शिवाजीमहाराज-एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व
शिवाजीमहाराजांसारखी जी एक अव्दितीय व्यक्ती सतराव्या शतकात महाराष्ट्रात निर्माण झाली, ती काय अगदी एकाएकी निर्माण झाली? माझे स्वत:चे असे मत आहे की, महापुरूष, आकाशात विद्युल्लता चमकावी आणि निमिषार्धात अंतर्धान पावावी तसे एकाएकी येतात आणि निघून जातात, असे कधीही घडत नाही. महापुरूषांच्या निर्मितीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या पराक्रमाला काही सामाजिक कारणपरंपरा असावी लागते. त्यांच्या पाठीमागे हळूहळू समाजजीवनाची शक्ती निर्माण व्हावी लागते. शिवाजीमहाराज म्हणजे फक्त भवानी देवीचा प्रसाद, असे मी मानीत नाही. शिवाजीमहाराजांचे जीवन हे मराठी जनतेच्या जीवनाचा प्रसाद आहे, अशी माझी स्वत:ची भावना आहे.