यशवंतरावांमधल्या काम करणा-या मंत्र्यापेक्षाही माणूस म्हणून जी वागणूक त्यांनी दिली, स्वातंत्र्यलढ्यातल्या माणसांसंबंधी, त्या काळातल्या आठवणी व इतिहासासंबंधी जो कळवळा व प्रेम भेटीत व्यक्त केलं, त्याचं मोल किती मोठं असं सांगत हरीभाऊ नंतर सर्वत्र बोलत राहिले. हरीभाऊंच्या शेवटच्या कंटाळवाण्या प्रयत्नात जर यशवंतराव आले नसते तर नव्वदाव्या वर्षांजवळ आज सुखानं हरीभाऊ जगू शकत नव्हते. जगूच शकत नव्हते. तहह्यात पेन्शन देऊन आर्थिक तरतूद केली गेली. ताम्रपट व सन्मान देऊ हरीभाऊंच्या निमित्तानं स्वातंत्र्यलढ्यावरच प्रेमच व्यक्त केलं.
१९७५. आणीबाणीचे दिवस होते. खेड्यांत, शहरांत सर्वत्र निराशा होती. लेखन-स्वातंत्र्याच्या बंदीमुळे सर्व बुद्धिवादी मंडळी प्रचंड विरोधात होती. इचलकरंजीच्या साहित्य सफलतेनंतर लगेच वर्षभरात क-हाड ह्या आमच्या गावी यशवंतरावांनी साहित्य संमेलन घेतलं. श्रीमती दुर्गा भागवत ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. यशवंतरावांच्या अत्यंत कसोटीचा क्षण होता. यशवतंराव स्वत: स्वागताध्यक्ष होते. शेतीमधल्या माझ्या खूप अडचणी त्या वेळी होत्या. मी संमेलनास जाणार नव्हतो. एवढ्या धाकधकीत, घाईत १६ सप्टेंबर १९७५ ला त्यांचं पत्र आलं:
“तुमच्या शेतावर येण्याच्या निमंत्रणाचे आकर्षण आहे. कधी वेळ येईल त्याची वाट पहात आहे. परंतु तत्पूर्वी डिसेंबरमध्ये कराडला होणा-या मराठी साहित्य संमेलनासाठी न चुकता येण्याबाबतचे निमंत्रण मी तुम्हांला देऊन ठेवत आहे. या संमेलनाचा स्वागताध्यक्ष राहून तुम्हां लोकांचे स्वागत करण्याचा माझ्या मित्रांकडून मला आदेश आहे. अर्थात स्वागताध्यक्ष नसतो तरी तुम्हां सर्वांचे कराडला स्वागत करण्यासाठी मुद्दाम हजर झालो असतो. अधून – मधून लिहीत जा.
कळावे”
मला खूप आनंद झाला व शेतीतलं खूपच काही गुंतागुंतीचं असलं तरी ते सोडून क-हाडला जायचं मी निश्चित केलं.
आणीबाणीतले ताणतणाव, निषेधाच्या भाषणांचा आगडोंब इत्यादी सर्व काही पचवून शांतपणानं यशवंतरावांनी क-हाडचं संमेलन खूप यशस्वीपणानं पार पाडलं. कसं ते त्यांनाच ठाऊक! उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सगळं हळुवार, शांतपणानं हाताळून रात्रीच्या साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांच्या आजी-माजी संमेलनाध्यक्षांच्या जेवणाच्या वेळी यशवंतराव व वेणूताई खूप-खूप आतिथख्यशील होत्या. अगदी घरातल्यासारखं आदरातिथ्य व व्यक्तिगत विचारपूस, काळजी घेणं चाललेलं होतं. गप्पा, जेवणावेळीचं खूप मनमोकळं वातावरण होतं. संमेलन उधळलं जाईल असं सर्वत्र बोललं जात होतं. ते संपूर्ण खोटं ठरलं. निव्वळ साहित्य व साहित्यिकांच्या गणगोतात यशवंतराव संपूर्ण साहित्यमय झालेले होते. कुणाविषयी राग नाही. संताप नाही. उलट ते सगळे साहित्यिक लोक रात्री एका उभारलेल्या तंबूत गप्पांमध्ये मनमुराद सामील झालेले होते.
जेवताना मी व नरहर कुरूंदकर जवळ बसलेलो होतो. यशवंतराव व वेणूताई आमच्याजवळ वाढायला आले. “वेणूताई, महानोर ह्यांना पुरणपोळी व भाजीपाला द्या. ते खरोखरीच व्हिजिटेरियन कवी आहेत म्हणून त्यांना लोक निसर्गकवी म्हणतात. लालजळ, क्रांतिकारी लिहिणारे कुरूंदकर बाजूला बसलेले आहेत त्यांना लाल चिकन रस्सा व तिखट वाढा आणि दुर्गाताई, पुलंनासुद्धा.”
यशवंतराव व वेणूताई स्वत: अशी काळजी घेत राहिले. गप्पागोष्टी, जेवणं झाली. बहुसंख्य साहित्यिक निघून गेल्यावर आदरणीय लक्ष्मणशास्त्री जोशी, दुर्गाताई भागवत, पु. ल. देशपांडे, वसंत बापट, कुरूंदकर मी व आणखी पाच-सात साहित्यिकच मागे उरले. आम्ही खूप वेळ त्या ठिकाणी थांबलो होतो. कोकणी – मराठी वाद त्या वेळी जोरदार चालला होता. कविवर्य बोरकरांची भूमिका, अट्टाहास, साहित्य अकादमी व दिल्लीतल्या तिथल्या लेखकांची भूमिका, शासनाची भूमिका अशी चर्चा दिल्लीतल्या ताज्या मीटिंगच्या आधारे बराच वेळ चालली. यशवंतरावांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून ते समजावून घेतलं. काही नोंदी घेतल्या. ‘कविवर्य बोरकरांना मी लवकरच भेटतो, चूक की बरोबर हे नंतर. पण त्यांच्यासारख्यांना आधी समजावून तर घेतलं पाहिजे. ऐकून तर घेतलं पाहिजे-’ यशवंतराव रात्री एक वाजेपर्यंत न थकता सर्वांशी असं बोलत राहिले.