• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १६४

माझा विरंगुळा

''माझा विरंगुळा'' या विषयावर बोलतांना माझ्या आयुष्यांतील अनेक आठवणींची साखळी आज माझ्या नजरेसमोर येत आहे. योगायोगानें म्हणा अगर स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणें प्रयत्नानें म्हणा, प्रत्येक माणूस स्वतःचें कार्यक्षेत्र निवडीत असतो. परंतु त्यांतहि त्याला स्वतःचा असा एक विरंगुळा म्हणून असतोच. कारण जीवनाच्या रोजच्या धकाधकींतून त्याला जे कांहीं विसाव्याचे क्षण मिळतात त्या वेळीं हा विरंगुळा त्याला जीवनांतील उच्च प्रतीचा आनंद मिळवून देत असतो. अर्थात् विरंगुळा माणसाला अनेक प्रकारें मिळूं शकतो. किंबहुना त्याला लाभणारा विरंगुळा हा त्याच्या आवडीनिवडीवर व व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतो. कारण तसें नसतें तर माणसाला ज्यामुळें विरंगुळा मिळतो त्यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू आपणांस दिसतेच ना. माझा विरंगुळा कशांत आहे ? माझ्या दृष्टीनें मोठा कठीण प्रश्न आहे हा. माझ्यासारख्या राजकारणांत प्रत्यक्ष जबाबदारीचें काम करणा-या माणसाला हा शोध घेणें कसें जमणार ? शिवाय ति-हाइताच्या दृष्टीनें स्वतःकडे पाहतां येणें ही सुद्धां मोठी अवघड गोष्ट आहे. हें जरी सर्व खरें असलें तरी सुद्धां ही गंमतीदार कसरत करण्याचा प्रयोग मी आज करणार आहें. इंग्रजीत ज्याला लाउड थिंकिंग म्हणतात तशाच प्रकारचें हें माझें चिंतन आहे.

मी जेव्हां माझ्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकतों त्या वेळीं प्रथम माझ्या मनासमोर जर कोणतें चित्र उभें राहात असेल तर मी ज्या ठिकाणीं वाढलों, खेळलों आणि ज्या ठिकाणीं माझें व्यक्तिमत्त्व घडलें त्या माझ्या क-हाड गावाचें. माझ्या पाठीमागच्या सर्व व्यापांतून सवड काढून क-हाडच्या प्रीतिसंगमावर मीं कांहीं काळ निवांतपणें घालवावा अशी इच्छा वारंवार माझ्या मनांत येते. सुदैवानें नुकतीच मला तशी संधि मिळाली आणि क-हाडच्या प्रीतिसंगमावर मी थोडा वेळ जाऊन आलों. त्या वेळीं भूतकाळांतील हृद्य आठवणींनीं माझे मन भरून आलें. माझ्या गतजीवनाचा चित्रपट झराझर माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. माझी आई, माझे बंधु व इतर कुटुंबीय मंडळी या सर्वांच्या प्रेमळ सहवासांत घालविलेले दिवस मला आठवले व त्यांच्या सहवासांत मिळालेल्या अपूर्व आनंदाच्या गोड स्मृति माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या. मी कितीहि थकलेला असलों तरी घरांतील आणि कुटुंबांतील प्रेमळ व निर्मळ वातावरणानें माझें मन उल्हासित होतें. देवघरांतील नंदादीपाच्या मंद प्रकाशामध्यें भाविकांच्या मनांत ज्या सुखद लहरी उठतात त्याचें वर्णन नुसत्या शब्दांने कसें करतां येणार ? भावनेची भाषा भावनेलाच समजते. कुटुंबांतील मंडळीमध्यें बसून हास्यविनोद करीत, गप्पागोष्टी करीत, वेळ घालविण्यांत केवढा आनंद असतो ! माझ्या कुटुंबातील मंडळींबरोबर अशा प्रकारें कांहीं वेळ घालविणें हा माझा एक आवडता विरंगुळा आहे.

लहानपणीं शाळेंत असतांना किंवा तरुणपणीं राजकीय चळवळींत रमलों असतांना मला कधीं कधीं काव्यकल्पना सुचत आणि मी त्या वेळीं कागदावर देखील उतरीत असें. कॉलेजांत असल्यापासून काव्य आणि साहित्य यांचें मला फार मोठें आकर्षण वाटत असे आणि अद्यापिहि तें वाटतें. म्हणून आज देखील वेळांत वेळ काढून साहित्याची गोडी मी चाखतो आणि त्यामुळें मला मनमुराद आनंद मिळतो. मराठींतील कादंबरीकारांपैकीं श्री. खांडेकर यांच्या भावनाप्रधान कादंब-या आणि श्री. फडके यांच्या प्रणयप्रधान कथा मीं अनेक वेळां अतिशय उत्सुकतेनें वाचल्या आहेत आणि त्यांचा आनंद लुटला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयांतील गोडवाहि मीं अतिशय भाविक मनानें चाखला आहे. ज्ञानेश्वरांचें काव्य हा मराठी भाषेचा महान् ठेवा आहे. साहित्यिकांच्या शब्दांतील अफाट सामर्थ्य पाहून कित्येक वेळां आपलें मन थक्क होतें. मॅक्झिम गॉर्की यांची ''आई'' ही कादंबरी मीं ज्या वेळीं प्रथम वाचली त्यावेळी माझ्या हृदयांत अतिशय कालवाकालव झाली. असें कांहीं अक्षर वाङ्मय वाचलें कीं, आपण आपलें स्वत्व क्षणभर विसरून जातों, आणि सुखाच्या निवांत क्षणांत रममाण होतों.