• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १७

आपण माझा शिवाजी महाराजांबरोबर आणि रानड्यांबरोबर उल्लेख केला. पण या सर्व खोट्या तुलना आहेत. या खोट्या तुलनेमध्यें तुम्ही फसूं नका आणि कृपा करून मला फसवूं नका असें माझें सांगणें आहे. एकच शिवाजी महाराज होऊन गेले आणि एकच टिळक होऊन गेले. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनीं घडवला ते शिवाजी महाराज आतां पुन्हा निर्माण होणार नाहींत. ब्रिटिशांच्या सत्तेखालीं दबलेल्या हिंदुस्तानला स्वराज्याचा जन्ममंत्र देणारे लोकमान्य टिळक एकदांच होऊन गेले. ते आतां पुन्हा होणार नाहींत. पुन्हा होणार नाहींत असें म्हणण्याचें कारण हिंदुस्तान पुन्हा परतंत्र होणार नाहीं हें आहे. शिवाजी महाराज व टिळक ह्या ज्यांच्यापुढें नतमस्तक व्हावें अशा महान् विभूति आहेत. आपण छोटीं माणसे आहोंत. मी कोणत्या मुशींत जन्माला आलों त्याची मला कल्पना आहे. १९३० सालानंतर जी मंडळी राजकारण करायला लागली अशा असंख्य कार्यकर्त्यांचा मी प्रतिनिधि आहे. शेंदोनशें वर्षांच्या इतिहासाचीं बीजें टाकायचें काम रानड्यांना आणि टिळकांना करावें लागलें. हिंदुस्तानच्या युगायुगाच्या राजकारणाचा पाया घालण्याचें काम शिवाजी महाराजांना करावें लागलें. पण आम्ही मंडळी छोट्या छोट्या लढाया करणारी होतों. या सातारा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांत आणि शेतीशिवारामध्यें मोठ्या संख्येंने आम्ही सैनिक म्हणून वावरलों आणि वाढलों. त्याच सैनिकांपैकीं मी एक आहे. आणि म्हणून दादांनी मला जेव्हां सांगलीस बोलाविलें तेव्हां याच भावनेनें मी येथें आलों; मला नाहीं म्हणणे शक्यच नव्हतें. या दक्षिण साता-याच्या एका माळावरच्या गांवांत एका गरीब घरामध्यें माझा जन्म झाला हें मला विसरता येत नाहीं. अशीं अनेक गरीब घरें अजूनहि आहेत. त्यांची माझ्या मनाला मोठी खंत आहे. या असंख्य घराघरांतून पडलेली जीं असंख्य माणसें आहेत त्यांना प्रकाशांत आणलें पाहिजे. हें नवें काम आतां आम्हांला करावयाचें आहे, नव्या महाराष्ट्राला करावयाचें आहे. त्याचप्रमाणें आजपर्यंत झालेल्या अनेक विचारवंतांनीं जीं तत्त्वें सांगितलीं आहेत त्या तत्त्वांचे मणी माळेंत गुंफण्याचें कामहि आतां करावयाचें आहे आणि हें काम ज्या पिढीकडे आलें आहे त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहें एवढाच माझा दावा आहे.

अक्काताई बाबर यांनी आज फार गोड भाषण केलें. माझ्यातर्फे मी लेखकांना एक विनंती करणार आहें, ती त्यांच्यापर्यंत अक्काताईंनी पोंचवावी अशी माझी अक्काताईंना विनंती आहे. नव्या महाराष्ट्रामध्यें मराठी भाषेचें काम आम्हांला करावयाचें आहे. जुने अमृतासारखे जे शब्द आहेत ते शब्द तर आम्हांला वापरायचे आहेतच, पण तुमच्या आमच्या जुन्या पिढीला माहीत नसणारे अमृतासारखे विचार अजून आपल्याला शोधून काढावयाचे आहेत. नवीन शास्त्रीय विचारांचा, शास्त्रीय ज्ञानाचा एक नवा इमला आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनामध्यें उभारावयाचा आहे. आणि या सगळ्या विचारांचे पोषण करणारे, त्यांना तोलणारे शब्द आणि भाषा तुम्हांआम्हांला निर्माण करावयाची आहे. हे काम नुसतें भूतकाळाकडे पाहून होणार नाहीं. महाराष्ट्राचें राज्य आपण निर्माण केलें, तें भूतकाळाच्या परंपरांना धरून, शिरावर घेऊन चालावावयाचें आहे. पण त्याचबरोबर भविष्यकाळाकडे नजर ठेवून, बदलत्या दुनियेचीं पावलें ओळखून, त्यामध्यें महाराष्ट्राचें, मराठी भाषेचें व मराठी भाषेला आणि महाराष्ट्रीयांना बरोबर घेणा-या भारताचे स्थान नेमकें कोठें आहे ते शोधून काढून आपल्याला ही यात्रा करावयाची आहे. हा विचार पुढच्या लेखकांनाहि करावा लागणार आहे ही गोष्ट मी त्यांना जरूर सांगू इच्छितो. किती तरी जबरदस्त मोठ्या विचारांचे आणि योजनेचें हे काम आहे !

आपण इथें इतकीं भाषणें केली. त्यांतून अनेकांच्या अनेक अपेक्षा मीं पाहिल्या. पण मी आपणाला सांगतो कीं, हें काम एक माणूस करूं शकणार नाहीं. आमच्यासारखीं माणसें आपण मोठी माणसें मानतां त्याचें कारण एकच आहे आणि तें हें कीं, योगायोगानें सामान्य माणसें मोठीं होतात व मोठमोठे प्रश्न हाताळण्याची त्यांना संधि मिळते.