• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १५१

डॉ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा वारसा

आजच्या या समारंभाला हजर राहतांना मला कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे असें मी म्हटलें तर त्यांत फारशी अतिशयोक्ति होईल असें मला वाटत नाहीं. या दीक्षा मैदानाची मागणी गेल्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीं झाली होती. आणि त्याच दीक्षा मैदानावर आपल्या स्मारकाचा हा कोनशिलासमारंभ या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीं होत आहे, हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. योगायोगावर माझा फारसा विश्वास नसला तरी जुळून आलेले योगायोग नजरेंत भरतात हें सांगावयास मला कांहीं संकोच वाटत नाहीं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचें हें जें स्मारक होत आहे, त्यांत सहभागी होतांना माझ्या मनाला अकृत्रिम आनंद होत आहे. या आनंदामध्यें कुठलीहि राजकीय अगर कुठलीहि धार्मिक भावना नाहीं, हें मी पहिल्या प्रथम आपणांस सांगूं इच्छितों.

आपल्या पक्षाचे अध्यक्ष श्री. शिवराज यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कित्येक तपें काम करण्याची संधि मिळाली होती. म्हणून बाबासाहेबांच्याबद्दल त्यांना अतिशय आदर आहे. आपल्या समाजाचे बाबासाहेब मोठे नेते व उद्धारकर्ते होते म्हणून आपणांला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. त्यांच्या अनेक राजकीय शिष्यांनाहि त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु यांपैकी कुठलेंच नातें सांगण्याचा मला अधिकार नसतांनाहि त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो हाच माझा विशेष अधिकार आहें, हें आपण कबूल केले पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होण्याचें भाग्य मला लाभलेलें नाहीं, किंवा बुद्ध म्हणवून घेण्याचेंहि भाग्य लाभलेलें नाहीं. परंतु स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यांत मला जरूर अभिमान वाटतो. असे असतांनाहि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला आदर आहे. अगदी अकृत्रिम आदर आहे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे.

श्री. शिवराज यांनीं जे मुद्दे येथें मांडले त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा नाहीं आणि त्यासाठीं मी आलोंहि नाही. परंतु मी आपणांला सांगूं इच्छितों कीं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही हिंदुस्तानच्या राजकारणांत अतिशय महत्त्वाची अशी व्यक्ति होऊन गेली. त्यांच्या मतांशीं सहमत नसणा-या माणसांना सुद्धां त्यांच्याबद्दल आदर बाळगावा लागला, त्यांचें सहकार्य घ्यावें लागलें, त्यांची मदत घ्यावी लागली. हा मदत देणा-यांचा जसा मोठेपणा होता, तसाच तो मदत घेणा-यांचाहि मोठेपणा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळांत जें काम केलें, आणि त्या वेळच्या परिस्थितींत उपस्थित झालेल्या प्रश्नांना त्यांनीं ज्या पद्धतीनें तोंड दिलें, त्या सर्व गोष्टी इतिहासप्रसिद्ध आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनांतून निर्माण होणा-या ज्या तत्त्वप्रणाली आहेत, त्यांनीं दिलेले जे आदेश आहेत, किंवा त्या वेळच्या विशिष्ट परिस्थितींत ज्या पद्धतीनें ते वागले त्यांतून निर्माण होणारे जे दृष्टिकोन आहेत त्या सर्वांची, तुमच्या माझ्यापुढें आणि देशापुढें आज जे प्रश्न उभे आहेत, ते सोडविण्याच्या कामीं कितपत मदत व मार्गदर्शन मिळेल या दृष्टीनें त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा, त्यांच्या जीवनाचा एक विद्यार्थी म्हणून मी प्रयत्न करीत असतों.

स्वातंत्र्याच्या चळवळींत निकरानें काम करणारीं अशीं जीं अनेक पक्षांतून विखुरलेलीं माणसें होतीं त्या माणसांमधील मी एक साधा शिपाई आहें, आणि स्वातंत्र्याच्या चळवळींत आपण मेलों तरी हरकत नाहीं पण स्वीकारलेंलें काम पूर्ण केलें पाहिजे असें समजणारी जी एक पिढी होती त्या पिढीचा मी एक सामान्य प्रतिनिधि आहें. पण तें काम करीत असतांना सुद्धां दलितांसंबंधीं आणि त्याचबरोबर सामाजिक एकता व सामाजिक न्याय यांसंबंधीं तिडिकीचा जो विचार बाबासाहेब मांडीत होते तो विचार, विचार करण्यासारखा आहे, त्याचा आम्हांला स्वीकार केला पाहिजे, त्याकडे आम्हांला पाठ फिरवतां येणार नाहीं, हीहि भूमिका आम्ही मान्य करीत होतों.