आयुष्य आणि नियती
आयुष्य हे घोडेस्वारासारखं आहे असं मला नेहमी वाटतं. द-याखो-यांतून घोडेस्वाराला नेहमीच धावावं लागतं. डोंगरद-या पार कराव्या लागतात. आणि सुखरूप तर राहावं लागतंच. एखाद्या घोडेस्वाराच्या चित्राकडे मी पाहतो, तेव्हा वैयक्तिक काय किंवा राजकीय जीवनात काय, असंच संकटांतून एकसारखं धावावं लागलं, असं दिसतं. संकटांशिवाय आजवर काही मिळालं नसलं, तरी एक खरं की, कामाचं समाधान आहे. कराडात वकील म्हणून जम बसवीत राहिलो असतो, तर राजकारणातले नंतरचे अध्याय कदाचित दिसले नसते. नियतीच्या मनातच ते होतं. सर्वज्ञ असो, बहुज्ञ असो, नियतीला, सृष्टिनियमाला बदलण्यास कुणीही समर्थ नाही हेच खरं! म्हणूनच नाश पावलं असेल, त्याची उपेक्षा करावी लागते आणि जीवनात जे प्राप्त होतं, त्याचा अंगीकार करावा लागतो.