राजकारणामध्यें, लोकांना सल्ला देऊन त्यांचे मार्गदर्शक व्हावयाची आपली जबाबदारी आहे असें जो मनुष्य मानतो त्याला, कुठलाहि प्रश्न हातांत घेतां क्षणीं त्या प्रश्नाच्या तात्त्विक मर्यादा समजल्या पाहिजेत. आणि आपल्या शक्तिच्याहि मर्यादा समजल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या तात्त्विक आणि शक्तीच्या मर्यादा जोपर्यंत त्याला स्पष्ट होत नाहींत तोंपर्यंत तो राजकारणांत मार्गदर्शन करूं शकत नाहीं अशी माझी भावना आहे. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जेव्हां गोत्यांत जातों आहे असें मला दिसलें, तेव्हां मीं या मर्यादा सांगितल्या. पण कांही गोष्टी ऐतिहासिक अपघातासारख्या घडत असतात. आणि तसाच कांहीं तरी ऐतिहासिक अपघाताचा प्रसंग डोळ्यांपुढें दिसतां क्षणीं मला या प्रश्नाच्या आणि मार्गाच्या मर्यादा सुचल्या. त्यांतील पहिली मर्यादा मीं अशी सांगितली कीं, आम्हांला हा प्रश्न सोडवावयाचा असेल तर तो शेवटीं भारतनिष्ठेंतून सोडवावयाला पाहिजे. आणि ही गोष्ट मी आपणांला अशासाठीं सांगतो आहें कीं, आज संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जरी सुटला असला तरी भारतनिष्ठेची जी आमची मूलभूत भावना आहे ती आम्हीं कायम ठेवली आहे. आज मुंबई शहरामध्यें अनेक वाद आहेत. बी. ई. एस्. टी. चा वाद आहे, आरेचा वाद आहे, आणखी लाख वाद आहेत; पण आज मुंबई शहरामध्यें मुंबईचा वाद शिल्लक राहिलेला नाहीं. मला सिंधी भेटतात, गुजराती भेटतात, मारवाडी भेटतात, मल्याळी भेटतात, सगळे भेटतात आणि सांगतात, ''फार बरें झालें. तुमची मुंबई तुम्हांला मिळाली. आतां आम्हांला सांगा आम्ही काय केलें पाहिजे तुमच्यासाठी म्हणून.'' हे त्यांचे शब्द खरे धरून आपण चाललें पाहिजे. आज गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्यें जशी कांही वांटणीच चालली आहे असें नाहीं, तर तीं नवीन दोन शेजारी राज्यें आज जन्मास येत आहेत. हा जो एक नवीन फरक झालेला आहे. तो फरक लक्षात घेऊन महाराष्ट्राला पुढची वाटचाल करावयाची आहे. म्हणून मी सांगतों की, या गोष्टीची मर्यादा आतां आपणांला समजली पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी आहे की, आपण जेव्हां आपले ईप्सित साध्य करण्याचे महत्त्वाचें काम अंगावर घेतों तेव्हां आवतींभोंवतीं आपण अकारण संशयाने पाहतां कामा नये. दिल्ली आमच्यावर अशा दृष्टीनें बघणार आहे, आणि गुजरातच्या मनामध्यें कदाचित् हें असेल, या आत्मविश्वासाच्या अभावाच्या दृष्टीनें आम्हीं आमच्या प्रश्नांकडे पाहतां कामा नये. आत्मविश्वासानें आपली शक्ति कोणती तें आपल्याला समजलें पाहिजे. आणि आपल्या शक्तीबरोबरच आपल्यामध्यें जे दोष आहेत त्यांचीहि मोजदाद आपण मनाशीं घेतली पाहिजे आणि या दोन्हींचा हिशेब मनाशीं बांधून मग आम्हीं आमचीं पावलें टाकली पाहिजेत.
माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मीं असें पाहिलें आहे कीं, कुठल्याहि राजकीय पक्षामध्यें थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षांच्या बाहेर असते, असें माझें स्वतःचे मत आहे. आणखी ती कांही अमक्याच एका पक्षाची बांधली गेलेली असते असेंहि नाहीं. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हें या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हें करतो तो राजकारणांमध्ये यशस्वी होतो असा आतांपर्यंतचा अनुभव आहे. आणि हाच अनुभव याच्यापुढेंहि राहणार आहे असें मी मानतों. गेल्या तीन वर्षांतील माझ्या कामांतले हें माझें एक मार्गदर्शक सूत्र आहे. अमका पक्षवाला काय म्हणतो त्यापेक्षा या सगळ्या पक्षांच्या बाहेर म्हणून जी कांही जनता आहे, जो बहुजनसमाज आहे त्याचा काय अंदाज आहे तें पाहून शहाण्या पक्षानें आणि शहाण्या राज्यकर्त्यानें आपलें धोरण ठरवावें. माझ्या कामांतले तुम्हांला जर कांहीं ट्रेड सीक्रेट पाहिजे असेल तर तें हें आहे. तें मी तुम्हांला आज देऊन ठेवतो. कारण तें माझ्या मालकींचें नाही. हा बहुजनसमाज - आतांपर्यत ज्या अर्थानें बहुजनसमाज हा शब्द वापरला जातो त्या अर्थानें मी तो येथें वापरीत नाही - स्वंतत्र मनानें विचार करतो, तो कुठल्याहि पक्षाला बांधला गेलेला नसतो. आपल्या पक्षाच्या वर्तमानपत्रांत आलेलें मत तें आपलें मत असें मानणा-या लोकांना मी पक्षवाले लोक मानतों.