• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -७८

आपल्या देशांत आपल्याला शेतीच्या दृष्टीनें जास्त प्रयत्न करावयाचा आहे. याचें कारण आपली शेती मागासलेली आहे. तींत सुधारणा घडवून आणण्यासाठीं शेतीचें शिक्षण वाढविलें पाहिजे. त्याचप्रमाणें शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्यें वाढविला पाहिजे. यासाठी येथें शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याचे अधिकारी होऊन जाणार असले आणि जावयाच्या शर्यतीमध्यें त्या निमित्तानें पुढें सरकणार असले, तर मी असें म्हणेन कीं ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथें शिकलेला मनुष्य शेतकरीहि होऊं शकला पाहिजे, तसें त्यानें झालें पाहिजे. शेतीचें फक्त दुस-यांनाच व्याख्यान देणारे स्नातक जर या कृषि महाविद्यालयांतून निर्माण होणार असतील तर चळवळ करून हीं कृषि महाविद्यालयें बंद करावीं लागतील असें मला वाटायला लागलें आहे. येथें शेतीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शेतीच्या कामामध्यें आपल्या शिक्षणाचा उपयोग करणें शक्य झालें नाहीं, त्यांत तो यशस्वी झाला नाहीं तर ती चुकीची गोष्ट ठरेल. कारण शेतीसंबंधींचा शास्त्रीय दृष्टिकोन अगदीं झोपडींतल्या शेतक-यांपर्यंत नेऊन पोचविणें हा या देशांतील कृषीचें ज्ञान वाढविण्याचा खरा उद्देश आहे, एक ऍग्रिकल्चरल सर्व्हिस निर्माण करण्याचा नाहीं.

या देशांत जास्तींत जास्त लोकांना शेतीचेंच काम करावयाचें आहे. दोन एकरांत शेतीचें काम करणारा शेतकरी आपल्या कामामध्यें पराभूत झाला तर तो देशाचा पराभव होत आहे असा त्याचा अर्थ आहे. दोन पंचवार्षिक योजनांमध्ये खूप प्रयत्न करून सुद्धां शेतीच्या आघाडीवर आज आपला पराभव होत आहे असा आपल्याला अनुभव येत आहे. इकडे पुष्कळशा संशोधनशाळा काढल्या, नवीन कारखानदारी काढण्याचा प्रयत्न केला, परदेशांतून हुंडणावळ मिळविण्याचा प्रयत्न केला, राजकीय क्षेत्रामध्यें पंचशीलची पुष्कळ प्रगति झाली, सगळें कांहीं घडलें. परंतु परभणीच्या खेड्यांतील लहानशा शेतक-याला आपल्या शेतीमध्यें दहा मणाचें बारा मण धान्य काढतां आलें नाहीं, तर त्या प्रमाणांत हिंदुस्तानचा पराभव होत आहे असें मला वाटतें, आणि म्हणून शेतीसंबंधींचा नवा दृष्टिकोन, शास्त्रीय दृष्टिकोन हा स्नातकांपर्यंत असा मर्यादित राहतां कामा नये. त्याचा विचार असा पाझरत पाझरत किंवा न पाझरतां अगदीं सरळ कालव्यासारखा वाहत वाहत शेवटच्या शेतक-यापर्यंत जाऊन पोंचला पाहिजे. आज देशामध्यें याची आवश्यकता असून हें जेव्हां घडेल तेव्हांच शेतीचा प्रश्न सुटणार आहे. कारण मीं आपणांला सांगितलें त्याप्रमाणें शेती हें विकेंद्रित स्वरूपाच्या उत्पादनाचें क्षेत्र आहे. पांचपंधरा कापड-गिरण्या काम करूं लागल्या कीं सगळ्या चाळीस कोटि लोकांना कापड मिळतें. पण पांचपंचवीस ठिकाणींच शेतीचें चांगलें उत्पन्न काढण्याचा प्रयोग केला तर त्यामुळें एकंदर शेतीचें उत्पादन वाढण्याचा कांहीं संभव नाहीं. दहापांच कृषि-पंडित निघाले तर त्यांचा वैयक्तिक मोठेपणा वाढेल, पण त्यांची शेती करण्याची पद्धत हजारों शेतक-यांपर्यंत पाझरत गेली नाहीं तर त्यांच्या ज्ञानाचा कांहीं उपयोग नाहीं. असा हा शेतीचा अगदीं बिकट प्रश्न आहे. त्याकरितां शेतीचें हें ज्ञान पावसाच्या पाण्यासारखें गेलें पाहिजे असें मला वाटतें. वाहणारी नदी ज्या गांवच्या कांठानें जाईल त्यालाच फक्त पाणी देते. पण पावसाचें पाणी हें सगळीकडे जातें. कुठें कमी, तर कुठें जास्त. असें पावसाच्या पाण्यासारखें शेतीचें ज्ञान सगळीकडें पसरलें पाहिजें, वाढलें पाहिजे, आणि हीं महाविद्यालयें त्याचीं केंद्रें झालीं पाहिजेत. या महाविद्यालयामध्यें शिकणा-या विद्यार्थ्यांना उद्देशून मी हें बोलत आहें. आमच्या देशामध्यें शेतीच्या क्षेत्रामध्यें एक प्रकारच्या शास्त्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. हा दृष्टीकोन आधीं मुळांतच येथें नव्हता. त्याची आवश्यकता आहे ही भावनाहि नव्हती. तेथें आम्हांला ही भावना आतां निर्माण करावयाची आहे, आणि हें ज्ञान आम्हांला पसरावयाचें आहे. याकरितांच मला असें वाटतें कीं शेतीचें शिक्षण हें फार मूलभूत असें महत्त्वाचें कार्य आहे.