• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -९०

तुमच्या या थोर विद्यापीठानें आपल्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय जीवनांत मोठी कामगिरी बजावली आहे. अलिगड कोणाला आवडो अगर न आवडो, परंतु विद्यादानाच्या या महान् स्थानाकडे कोणालाहि दुर्लक्ष करतां येणार नाहीं. म्हणून या व्यासपाठीवरून भाषण करण्याची तुम्हीं मोठ्या उदारपणें मला ही संधि दिलीत तिचा फायदा घेऊन या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मी असें आवाहन करूं इच्छितों कीं, ज्यायोगें हें विद्यापीठ भारताच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या कार्यांत अग्रेसर राहील अशा प्रकारची नवी कामगिरी त्यांनीं आपल्या या महान् संस्थेकरवीं पार पाडावी. तुम्हांला कदाचित माहीत असेल की तुमच्या विद्यापीठाची स्थापना झाली त्या वेळीं राजकारणी व्यक्तीमध्येंच नव्हे तर शिक्षणतज्ज्ञांमध्येंहि सरकारी नोक-यांची जातीच्या प्रमाणांत वांटणी व्हावी हें मत प्रभावी होतें. प्रमाणानुसार वांटणी या तत्त्वाचा कांहीं उपयोग नाहीं असें मी म्हणत नाहीं. कदाचित् त्या काळीं त्याचा उपयोग झालाहि असेल. परंतु व्यक्तिशः मला विशिष्ट जातींच्या किंवा गटांच्या प्रगतीसाठीं आणि विकासासाठीं अशा प्रकारचा आधार घेतला जावा याबद्दल कधींच बरें वाटलें नाहीं. या विद्यापीठाचे विशेषतः जे मुसलमान विद्यार्थी आहेत त्यांनीं याच भावनेनें त्यांच्यापुढील महान् कार्याला प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतों. आजच्या या अणुयुगांत अशा प्रकारच्या 'प्रमाणानुसार वांटणी' या तत्त्वाला कांहीं अर्थच राहिलेला नाहीं. खरें म्हणजे, बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने त्याला कधींच कांहीं अर्थ नव्हता. केवळ नोक-या आणि जागा देऊन आम जनतेचेच काय पण एखाद्या गटाचे सुद्धां प्रश्न सुटण्यास थोडीसुद्धां मदत होणार नाहीं. या देशांत, इतर समाजांप्रमाणें मुसलमान समाजांतहि ९० टक्के लोक शेतकरी व कामगार आहेत. भारताच्या प्रगतीचा विचार ह्या दृष्टिकोनांतून झाला पाहिजे. ह्या प्रगतीच्या संदर्भात जातीय विचारांना मुळींच वाव राहूं शकणार नाहीं. आतांपर्यंत मुसलमान शेतकरी आणि हिंदू शेतकरी, मुसलमान कामगार आणि हिंदू कामगार अशा प्रकारची मागणी अद्यापि कोणीं केली नाहीं, ही सुदैवाचीच गोष्ट म्हटली पाहिजे. वातावरणाची अनुकूलता ही अर्थात् महत्त्वाची असते ही गोष्ट खरी आहे. आणि हें वातावरण निर्माण व्हावें म्हणून आपल्या आवडत्या पंतप्रधानांच्या प्रभावी नेतृत्वाखाली सर्व नागरिकांना समान संधि देणा-या समाजव्यवस्थेचा भक्कम पाया घातला गेला आहे, या माझ्या म्हणण्याशीं तुम्ही सहमत व्हाल याची मला खात्री आहे.

मॉन्ट्रीयल येथील मॅग्गील येथील विद्यापीठांतील इस्लामी संस्कृतीच्या अध्ययन शाखेचे प्रमुख प्रा. विलफ्रेड कॅन्टवेल स्मिथ यांनीं मुसलमानांच्या संबंधीं खालीलप्रमाणें उद्गार काढले आहेत :
''भारतांतील मुसलमानांचें भवितव्य हे जगांतील इतर मुसलमानांच्या किंबहुना सर्वच जनसमूहांच्या भवितव्याप्रमाणें, त्यांच्या आत्मिक बलावर, श्रद्धेवर व सर्जनशीलतेवर आणि अन्य बांधवांबरोबरच्या त्यांच्या संबंधांवर अवलंबून आहे.'' परिस्थितीशीं त्यांनी जुळवून घेतलें तर कोणतीहि गोष्ट त्यांना असाध्य नाहीं. वास्तविक पाहतां त्यांची भूमिका पुढाकाराची राहणार असून ही भूमिका ते योग्य प्रकारें पार पाडूं शकले तर ते आपल्या देशाची यथोचित सेवा करतील, एवढेंच नव्हे तर झपाट्याने बदलत असलेल्या सध्यांच्या जगांत इस्लामच्या धर्माचीहि त्यांच्याकडून सेवा घडेल.

हें एक मोठेंच आव्हान आहे यांत शंका नाहीं. आणि या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढें त्याचें महत्त्व कथन करण्यांत आपणां सर्वांचें कल्याण व्हावें व सर्वांची प्रगति व्हावी हाच माझा हेतु आहे. आपल्या विद्यापीठाचा निरोप घेऊन जीवनाच्या विशाल क्षेत्रांत आज पाऊल टाकणा-या तुम्हां पदवीधरांना माझी एवढीच विनंती आहे कीं, तुम्हीं आपल्या विचारानें, आचारानें आणि उक्तीनें आपल्या विद्यापीठाच्या उच्च परंपरांना आपण पात्र आहोंत असें दाखवून द्यावें. सुधारणा व समंजसपणा, बुद्धिनिष्ठा व सहिष्णुता आणि सर्वांत महत्त्वाचें म्हणजे मानवतेवरील श्रद्धा ह्याच या विद्यापीठाच्या परंपरा आहेत. आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीं आपल्या मुसलमान बंधूंनी आपल्यापासून अलग होण्याचें जरी पत्करलें तरी मुसलमानांच्या विद्येचें आसन आमच्यामध्येंच राहिलें आहे, ही इतिहासांतील खरोखर एक अविस्मरणीय घटना आहे. इस्लाममध्यें जें जें म्हणून चांगले आहे तें तें तुमच्याकडून विकसित व्हावें, आपल्या लोकशाही संस्कृतीच्या संवर्धनास त्याचें मोठ्या प्रमाणांत साहाय्य व्हावें, आणि त्याचा लाभ आपणां सर्वांना व पुढील पिढ्यांना मिळावा हीच माझी प्रार्थना.