• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १७१

लोकशाहीचा जो एक महान प्रयोग आपण सुरू केला आहे त्याबरोबर दुसरीहि एक गोष्ट ओघानेंच येते. आणि ती म्हणजे आपलें राष्ट्रीय नियोजन सुद्धां लोकशाही तत्त्वांशी सुसंगत असें असलें पाहिजे. या तत्त्वानुसार आपण आपल्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांची आंखणी केली आणि नुकतीच आपण आता आपली तिसरी पंचवार्षिक योजनाहि तयार केली आहे. नियोजनाचें हें काम अतिशय रोमहर्षक असून आपल्या मातृभूमीचे भवितव्य घडवून आणण्याच्या एका महान कार्यास नियोजनाद्वारे आपण प्रारंभ केलेला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्यें अशा रीतीने आपण वैशिष्ट्यपूर्ण बदल घडवून आणीत असून त्यामुळे जनतेच्या जीवनमानामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मातृभूमीचा एक अविभाज्य घटक या नात्याने महाराष्ट्र राज्य आपली योजना पूर्णतया यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि त्या बाबतींतील आपलें कर्तव्य चोख बजावील. आपल्या लोकशाही योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व पुढील पिढ्यांच्या हितासाठीं सध्यांच्या पिढीला कांही प्रमाणांत त्याग करावा लागेल यांत शंकाच नाही. परंतु हा त्याग ती मोठ्या आनंदानें करील याबद्दल मला खात्री आहे.

आपल्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आपल्या उत्पादनाच्या पातळींत वाढ होणार असून, या वाढत्या संपत्तीच्या वांटणीमध्ये आपण वेळींच लक्ष घातलें नाहीं तर समाजांत आणखी विषमता निर्माण होईल. ती टाळण्यासाठी जी उपाययोजना करावयाची ती करतांना आपणांस निव्वळ तात्त्विक भूमिका घेऊन चालणार नाही. स्थूल अर्थानें समाजवाद हें आपलें ध्येय आहे आणि ते गांठण्यासाठी आपण आपलीं सर्व धोरणें त्याला पोषक होतील अशाच प्रकारें आखली पाहिजेत. त्यासाठी आपण जे उपाय योजूं ते आपली परिस्थिती व परंपरा यांना अनुरूप असे असले पाहिजेत. ते तसे नसले तर ती आपल्याकडून फार मोठी चूक होईल. ज्याप्रमाणे नियोजनाशिवाय आपला आर्थिक विकास आपण पद्धतशीरपणें करू शकणार नाहीं, त्याचप्रमाणे लोकशाही उपाययोजनांद्वारे सामाजिक विषमता आपणांस दूर करता आली नाहीं तर आपलें राष्ट्र महान आपत्तींत सांपडेल. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे लोकशाही, नियोजन आणि समाजवाद ही लोककल्याणाच्या एकाच समस्येचीं तीन वेगवेगळी अंगे आहेत. आणि म्हणून एक तर ते तीनहि आधार कायम टिकतील अथवा कोसळले तर ते एकदम कोसळतील.

गेल्या महिन्यात पुणें शहरांत आलेल्या भयानक महापुरामुळे त्या ऐतिहासिक शहरावर जी आपत्ति ओढवली तिचा उल्लेख न करतां मीं माझें भाषण संपविले तर मी माझ्या कर्तव्यांत चुकलों असें होईल. या संकटामुळें जी हानि झाली ती अतिशय प्रचंड असून ती कदाचित् कोट्यवधि रुपयांच्या घरांत जाईल. आपल्या पंतप्रधानांनी अलीकडेच या शहराच्या उध्वस्त भागाला भेट दिली आणि तेथील लोकांनी ज्या पराकाष्ठेच्या हालअपेष्टा सहन केल्या त्या त्यांनी आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्या. विशेषत: अभूतपूर्व अशा या संकटामध्ये लोकांनी जी समतोल व शांत वृत्ति दाखविली त्यानें ते अतिशय प्रभावित झाले. सैन्य, मुलकी अधिकारी आणि खाजगी कार्यकर्ते व संस्था यांनी या शहराचे जीवन पूर्ववत् सुरू करण्याच्या कामीं पराकोटीचें सहकार्य केलें आहे. त्याचप्रमाणे या अतिकठीण प्रसंगी, या शहरांतील लोकांनी जें धैर्य व मनोबल दाखविले त्याचा फायदा या शहराची पुनर्रचना करतांना त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुणें शहराला पूर्वीपेक्षांहि अधिक चांगल्या स्थितींत आणण्याच्या कामीं सर्व त-हेनें कसोशीचे प्रयत्न करण्यांत येतील. मग त्यासाठी आम्हांला भगीरथ प्रयत्न करावे लागले तरी ते करण्याच्या कामी आम्ही कसूर करणार नाही, असें या पवित्र स्वातंत्र्यदिनी मी पुण्याच्या नागरिकांना आश्वासन देतों.