• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ३१

महाराष्ट्रापुढें आज अनेक समस्या आहेत. पण माझा असा अनुभव आहे की, महाराष्ट्रातील माणसाला प्रश्नाची तीव्रता समजावून दिली तर तो उत्साहाने उठतो. पण कर्तव्याची जाणीव दिली नाही तर तो पुन्हा झोपतो. म्हणून त्याला आतां सांगितलें पाहिजे कीं, 'तू आतां राजा आहेस.' दुःखांत असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणें हें राजाचें कार्य आतां प्रत्येक मराठी माणसानें केलें पाहिजे. एकेक माणूस, एकेक मूल, हें सावली देणारें झाड आहे असें मानून त्यास खतपाणी घातलें पाहिजे. येतीं पंधरावीस वर्षे पुरणारें असें हें काम आहे.

आज सकाळपासून माझ्या मनांत अनेक भावनांनीं गर्दी करून सोडली आहे. तुम्ही मला आपला कर्णधार नेमला आहे. त्या नात्याने मी बोलतों आहें; पण मनांत जबाबदारीनें वाकलों आहें. आजचे हे आनंदसोहळ्याचे चार दिवस निघून जातील आणि मी जेव्हां उद्यां विधानसभेंत बसेन, त्यावेळीं महाराष्ट्राच्या भवितव्यासंबंधींच्या कामाचा आपण अहवाल मागाल. लोकांना थोडें थांबा असें मला म्हणतां येणार नाहीं. ते म्हणतील, वर्षानुवर्षे थांबलों. आतां थांबायला वेळ नाहीं. हा कांहीं मी तुम्हांला उपदेश करतों असें समजूं नका, तर माझ्या जबाबदारीचे पडसाद जे मनांत उमटत आहेत ते शब्दांनीं मी तुमच्यासमोर उघडे करीत आहें. खूप मोठीं कामें करावयाचीं आहेत. तिसरी पंचवर्षिक योजना आतां आंखावयाची आहे. देशाची ही तिसरी योजना आहे. पण एका अर्थानें महाराष्ट्रात आपली योजना मांडावयाची ही पहिलीच संधि आहे. महाराष्ट्रांच्या कडेकपारींत पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्या शेतांतल्या पिकांना पोचवावयाचा आहे. उद्योगधंदे वाढवावयाचे आहेत. उद्योगधंदे, कारखाने द्या म्हणून कोणी देत नाहीं, तर जेथे दोन हातांचे श्रम उभे राहतात तेथें ते येतात. ते हात सर्व जनतेचे आहेत, सरकारचे नव्हेत. राज्य म्हणजे सरकार नव्हे. सरकारें येतील आणि जातील. मी पुन्हा एकदां तुम्हांला आठवण देतों कीं, महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून जें मी सारखें म्हणतों आहें त्याचा अर्थ तुम्ही लक्षांत घ्या. भारतीय संदर्भ दृष्टिआड करून मी महाराष्ट्र म्हणत नाहीं. भारताबरोबर महाराष्ट्र आपणांला मोठा करावयाचा आहे. भारत जगेल तरच महाराष्ट्र जगणार आहे, वाढणार आहे. म्हणून या शिवनेरीच्या साक्षीनें आणि तुम्हां सर्वांच्या वतीनें मी पुन्हा एकदां सांगतों कीं, आमच्या महाराष्ट्रीय परंपरेंत जें जें पवित्र आणि उच्च असेल तें तें भारताच्या उत्थापनासाठीं आम्ही देणार आहोंत. जीं वैगुण्यें असतील तीं आम्ही आमच्यापाशीं ठेवूं.

माझ्यापुढील कामाचें मला तीन त-हेनें दर्शन घडत आहे. उद्यांच्या महाराष्ट्र राज्याचा कारभार उत्तम, चोख झाला पाहिजे आणि आपला लौकिक कायम राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, पंचवार्षिक योजनेचें बाळ पाळण्यांत पाय दाखवून नवमहाराष्ट्राची ग्वाही देणारें झालें पाहिजे; आणि तिसरी गोष्ट आपण तीन भाऊ अनेक शतकांनंतर प्रथम एकत्र येत आहोंत त्यांचें एकसंध मन तयार झालें पाहिजे. राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रांत एकात्म भावनेचा प्रयत्न सर्वांनी करावयाचा आहे. त्याच बरोबर कांहीं काळ - दहापंधरा वर्षे तरी - मला या महाराष्ट्रांत औद्योगिक शांतता हवी आहे. संपाची भाषा आपण बंद केली पाहिजे. याचा अर्थ तुमच्यावर अन्याय, तुमच्या अडचणी तुम्ही मुकाट्यानें सहन कराव्यात असें मी म्हणत नाहीं. आपल्या हक्कांसाठी तुम्ही जरूर भांडा; यशवंतरावांशीं भांडा, महाराष्ट्र सरकारशीं भांडा. पण महाराष्ट्राचें राज्य रांगतें आहे तोंवर संपाची भाषा बोलूं नका. अन्यायाविरुद्ध वापरावयाचें संप हें एकमेव हत्यार आहे. तें वापरतांना महाराष्ट्राचा त्रिवार विचार करा.

मी आज येथें एक अपूर्व योगायोगानें उभा आहें. महाराष्ट्र राज्याचा उत्सव शिवछत्रपतींच्या जन्मदिवशीं सुरू होत आहे. शिवनेरीच्या माथ्यावर जिजामातोश्री बालशिवाजींना घेऊन उभ्या आहेत. महाराष्ट्राला तें अमोल देणें देणा-या मातेचें मला दर्शन घडलें आहे. त्यांतील मर्महि आपण लक्षांत घ्या. जिजामातोश्री शिवनेरीवर आल्या हें या स्थळाचें परमभाग्य. पण त्या आल्या त्या वेळीं त्यांच्या पाठीवर त्यांचेच वडील आणि भाऊ पाठलाग करत घोडदौडीनें येत होते हा इतिहास आपण विसरूं नका. नवमहाराष्ट्राच्या मागें त्याचे मामा नि आजोबा पाठलाग करीत येत आहेत असें होतां कामा नये. आज सह्याद्रीच्या सान्निध्यांत मराठी मन महाराष्ट्राच्या इतिहासानें भरून गेलें आहे. छत्रपतींना जन्म देणारी शिवनेरी, त्यांना पुनर्जन्म देणारा प्रतापगड आणि त्यांना राजसिंहासनावर बसविणारा दुर्गराज रायगड यांच्या स्मृतींनीं तें मन भरून गेलें आहे. या सर्व जुन्या स्मृतींची पवित्र आठवण करून मी परमेश्वराची प्रार्थना करतों, 'देवा, आम्हांला अशी दानत आणि शक्ति दे कीं, हें महाराष्ट्र राज्य जनतेचें राज्य होईल. तें राज्य लोककल्याणाकरितां झटेल आणि भारताच्या नकाशावरील ता-यांत एका नव्या तेजस्वी ता-याची भर टाकील.' मी तुम्हांला पुन्हा एकदां धन्यवाद देतो.