नियोजन, मनुष्यबळ व शेती
गेल्या दोन-तीन दिवसांमध्यें नियोजनावर आपण अनेक चर्चा ऐकल्या परंतु नियोजन हा विषयच इतका नित्य नवा आहे कीं, त्याच्यासंबंधींची चर्चा कधी कंटाळवाणी वाटत नाहीं. आकाशाकडे माणसानें पाहिल्यानंतर ज्याच्या त्याच्या नजरेप्रमाणें त्याला तें दिसतें. जसें आकाश विशाल आहे तसाच नियोजनाचा हा प्रश्नहि विशाल आहे. असंख्य दृष्टिकोन आणि असंख्य प्रश्न यांतून असंख्य माणसांच्या जीवनास पूर्णतया स्पर्श करणारा हा विषय असल्यामुळें त्याच्यासंबंधीं कधीं कंटाळा येत नाहीं. पण नियोजनाचा निश्चित अर्थ आपण आपल्या मनाशीं समजावून घेतला पाहिजे. विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जी परिस्थिति महाराष्ट्रात आहे तिच्या पार्श्वभूमीवर आणि देशांतील नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेचें नियोजनाच्या बाबतींत आजचें कर्तव्य काय आहे हें आपण पाहिलें पहिजें.
मी तपशिलाच्या प्रश्नात फारसा जाऊ इच्छित नाहीं. या प्रश्नाची शास्त्रीय चर्चा करण्यापेक्षां त्याच्या पाठीमागें जीं दोन मूलभूत तत्त्वें आहेत त्यांचा आपण विचार केला पहिजे. मी अगदीं सामान्य माणसाच्या दृष्टीनें नियोजनाकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. आमच्या देशामध्यें जीं साधनें आहेत त्या साधनांचा जास्तींत जास्त विकास करून आमच्या जीवनाला समृद्ध बनविण्याचा नियोजन हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रयत्नामधून निर्माण होणारी जी संपत्ति आहे, जी शक्ति आहे, जें सामर्थ्य आहे, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांस मिळेल याचीहि काळजी नियोजनामध्यें घेतली पाहिजे. नियोजनाच्या बाबतीतला हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
नियोजनाच्या दृष्टीनें महाराष्ट्राजवळ कोणतीं साधनें आहेत ? जमीन, पाणी, जमिनीखालचे खनिज पदार्थ जे कांहीं असतील ते, आणि मनुष्यशक्ति. मला पहिल्याप्रथम एक गोष्ट सांगावयाची आहे आणि ती ही कीं, आमचीं जीं साधनें आहेत त्या साधनांचा जास्तींत जास्त प्रमाणांत वापर करणें हाच आपल्या दृष्टीनें खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु नियोजनाच्या संदर्भात आपलें मनुष्यबळ व आपली शेती हींच आज आपलीं मुख्य साधनें असल्याकारणानें त्यांच्या प्रश्नांसंबंधानेंच मुख्यतः मी आज बोलणार आहें. आमचें मनुष्यबळ कसें आहे, आमचीं पाण्याचीं साधनें काय आहेत, आमचीं जमिनींची साधनें काय आहेत हें आपण प्रथम पाहिलें पाहिजे. आतांपर्यंत आपण महाराष्ट्राचें जें चित्र पाहिलें तें जुन्या इतिहासांतल्या सिंहगडावरच्या, प्रतापगडावरच्या आणि शिवनेरीवरच्या महाराष्ट्राचें. पण आतांच्या महाराष्ट्राचें जें चित्र आहे तें आपण जरा पाहा. तें चित्र अगदीं वेगळें आहे. आतांचा हा महाराष्ट्र खेड्यापाड्यांत पसरलेला आहे, जमीनजुमल्यांत वसतो आहे, जोंधळा, शाळू, कापूस, ऊंस हीं पिकें तो पिकवितो आहे. आणि त्याला मिळणारें पाणीहि पाहा. हें चित्र पाहिल्यानंतर बुद्धिला थोडीशी कां होईना, एक प्रकारची जागृति येईल. आपल्याजवळ कांहीं तरी अपरंपार आहे असें समजूं नका. जें आहे तें मर्यादित आहे. पाणी मर्यादित आहे, जमिनीची शक्ति मर्यादित आहे आणि या मर्यादित शक्तीचाहि उपयोग केलेला नाहीं अशी ही परिस्थिति आहे. ही परिस्थिति बदलण्यासाठीं आपणांला पांच, दहा, पंधरा वर्षें प्रयत्न करावयाचा आहे.
माझ्या मतें अतिशय चांगली साधनसंपत्ति महाराष्ट्रांत जर कुठची असेल तर ती महाराष्ट्राचें मनुष्यबळ ही आहे. परंतु येथील माणसें कांही उद्योग करीत नाहींत, परिश्रम करीत नाहींत, असा एक दृष्टिकोन मांडण्यांत येतो. मला हें मान्य नाहीं. अर्थात् जगांत कांहीं आळशी माणसें असतीलहि. त्यांच्यासंबंधीं वकीलपत्र घेऊन मी बोलत नाही. पण खेड्यापाड्यांमध्यें पावसांत शेतीमध्यें काम करणारा माणूस केवळ आळशीपणामुळें घरीं राहिला आहे हें म्हणणें योग्य दिसत नाही. तो बारा महिन्यांतले तीन महिने काम करतो व बाकीचे महिने तो काम करीत नाहीं याचें कारण त्याला उपयोगी पडेल असें काम मिळवण्यासारखी परिस्थिती नाहीं. श्रमाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, असें कांही पुढारी ''आराम हराम है'' ह्या पंडितजींच्या भाषेंत किंवा विनोबाजींच्या श्रमदानाच्या भाषेंत सांगत असतात त्याला वेगळाच अर्थ आहे. तें पण एक सत्य आहे. परंतु माणसें हातपाय पसरून आपलीं खेड्यांमध्यें बसली आहेत, तोंडापर्यंत गंगा येऊनहि तीं आपलें तोंड उघडत नाहींत अशी कांहीं परिस्थिति नाहीं. आपल्या समाजाचें आपण असें चित्र रंगविणार असलां तर तें मला मंजूर नाहीं.