कांहीं दिवसांपूर्वी मीं एका चांगल्या लेखकाचा लेख वाचला. त्यांत मला एक फारच महत्त्वाचा विचार सांगितलेला दिसला. तो विचार मला येथें सांगितल्याशिवाय राहवत नाहीं. आजच्या हिंदुस्तानच्या संदर्भात त्यानें आपल्या नियोजनाचीं दोन सर्वांत महत्त्वाची साधनें सांगितलीं आहेत. त्यांतलें पहिलें साधन म्हणजे मनुष्यबळ आणि दुसरें साधन म्हणजे वेळ. चाळीस कोटि लोकांचा हा देश कांहीं न करतां जर फुकट एक वर्ष बसून राहिला तर आमची फार मोठी शक्ति वायां गेली असें होईल. कारण त्या श्रमाच्या बळावर आम्ही कितीतरी पुढें गेलों असतों. आणि दुसरें म्हणजे जग त्या काळांत आमच्या कितीतरी पुढें निघून जाईल. म्हणून महाराष्ट्रांतील तीन कोटि जनतेच्या मनांत विफलतेची, विषादाची आणि पराभवाची भावना निर्माण करून महाराष्ट्रांत असंतोषाचें वातावरण पसरविण्याचा जे प्रयत्न करतील ते महाराष्ट्राचें फार मोठें नुकसान करतील. मला त्यांना सांगावयाचें आहे कीं, कृपा करून ह्या गोष्टी बंद करा. इंग्रजांविषयीं नेपोलियन एकदां म्हणाला होता कीं ह्या वेड्यांना आपला पराभव केव्हां झाला हेंच कळत नाहीं. नेपोलियनच्या शब्दांत थोडा फरक करून मी या वेळी सांगूं इच्छितों कीं आमच्या विरोधकांना आणि आमच्या कांही मित्रांना आमचा जय केव्हां झाला हेंच कळलें नाहीं. म्हणून मला त्यांना सांगावयाचें आहे कीं ही पराजयवादी वृत्ति लोकांच्या मनांत निर्माण करून आपण महाराष्ट्राची शक्ति वायां घालवूं नका. आज खेड्यांतल्या शेतक-यांमध्ये, फॅक्टरीमधल्या मजुरांमध्ये, शहरांतल्या विद्यार्थ्यांमध्यें सगळीकडे नवी शक्ति निर्माण झाली आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्यें आनंदाचा, सोहळ्याचा क्षण निर्माण झाला आहे. ही नवी शक्ति उभी करण्याचें तुम्हांआम्हांला इतिहासाचें आव्हान आहे. तें आम्ही स्वीकारणार कीं नाहीं यावर आमचे पुढील जीवितकार्य अवलंबून आहे. कोणाला कांही वाटो, मला तरी महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल दुर्दम्य आशा आहे, माझा तसा विश्वास आहे. एवढी कर्तृत्ववान परंपरा असणा-या, अनेक जाती आणि जमाती असणा-या, शिवाजीच्या परंपरेनें शोभायमान झालेल्या महाराष्ट्राचा इतिहास असा अडून बसणार नाहीं. तो पुढें पुढें जाणार आहे. तो महाराष्ट्राचें जीवन उज्ज्वल करील. एवढेंच नव्हे तर जी मानवी मूल्यें आम्हांला आमच्या परंपरेंतून मिळालेली आहेत त्यांच्या बळावर मानवी जीवनाची सेवा करण्यांतहि तो मागें हटणार नाहीं, असें एक स्वप्न महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत मला दिसतें आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे. त्या सफरींतील आम्ही प्रवासी आहोंत ही भावना नम्रतेनें आपलें प्रत्येक पाऊल टाकतांना आपण आपल्या मनाशीं ठेवली पाहिजे. माझ्या आवतीभोंवती बसणा-या माझ्या मित्रांकडे, माझ्यापेक्षां वडीलधा-या मंडळींकडे, माझ्यापेक्षा लहान असणा-या उगवत्या पिढीकडे मी याच भावनेनें पाहतो आहें. याच एका भावनेनें आपण वागलों तर मला वाटतें कीं, ही जी सफर तुम्हांआम्हांला पुरी करावयाची आहे ती पुरी करण्यांत आपण निश्चित यशस्वी होऊं. आज मी असा आपणांशी बोलत असतांना ती सफर मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे, विजेच्या प्रकाशनानें लखलखल्यासारखी दिसते आहे. ती लांबची सफर आहे, कष्टाची सफर आहे, उद्योगाची सफर आहे. पण ती पुरी केलीच पाहिजे. कारण त्यामध्यें जनतेचें कल्याण आहे.