• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ५७

तिस-या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीनेंहि कांहीं महत्त्वाच्या गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत. अर्थात् आपल्या तिस-या योजनेचें स्वरूप भारताच्या तिस-या योजनेच्या स्वरूपावर अवलंबून राहील हें खरें आहे. भारताच्या तिस-या योजनेकडे आपण पाहिलें तर आपल्याला असें दिसून येईल कीं, ह्या योजनेमध्यें बेसिक इंडस्ट्रीजवर म्हणजे मूलभूत उद्योगधंद्यांवर अधिक भर देण्यांत येत आहे. त्यांवर एकंदर योजनेच्या किती टक्के खर्च केला जाणार आहे वगैरे तपशिलांत मी शिरत नाहीं. कारण, त्यांत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. परंतु एक गोष्ट मात्र खरी कीं, ज्याला उद्योगप्रधान योजना किंवा इंडस्ट्रियल प्लॅन म्हणतात अशा योजनेची भारताला आवश्यकता आहे. पण त्याचबरोबर हेंहि खरें आहे कीं, भारताची औद्योगिक योजना शेतीकडे दुर्लक्ष करून पुढें जाऊं शकत नाहीं. किंबहुना शेती हा एक अत्यंत महत्त्वाचा उद्योगधंदा किंवा व्यवसाय आहे हें गृहीत धरूनच आपण आपली औद्योगिक योजना आंखली पाहिजे.

मूलभूत उद्योगधंद्यांच्या दृष्टीनें ह्या विभागासाठीं आपण काहीं खास गोष्टी मागितल्या पाहिजेत असें मला वाटतें. कारण हे जे मूलभूत उद्योगधंदे आहेत त्यांपैकीं कांहीं उद्योगधंद्यांवर महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था साकार होणार आहे. अशा उद्योगधंद्यांना महाराष्ट्राच्या इतर भागांत जितका वाव आहे त्यापेक्षां अधिक वाव विदर्भांत आहे. विशेषतः पोलाद किंवा लोखंड यासारख्या धंद्याला येथें अधिक वाव आहे. कारण या धंद्याला लागणारी कोळशासारखी खनिज साधनसामुग्री नागपूरच्या आसपास विपुल प्रमाणांत सांपडते. म्हणून अशा प्रकारचे मूलभूत उद्योगधंदे विदर्भांत उभारावे असा आग्रह धरण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. परंतु त्याचा पाठपुरावा करणें, त्यासाठीं तयारी करणें, हें काम आपल्याला करावयाचें आहे. विशेषतः कच्च्या लोखंडाचा कारखाना चांद्याच्या जवळपास काढण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. अर्थात् आपण आग्रहानें ही मागणी केली पाहिजे. या भागास एखादा कारखाना द्यावा किंवा काय यासंबंधीं भारत सरकार विचार करीत असल्याचें कळतें. आम्ही या विचाराचें स्वागत करीत आहोंत आणि त्याचबरोबर हा विचार प्रत्यक्ष्यांत यावा म्हणून प्रयत्नहि करीत आहोत. हा कारखाना आपल्या पदरांत पडेल अशी आम्हांला आशा आहे. पण त्याचबरोबर हा कारखाना आपण कशासाठीं मागत आहोंत याचीहि आपल्याला स्पष्ट कल्पना असली पाहिजे. अर्थात् त्यांत या विभागाचा विकास व्हावा हा उद्देश तर आहेच. पण त्यापेक्षांहि अधिक महत्त्वाची गोष्ट ही आहे कीं, सबंध देशाच्या प्रगतीच्या कार्यांत नव्या महाराष्ट्राला सहभागी होण्याची उत्सुकता आहे, घाई आहे. आम्हांला ही तळमळ आहे म्हणूनच आम्ही या कारखान्याची मागणी करीत आहोंत. विकास परिषदेनें सुद्धां ही भावना ध्यानांत ठेविली पाहिजे असें मला वाटतें म्हणून मीं या गोष्टीचा आपल्यापुढें उल्लेख केला.

आपण जेव्हां मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधी बोलतों तेव्हां आपलें छोट्या उद्योगधंद्यांकडे दुर्लक्ष होतें, असें मला वाटतें. माझ्या मतें छोट्या उद्योगधंद्यांचे महत्त्व आपल्या या भागामध्यें विशेष आहे. मघाशीं मीं सांगितलें कीं, शेतीचा धंदा हा एक प्रमुख व महत्त्वाचा धंदा आहे. परंतु ज्यांना दुसरें कांहींच करतां येत नाहीं, समजत नाहीं, अशांचा हा धंदा आहे, तो अडाणी लोकांचा सामान्य लोकांचा धंदा आहे असें समजलें जातें हें मोठें दुर्दैव आहे. या समजुतीमुळेंच आम्हीं आमची आर्थिक आत्महत्या करून घेतली आहे. तेव्हां या बाबतींत आपला दृष्टिकोन काय आहे हें महत्त्वाचें आहे. आपण विदर्भाच्या शेतीचा विचार करूं. एक गोष्ट खरी कीं, विदर्भांतील शेती ही इतर भागांतील शेतीच्या मानानें कांहीं बाबतींत बरी आहे. या भागांतील जमीन काळी कपाशीची जमीन आहे. परंतु जमीन सुपीक आहे असें नुसतें म्हटल्यानें भागत नाहीं. या जमिनींत कांही व्यापारी पिकें निघतात. मी विदर्भांतील शेतक-यांशीं या बाबतींत बोललों तेव्हां त्यांच्या बोलण्यावरून असें दिसून आलें कीं, तीन वर्षांपैकीं एक वर्ष चांगलें, दुसरें सामान्य बरें आणि तिसरे वाईट असतें, आणि चौथें कसे येईल हें सांगता येणें कठीण असतें. अशी ही येथील शेतीची परिस्थिति आहे. त्यांत आणखी आम्हीं ज्या व्यापारी पिकाचें म्हणजे कपाशीचें उत्पादन करतों त्यामध्यें सट्टेबाजी फार आहे. या सट्टेबाजीवरच या पिकाची किंमत अवलंबून असते. कपाशीच्या बाबतींतील ही सट्टेबाजी एकट्या भारतीयाचेंच नव्हे, तर सा-या दुनियेचें दुर्भाग्य आहे. अशा अनिश्चित प्रकारच्या जागतिक बाजारामध्यें आम्ही आमचा माल नेतों आणि अस्थिर परिस्थितीमुळें आमच्या हातीं काय लागतें, तर ही अनिश्चित शेतीची अर्थव्यवस्था ! या परिस्थितींतला हा असा मूलभूत दोष आहे.