• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ५०

कोंकणचे तीन वेगवेगळे भाग आहेत. रत्नागिरी हा एक वेगळा भाग मानला पाहिजे. कुलाबा-ठाण्याचा वेगळा भाग मानला पाहिजे. रत्नागिरीमध्यें, निव्वळ राजकीय किंवा ऐतिहासिक कारणांमुळें नव्हे, तर सामाजिक परिस्थितीच्या कारणांमुळें, दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी असे भाग पडतात. ही गोष्ट, कांहीं भाग पाडण्याच्या दृष्टीनें नव्हे, तर परिषदेपुढें असणा-या कार्याचा अंदाज घेण्यासाठीं, मी आपल्या नजरेसमोर आणूं इच्छितों. या दृष्टीनें कोंकणचे जे विशिष्ट प्रश्न आहेत त्यांतून मार्ग काढण्यासाठीं, कोंकणचा समुद्रकिनारा, तिथें पडणारा पाऊस, तेथें असणारी मनुष्यसंपत्ति, तेथील जमिनीचा एकंदर कस आणि तेथींल परिस्थिति यांचा विचार करून कोंकणच्या विकासाचे कार्यक्रम शेवटीं निश्चित करतां येतील. आम्ही मनामध्यें नुसत्या विकासाच्या योजना आणि मनोराज्यें मांडल्यानें विकासाच्या योजना निश्चित करतां येणार नाहींत.

माझ्या मतानें कोंकणच्या विकासाच्या दृष्टीनें तीन-चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुराच्या निमित्तानें मी जेव्हां कोंकणामध्यें गेलों तेव्हां तेथील पुरांचा प्रश्न माझ्या मनांत अधिक निकडीनें आला, मला तो तांतडीचा प्रश्न वाटला. मी कोंकणामध्यें अनेक वेळां गेलों आहें. शिवाय मी अशा गांवचा आहें कीं, जें गांव कोंकणची पावसाळ्याची उतारपेठ आहे. पावसाळ्यांमध्यें क-हाडहून चिपळूण, खेड, दापोलीकडे जाणा-या माणसांचे तांडेच्या तांडे मीं माझ्या लहानपणीं पाहिले आहेत. उन्हाळ्यामध्यें तिथला आंबा खाण्याकरितां आणि दौरे करण्याकरितां मीं कोंकणामध्यें पुष्कळच फे-या मारल्या आहेत. परंतु पावसाळ्यांत पुरानें वेढलेलें, पीक वाहून गेलेलें कोंकण मीं अगदीं अलीकडे म्हणजे फक्त गेल्या वर्षीच पाहिलें. आणि त्यावेळीं माझ्या लक्षांत आलें कीं, सगळीं कर्तबगार माणसें आणि बिनकर्तबगार माणसेंसुद्धां, कर्तबगारीसाठीं जिल्हा सोडून बाहेर गेलेलीं आहेत. त्यामुळें रत्नागिरीच्या आर्थिक जीवनामध्यें एक प्रकारची अगतिकता ज्याला म्हणतात अशा प्रकारची स्थिति निर्माण झाली आहे.

तेव्हां रत्नागिरीचा विकास करावयाचा असेल, तेथील आर्थिक जीवन संपन्न करावयाचें असेल, तर, ज्याप्रमाणें कांहीं जिवंत पाण्याचे झरे असल्याशिवाय नदी वाहूं शकत नाहीं त्याचप्रमाणें, येथें जिव्हाळ्याच्या ज्या कांही शक्ति असतील त्या मोकळ्या केल्या पाहिजेत. तसें करणें म्हणजेच माझ्या मतें आजच्या कोंकणच्या विकासाचा पाया घालणें आहे. सगळ्या गोष्टींची, दहा-पंधरा-वीस वर्षांत होणा-या कामांची एक यादी पुढें मांडून जर आपण आपलें समाधान करून घेणार असाल, तर आपण तें समाधान घेऊं शकतां. पण माझ्या दृष्टीनें आज ज्या मूलभूत प्रश्नाचा विचार करावयास पाहिजे तो हा आहे कीं, कोंकणचा विकास करण्याच्या दृष्टीनें जी साधनसंपत्ति कोंकणामध्यें आहे तिची शक्ति मोकळी व्हावी म्हणून जे महत्त्वाचे तीन-चार प्रश्न असतील त्यांच्या बाबतींत आपण काय केलें पाहिजे, त्याकरितां आपण कोणती योजना आंखली पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण ह्या दृष्टीनें या मुख्य प्रश्नांचा विचार कराल अशी मला आशा आहे.