कायद्याचे त्या वेळचे विधी न्यायमंत्री हरीभाऊ पाटसकर यांच्या विरोधात ते उभे होते. समाजवादी पक्षाचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हे दोन्ही उमेदवार मुख्यत: शेंदूर्णी परिसरात सगळी व्यूहरचना करीत असायचे. त्यावेळी मी आठवी-नववीत होतो. मी या समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करीत होतो. त्यांची सभासम्मेलनं, सभेचं प्रास्ताविक, जेवणखाण असं सगळं मी मनापासून करीत होतो. माझ्याही अंगात कळत-नकळत तो संचार होत गेला. त्या दोन – पाच वर्षांच्या काळात नानासाहेब गोरे, एसेम जोशी, बॅ. नाथ पै, आचार्य अत्रे, बापूसाहेब काळदाते, शाहीर अमर शेख अशा कितीतरी थोर माणसांनी शेंदुर्णीला काबीज केलेलं होतं. खूप लोकप्रियता मिळविली होती. मी या सगळ्या लोकांमध्ये वावरत होतो. त्यांच्या भेटीगाठी व विचारांचे माझ्यावर त्या वेळी खोल परिणाम झाले. चांगले वाचन व साहित्य-कला मला जवळचं होती. त्याच वेळी या लोकांच्या भेटीगाठींच्या परिणामामुळे समाजकारण, राजकारण थोडं-बहुत आपलं वाटायला लागलं. लहान वयात मर्यादित स्वरूपात का होईना त्यात मी अडकलो. काँग्रेसची परिस्थिती त्या वेळी जवळपास सर्वदूर विदीर्ण झालेली होती. सर्वत्र स्पष्टपणानं काँग्रेसचे उमेदवार पडणार ह्याचं चित्र सगळ्यांसमोर दिसायचं. मोठमोठ्या सभा घेऊन देशातल्या ज्येष्ठ माणसांनी लहान-लहान खेड्यांमध्येसुद्धा भाषणांसाठी आणलं जात होतं. सर्वत्र रणधुमाळीचं वातावरण होतं. पळसखेड ह्या माझ्या खेड्याजवळ एका किलोमीटर अंतरावर जळगाव-औरंगाबादच्या सरहद्दीवर वाकोद नावाचं खेडं आहे. पळसखेड व वाकोद तसं एकच झाल्यासारखं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या कठीण निवडणुक- काळात वाकोद ह्या खेडेगावी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांची सभा आयोजित केली गेली होती. म्हणजे जवळपास माझ्याच खेड्यात पंतप्रधान नेहरू येणार व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार म्हणून खूपच धमाल उडालेली होती. लोकांना खूप आनंद झालेला होता. या दोन्ही मोठ्या नेत्यांचं खूप आकर्षण लोकांमध्ये होतं. लहान मुलं, म्हातारे, बायाबापड्या, राजकारणी, सामान्य शेतकरी उत्स्फूर्तपणानं पायी, बैलगाड्यांवर जसं जमेल तसं आले. कित्येक मैलांवरून भाकरी बांधून घेऊन आले. दीड-दोन लाख लोकांची झुंबड वाकोदच्या सभेला त्या वेळी आश्चर्यचकित करणारी वाटायची. आम्ही शाळेतली नववी-दहावीतली मुलं सकाळीच झोपडीत येऊन सभेच्या अगदी समोर जागा घेऊन बसलो होतो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी व्यासपीठावर चढण्यापूर्वी एका चिमुरड्या मुलीला गुलाबाचं फूल देऊन तिचा पापा घेऊन सर्वांना नमस्कार केला. मुख्यमंत्री यशवंतराव व पंतप्रधान नेहरू व्यासपीठावर चढताच त्यांनी प्रचंड टाळ्यांचा व घोषणांचा स्वीकार