मध्यंतरीच्या काळातली माझी उदासीनता, कौटुंबिक, आर्थिक अडचणी, गावातला व पुढा-यांचा धाकदडपशा व त्यामुळे मी काहीच न लिहिणं हे सगळं यशवंतरावांना बोचत होतं. यशवंतरावांनी शरदराव यांना सांगून, चर्चा करून, एका नव्या जगाच्या दालनात, राज्याच्या राजधानीत मला साहित्यिक कलावंताचा प्रतिनिधी म्हणून पाठवून दिलं गेलं असावं असा माझा अंदाज होता. साहित्यिकांचं व शेतक-यांचं प्रतिनिधित्व मीही तितक्याच विश्वासानं चांगल्या पद्धतीनं मांडण्याचं ठरविलं. मुंबईला माझं जाणं वाढलं.
‘रिव्हिएरा’ ह्या समुद्रकिना-याच्या त्यांच्या बंगल्यावर यशवंतराव आलेले होते. मुंबईत मी होतो. त्यांना भेटायला गेलो. त्यांनी बराच वेळ थांबवून घेतलं.
विधिमंडळाच्या कामकाजाच्या संबंधी मला काही सांगितलं. चांगली पुस्तकं स्वस्त किमतीत साहित्य, अकादमी व नॅशनल बुक ट्रस्टच्या धर्तीवर मराठीत आणावी. ग्रंथालय, साहित्य, कला, मराठी चित्रपट, नाटक अशा काही विषयांवर स्वतंत्रपणानं विधान परिषदेत जादा चर्चेसाठी वेळ द्यावा. प्रश्न मांडताना अभ्यासपूर्ण, माहिती मिळवून व आकडेवारीनं बोलावं. बारक्यासारक्या प्रत्येक प्रश्नात बोलण्याचं काही कारण नाही. शेतीचे व पाण्याचे प्रश्न, ग्रामीण जीवनाच्या विकासाचे प्रश्न, रोजगार हमी व त्याला जोडून कितीतरी प्रश्न तुमच्या जिव्हाळ्याचे व माहितीचे आहेत. म्हणून तुम्ही अग्रक्रमानं त्यात भाग घेतला पाहिजे. तेसुद्धा प्रस्ताव व दीर्घ चर्चा करूनच मांडावेत. शासन तुमच्यासारख्यांची निश्चितच दखल घेईल. त्यामुळे शासनाला चांगले निर्णय घेताना तुमचा उपयोग होईल. त्यासाठी पाहिजे ती मदत शरदराव व बाकीची मंडळी करतील. विधान परिषदेत ना. ग. नांदे आहेत. त्यांच्याशी मी तुमच्या संबंधात बोललेलो आहे. ते तुम्हांला मदत करतील. सभागृहात उत्तम वक्तृत्वापेक्षा महत्त्वाचे मुद्दे, आकडेवारी व चोख माहिती ह्या गोष्टींची अधिक गरज असते. शहरी प्रश्नांवर तुम्ही फार बोललं नाही तरी चालेल. पहिला पाठ सहज भेटीत त्यांनी दिला. मी तो गिरवला.
आमदार झाल्यावर नागपुरच्या पहिल्याच अधिवेशनात मी साहित्य-संस्कृती मंडळाच्या कामकाजासंबंधी सविस्तर बोललो. साहित्य संस्कृती मंडळाचा वाढलेला व्याप व नवीन खूप योजना स्वीकारल्यानं आदरणीय श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी हे मुरब्बी, जाणते, अभ्यासू अध्यक्ष असूनही कमी काळात सगळ्यांना न्याय देता येणार नाही. म्हणून संशोधन संपादन वेगळं करून नवोदितांच्या योजना व साहित्याबाबत काही नवे निर्णय वेगळ्या दालनात घ्यावेत. म्हणजेच साहित्य-संस्कृती मंडळाचं विभाजन दोन भागांत करावं असं माझं साधं म्हणणं होतं. ‘नाव नवोदितला व तेहतीस खिरापतीला’ अशा मथळ्याखाली माझं विधिमंडळातलं कामकाज महाराष्ट्र टाइम्समधून छापूनही आलं होतं. यशवंतरावांनी ज्या कारणांसाठी ह्या संस्थेची उभारणी केली. शास्त्रीजींसारखा गाढ्या अभ्यासकांच्या हाती देऊन भरीव कार्य केलं त्यासंबंधी मी उलट कसं बोलीन. पण माझ्यासंबंधी लगेच सर्वत्र गैरसमज पसरविले गेले. मुख्यमंत्री श्री. शरदराव व राज्यमंत्री भाई वैद्य यांनी शेवटी साहित्य-संस्कृती मंडळाच्या विभाजनाचा निर्णय माझ्या चर्चेनंतर व सभापती श्री. रा. सु. गवई यांच्या आग्रही निर्णयानंतर मान्य केला. माझ्या ह्या पहिल्याच महत्त्वाच्या कामकाजाची नोंद सगळ्यांनी घेतली व मला हुरूप आला.
मी नंतर यशवंतरावांना भेटलो तेव्हा शास्त्रीजीसंबंधी माझ्या इतक्याच आदरानं ते बोलले. माझं कामकाज अतिशय योग्य झालेलं आहे. आता दुप्पट वेगानं या दोन व्यवस्था काम करतील व साहित्याच्या थोड्या साचल्या कामकाजाला वेग येईल, असं यशवंतराव बोलल्यावर मला धीर आला. त्यापूर्वी तू आता यशवंतराव व शरदराव यांच्या नजरेतून उतरणार. शास्त्रीजी व साहित्य-संस्कृती मंडळ यांच्या विभाजनाचं तू बोलणं व लिहिणं योग्य नव्हतं, असं अनेकांनी मला सांगून भंडावून सोडलं होतं.