारख्या राजकारणाशिवायच्या कोणाशी तरी ते विसरण्यासाठी अधिक जवळ यायंच होते, असं मला जाणवलं.