केला. पंतप्रधान नेहरू छानपैकी सोप्या हिदींत बोलले. यशवंतरावांनी मराठीत भाषण केलं. सुंदर, सोपी मराठी, बोलीभाषेचे, लोकसाहित्याचे संस्कार व सौंदर्य असलेली कमावलेली भाषा, खेड्यातल्या जीवनातले सुखदु:खांचे आधार घेऊन त्यांच्या प्रश्नांना व शेतक-यांच्या काळजाला हात घालणारं असं यशवंतराव बोलले. लहान-लहान वाक्यं. सुंदर सोपी मराठी. कुठेही अलंकरण नाही. पण ज्या प्रश्नांना घेऊन ते लोकांच्या मनात शिरले त्या त्यांच्या भावनाशील संपन्न भाषणानं दीड-दोन लाख लोक अक्षरश: भारावून गेले. कुणावरही कुणावरही व्यक्तिगत टीका न करता, न रागावता, न चिड-चिड करता शांतपणानं त्या वेळच्या विपरीत सभासंमेलनामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ विरोधी नेत्यांच्या विचारांची दखल घेऊन त्यांची सुंदर चिरफाड यशवंतरावांनी केली. आपले विचार पुन्हा पुन्हा ठामपणानं मांडले व सभा जिंकली. समोरची आम्ही पक्की समाजवादी प्रचारक मुलं, पण पार गडबडून गेलो होतो. अर्धेअधिक ढिले झालो होतो. यशवंतरावासंबंधी खूप ऐकलेलं होतं. आकर्षण होतं. त्यांना पाहण्याची इच्छा होती. ऐकायची इच्छा होती. त्याप्रमाणे वाकोदच्या सभेमुळे झालं. त्या दिवसापासून हळूहळू यशवंतरावांच्या विचारांच्या ऋणानुबंधात गुंतून पडलो. १९५७ ते थेट डिसेंबर १९७४ पर्यंत मात्र पुन्हा कधीच भेट झाली नाही. काही संबंधच आला नाही. काही कारणसुद्धा नव्हतं. यशवंतरावांजवळ जाता आलं नाही.
१९६० साली जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा या गावी कृषी खात्यानं फार मोठं राज्यव्यापी प्रदर्शन भरवलेलं होतं. फार मेहनत घेतली होती. त्याला जोडून शेतकरी मेळावा होता. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार असल्यानं व शेतकरी मेळावा असल्यानं आम्ही खूप शेतकरी तिथे गेलो. शेतीचं नवीन तंत्रज्ञान, शास्त्रीय ज्ञानाची प्रत्यक्ष शेतीतल्या प्रयोगांमधील गरज व परिवर्तनामुळे येणारी शेतीमधील आर्थिक सुबत्ता असा मुख्य विषय घेऊन परंपरागत शेतीच्या कल्पना दूर सारण्याचं आवाहन यशवंतरावांनी केलं. ते एका जातिवंत शेतक-यांच भाषण आहे असं आम्हांला वाटलं. परंपरागत शेतीतला चांगला भाग घेऊन नवनवीन जगभरच्या शेतीच्या प्रयोगांची जोड त्याला दिली तर खेड्यांचा व शेतक-यांचा चेहरा बदलेल. त्यासाठी कृषी विद्यापीठांची स्थापना व त्या नव्या प्रयोगाचं ज्ञान शेतक-यांच्या मुलांपर्यंत जावं म्हणून धडपड चाललेली आहे. त्यात नव्या विचारांनी सहभागी व्हावं व शासनालाही मार्गदर्शन करावं असं प्रगत शेतक-यांना व शास्त्रज्ञांना त्यांनी आवाहन केलं. सत्तर टक्के शेतकरी समाजाची आर्थिक स्थिती वाईट आहे, त्यात सुधारणा घडवून आणली तर राज्य करण्यात अर्थ आहे असं प्रामाणिकपणानं सांगून चार कृषी विद्यापीठांच्या मांडणीची पुढे विभागश: सुरूवात करण्याचं सूतोवाच त्यांनी केलं.