• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ३

तिस-या आवृत्तीची प्रस्तावना

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतरावजी चव्हाण ह्यांच्या 'सह्याद्रीचे वारे' या भाषणसंग्रहाची तिसरी आवृत्ती स्वातंत्र्यदिनी प्रसिद्ध होत आहे. हा एक दूर्मिळ व अपूर्व असा योग आहे. या आवृत्तीच्या प्रकाशनाची जबाबदारी आणि अधिकार महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचेकडे सोपविली असल्याने हे मौलिक कार्य करण्यास प्रतिष्ठानला अभिमान व आनंद वाटत आहे.

एखाद्या प्रसिद्ध कादंबरीस लाभावे अशा प्रकारचे यश आणि लोकप्रियता यशवंतरावजींच्या 'सह्याद्रीचे वारे' या भाषणसंग्रहास लाभली असून, त्यातील त्यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक राजकीय अशा अनेक प्रश्नांसंबंधी विचार समजून घेण्यास महाराष्ट्रीय जनता उत्सूक आहे याचे ही तिसरी आवृत्ती द्योतक आहे. मा. यशवंतरावजींचे विचार आणि मुद्दे महाराष्ट्राच्या आजच्या आणि उद्याच्या संदर्भातसुद्धा तंतोतंत लागू पडतात, यातून त्यांचे द्रष्टेपण स्पष्ट होते. चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राच्या भवितव्याचा अनेकविध बाजूनी फार दूरवरचा विचार केला होता. म्हणूनच सह्याद्रीचे वारे आजही तितकेच ताजे, टवटवीत आल्हादकारक आहेत.

पहिल्या दोन आवृत्तींत उल्लेख न केलेल्या एका मुद्याचा मी येथे मुद्दाम समावेश करीत आहे. आपल्या भाषणांचा संग्रह प्रसिद्ध करण्याचे मा. यशवंतरावजींनी निश्चित केल्यानंतर त्याच्या संपादनाचे काम त्यांनी त्यांचे निकटचे संबंधी श्री. हरी नारायण तथा दादा ठाकूर यांचेकडे सोपविले. अलिखित भाषणांचे संपादन बरेच जिकिरीचे व कष्टाचे असते, परंतु या भाषणसंग्रहाचे महत्त्व लक्षात घेऊन दादा ठाकूर यांनी अतिशय परिश्रम घेऊन मोठ्या आत्मीयतेने व निष्ठापूर्वक त्या संपादनाचे व प्रसिद्धीचे काम पार पाडले. सुमारे ६०-६२ ध्वनिलिखित (टेपरेकॉर्ड) भाषणांतून या संग्रहात समाविष्ट केलेल्या भाषणांची त्यांनी निवड करून ती संपादित केली. या सर्व कामाला दीड वर्षाचा कालावधी लागला. श्री. ठाकूर यांनी संपादन केलेला हा भाषणसंग्रह महाराष्ट्रात अतिशय गाजला व त्याला अमाप लोकप्रियता लाभली हे आपण जाणताच. मा. यशवंतरावजी त्यांना नेहमी म्हणत की हा भाषणसंग्रह संपादन करून प्रसिद्ध करण्यात तुम्ही जबरदस्त जादू केली आहे. ('जबरदस्त जादू' हे त्यांचेच शब्द आहेत.) परंतु मा. यशवंतरावजींचा आग्रह असतानाही या भाषणसंग्रहाचे संपादक म्हणून श्री. ठाकूर यांनी त्यावर आपले नाव घालू दिले नाही. चव्हाणसाहेबांना या गोष्टीची सतत जाणीव होती. याची कल्पना त्यांनी २२ एप्रिल १९८४ रोजी श्री. ठाकूर यांनी लिहिलेल्या पत्रावरून अधिक स्पष्ट होते, म्हणून ते पत्रच या प्रस्तावनेसोबत आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. (पत्र) पत्र पहाण्यासाठी येथे क्लिक करा

कै. यशवंतरावजी चव्हाण यांचे विस्तृत आणि सखोल वाचन, मनन आणि चिंतन यांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक भाषणातून, लिखाणातून स्पष्ट होते आणि म्हणूनच त्यांची साहित्यिक मूल्ये अधिक उंचीची वाटतात. याचा विचार करूनच अनेक विद्यापीठांनी हा भाषणसंग्रह क्रमिक पुस्तक म्हणून अभ्यासक्रमात स्वीकारला आहे. त्यांच्या या भाषणसंग्रहाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन आणि त्यानंतरच्या जीवनयात्रेत दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो. सर्व विद्यार्थिवर्ग आणि महाराष्ट्राचे नागरिक या तिस-या आवृत्तीचे मनोमन स्वागत करतील याची मला खात्री वाटते. जयहिंद-जयमहाराष्ट्र.

शरद पवार,
अध्यक्ष,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

नवी दिल्ली,
स्वातंत्र्यदिन, १९९२