• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ९९

महाराष्ट्रांत उद्योगधंदे वाढले पाहिजेत, व्यापार वाढला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण व्यापार म्हणजे काय ? व्यापारी कोणास म्हणावयाचें ? निव्वळ आयात-निर्यात करणें यालाच व्यापार म्हणतां येईल काय ? किंवा तो करणारा व्यापारी होईल काय ? परदेशांचा माल आयात करून कमिशनवर कांहीं लोक मोठे व्यापारी झाले, पण तो खरा व्यापार होईल काय ? हिंदुस्तानांतील फार मोठा व्यापारी वर्ग याच प्रकारचा आहे. पण ही दृष्टि आतां बदलली पाहिजे. आम्हीं जो मूलगामी विचार केला तो अशा त-हेचा विधायक व अभिनव विचार आहे. दुस-या योजनेनंतर आपल्या देशांतच मालाचें उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आमच्या देशांतील कच्चा माल उत्पादनाच्या कामीं येऊं लागला. त्यांतून गरजेच्या वस्तूंचें उत्पादन सुरू झालें. आमच्या देशांतील मालाचा उपयोग येथील उत्पादनांत झाल्याशिवाय व गरजेच्या वस्तूंचे येथें व्यापक प्रमाणावर उत्पादन झाल्याशिवाय आमचा देश संपन्न होणार नाहीं. व्यापारासंबंधींच्या कल्पना उपजाऊ व उत्पादक अशा असल्या पाहिजेत. मी मुंबईला व्यापार पाहतों. तो मला व्यापार दिसत नाहीं. जो देश परदेशांच्या आयातीवर विसंबून राहतो, तो दुबळा देश ठरतो. व्यापारी उत्पादक म्हणून राहिला पाहिजे. त्यानें उद्योगधंदे सुरू करून देश समृद्ध केला पाहिजे. ह्यावर आतां आपण आपली दृष्टि केंद्रित केली पाहिजे.

छोट्या छोट्या प्रश्नांत आपली शक्ति वाया जात आहे हें पाहिलें म्हणजे मनाला वेदना होतात. ही शक्ति आपल्यापुढील समस्या सोडविण्यासाठीं आपण उपयोगांत आणली पाहिजे. नव्या मूल्यांच्या प्रस्थापनेबरोबर ज्या नव्या आकांक्षा वृद्धिंगत होत असतात, त्यांचें प्रतिनिधित्व आम्हांला करतां आलें पाहिजे. या आकांक्षांची पूर्ति करण्याचें काम शासनाचें असून शासन तें बजावल्याशिवाय राहणार नाहीं. परंतु त्याच्या अगोदर माझें म्हणणें समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. निव्वळ भाषेच्या वादांत मला आस्था नाहीं. जनतेची जी भाषा असेल तिचा विकास झाला पाहिजे. पण तिचा विकास होत असतांना, हिंदीचाहि विकास व समृद्धि झाली पाहिजे, अशी महाराष्ट्र राज्याची आकांक्षा आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा भारताच्या इतिहासाचा एक पाठ आहे. महाराष्ट्राच्या कांहीं वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि भावना असल्या तरी महाराष्ट्र हा भारतीय कुटुंबाचा एक घटक आहे ही गोष्ट आपण नेहमी ध्यानांत ठेवली पाहिजे. हें नातें अविभाज्य असून सबंध राज्याचा प्रश्न हिंदुस्तानशीं जोडला गेला आहे ही आमची भूमिका आहे. तेव्हां केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीनें राष्ट्रीय प्रश्नाचा विचार करणें बरोबर होणार नाहीं. महाराष्ट्र हा देशाचा एक भाग आहे आणि या देशांतील सगळे लोक बंधु आहेत या भावनेनें आपण आपल्या जबाबदा-या पार पाडल्या पाहिजेत.

छोट्या छोट्या राज्यांचा प्रश्न उचल घेत आहे. पण दुनियेचें चित्र पाहा. आज सर्व मानवजातीसमोर महान् संकट उभें आहे. लढाईचा प्रसंग उद्भवणार नसला तरी तशी परिस्थिति निर्माण झाली तर आपल्या नेत्याचे हात आपल्याला बळकट कसे करतां येतील ह्या दृष्टीनें आपण विचार केला पाहिजे. या देशाला महात्मा गांधींनी एक दृष्टि दिली आहे. आज पंडितजी आपल्याला तोच संदेश देत आहेत. त्यांनीं दिलेल्या प्रगल्भ दृष्टिकोनांतून भारताचा आपण विचार केला पाहिजे. मानवजातीसमोर आज जी संकटांची परंपरा उभी आहे, ती नाहींशी करण्याकरितां आपल्यापुढील समस्यांची उकल करून भारतानें पुढें पाऊल टाकलें पाहिजे. आजचें युग विज्ञानाचें आहे. परंतु विज्ञान हें एक साधन असून त्याचा उपयोग मानव जातीच्या हिताकरितां झाला पाहिजे. मानवजातीनें विज्ञानाचा विकास केला व त्यांतून मानवजातीचें नुकसान झालें तर त्या विज्ञानाचा कांहीं उपयोग नाहीं. कोणत्याहि साधनांतून जनतेचें कल्याण साध्य करतां आलें पहिजे.

आज आपली हीं जीं छोटीं छोटीं राज्यें झालीं आहेत त्यांच्याकडे आपण आपल्या विकासाचें एक साधन म्हणून पाहिलें पाहिजे. पण छोटीं छोटीं राज्यें होऊनहि पूर्वीचें हेवेदावे कायम राहणार असतील तर तें एक संकटच ठरेल. ह्या साधनांचा उपयोग लोककल्याणासाठीं होतो आहे किंवा नाहीं हें आपण पाहिलें पाहिजे. ह्या कसोटीवर महाराष्ट्र राज्य उतरत नसून महाराष्ट्र राज्यापासून विदर्भाचें नुकसान होत आहे अशी माझी खात्री करून दिली, तर मी स्वतःच हें महाराष्ट्र राज्य मोडून टाकीन. आम्ही सर्व भाऊ भाऊ एकत्र आलों. एकत्र आलेल्या भावांच्या जीवनांत वैर उत्पन्न व्हावें असें कुणाला वाटेल? आज सव्वीस जिल्ह्यांतील लोक एकत्र आले आहेत याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. पण या एकत्र येण्यानें जर कुणाला आनंद न वाटतां दुःख वाटत असेल तर तें दुर्दैवच ठरेल.