मराठी संतांचे कार्य
इस. १००० ते १६०० हा सगळा कालखंड एखाद्या भयाण, न संपणा-या रात्रीसारखा होता, इतिहासाला पडलेले ते एक दु:स्वप्न होते. समाजाचे समाजपण हरवले होते. जातिभेदांच्या अमानुष कुचंबणेत सगळा समाज जणू श्वास रोखून बसला होता. राजकीय अस्थिरता होती. भीषण वादळात स्वत:चे घरकुल सांभाळण्यासाठी माणसे धडपड करतात, तसे भयाकुल जीवन हा देश जगत होता. महाराष्ट्रात मराठी संतांनी याच कालखंडात आपले कार्य केले, समाजाला धीर दिला. हिंदू धर्माची मिरासदारी मिरवणा-या धर्मपंडितांनी देवांनाच बंदिवान करून ठेवले होते, त्या देवांना मुक्त केले. ज्ञानेश्वरांनी या ईश्वरी कार्याचा प्रारंभ केला आणि त्या भावंडांनी आपल्या जीवनात भोगलेल्या हालअपेष्टांनी व दिलेल्या नव्या विचारांनी समाजात नवी जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वर ही ज्ञानाची मूर्ती होती, तर नामदेव ही मुमुक्षूंच्या आर्ततेची, भक्तांच्या व्याकुळतेची मूर्ती होती.
मराठी संतांच्या कार्याचा हा पाचशे वर्षांचा कालखंड राजकीय दृष्ट्या चैतन्यहीन वाटला,तरी संतांच्या कार्यामुळे भक्तिमार्गाच्या व सारस्वताच्या क्षेत्रांत तो बहरलेला वाटतो. या काळाने कैवल्यवृक्षाचे अनेक बहर पाहिले. ज्ञानेश्वर-नामदेव ही याच कैवल्यवृक्षावरची उमललेली फुले होती.