• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १४०

लोकमान्यांचें व्यक्तिमत्त्व हें अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांपैकीं आहें. कांहीं मोठी माणसें अशीं असतात कीं त्यांच्या जीवनकालामध्यें त्यांच्या मोठेपणाचें महत्त्व इतरांना समजत नाहीं. त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी त्यांचा मोठेपणा इतरांना समजतो. अशी माणसें जगाच्या इतिहासांत कमी नाहींत. आणि अगदीं महाराष्ट्राच्या इतिहासांतहि कमी नाहींत. लोकमान्यांच्या बरोबरच ज्यांचें नांव घेतलें जातें त्या आगरकरांच्या नांवाचा या बाबतींत आपणांला उल्लेख करतां येईल. परंतु ज्यांचें मोठेपण त्यांच्या हयातींतच इतरांना प्रतीत होतें अशा थोड्या भाग्यवान महापुरुषांपैकीं लोकमान्य हे एक होते. त्यांना आपल्या जीवनामध्यें जरी खूप हालअपेष्टा आणि संकटें सहन करावीं लागलीं, तरी लोकप्रियतेची - लोकांनी मनोभावानें त्यांच्या कामाचें चीज करण्याची - जी शक्यता होती ती शक्यता, तिचा आनंद, तिचें सुख त्यांना त्यांच्या जीवनामध्यें पाहावयास सांपडलें. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आज इतक्या कालावधीनंतरहि, एवढेंच नव्हे तर आधुनिक भारताचा इतिहास जोंपर्यंत अभिमानानें लिहिला जाईल आणि वाचला जाईल तोंपर्यंत लोकमान्यांच्या जीवनासंबंधानें या देशांतील प्रत्येक मनुष्य अभिमानाने सांगेल कीं त्यांचें जीवन हा आमचा मोठेपणा आहे. एवढें मोठें व्यक्तिमत्त्व लोकमान्यांचें आहे.

पण आपणांला हें असें कां वाटतें याचें कारण अगदीं उघड आहे. कंसवधाच्या वेळीं मथुरेंत शिरलेला कृष्ण अनेकांना अनेक त-हेचा दिसला, असें त्याचें वर्णन केलें जातें. लोकमान्यांकडे माणसें अशाच अनेक दृष्टींनीं पाहूं शकतात. संपादक लोकमान्य, गृहस्थ लोकमान्य, नेता लोकमान्य, वक्ता लोकमान्य; लेखक लोकमान्य, संशोधक लोकमान्य, विद्वान लोकमान्य, तत्त्वज्ञ लोकमान्य - अशा अनेक दृष्टींनीं त्यांचें आपणांस दर्शन होतें. या सगळ्या दृष्टींनीं त्यांच्याकडे पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर या प्रत्येक क्षेत्रामध्यें लोकमान्यांचें स्वतःचें असें एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे, असें आपणांस दिसून येईल. एवढेंच नव्हे तर या प्रत्येक क्षेत्रांतील त्यांचें कार्यच असें आहे कीं त्या त्या क्षेत्रांतील मोठेपण त्यांच्याकडे चालून यावें. एवढें मोठें व्यक्तिमत्त्व लोकमान्यांचें होतें.

पण या सगळ्या गोष्टी त्या त्या क्षेत्रांतले तज्ज्ञ त्या त्या विषयासंबंधानें बोलतांना आपणांला सांगतील, मी कांहीं तसला विषय घेऊन बोलत नाही. अगदी सामान्य माणसाच्या नजरेनें या वेळच्या लोकमान्यांच्या जीवनाकडे पाहायचा मीं प्रयत्न केला आहे. आणि अनेक वेळां ही गोष्ट मी महाराष्ट्रामध्यें जाहीरपणानें बोलत असतों की लोकमान्यांचें मोठेपण तारुण्याच्या उंबरठ्यावर ते उभे असतांना त्यांनीं जो देशसेवेचा निर्णय घेतला त्यांत आहे. आणि इतक्या दिवसांच्या अवधीनंतरहि त्यांनीं घेतलेल्या त्या निर्णयाचा विचार मनाशीं आला म्हणजे आजसुद्धां मन हेलावून जातें. डेक्कन कॉलेजमध्यें विद्यार्थी असतांना अहोरात्र आपल्या सहाध्यायांशीं देशाच्या प्रश्नांची चर्चा करून शेवटीं एक महत्त्वाची पदवी-तेव्हांची, आजची बी.ए. किंवा एल्.एल्.बी. नाहीं - त्यांनीं घेतली. आणि त्यानंतर त्यांनीं आणि आगरकरांनीं स्वतःच्या जीवनासंबंधीं असा निर्णय घेतला कीं आपलें सबंध जीवन सातत्यपूर्वक देशाच्या कामाकरितां द्यावयाचें. हा निर्णय घेणारी आगरकर आणि टिळक यांची जोडी त्या वेळच्या डेक्कन कॉलेजच्या आवारामध्यें कशी हिंडली असेल, त्यांनीं तेथें काय काय वादविवाद केले असतील, याची कल्पना आजहि त्या बाजूनें गेल्यानंतर मनांत आली म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात.

त्या काळांत लोकांच्या मनांत काय कोडें होतें तें मी आपणांला सांगूं इच्छितों. त्याचें उत्कृष्ट वर्णन एका वाक्यामध्यें शिवरामपंत परांजप्यांच्या एका लेखामध्यें केलेलें मीं पाहिलें आहे. त्या काळांतील अत्यंत बुद्धिमान आणि स्वाभिमानी माणसांच्या मनापुढें, त्यांच्या विचारांपुढें आणि त्यांच्या जीवनापुढें पडलेलें कोडें एका अतिशय सुरेख वाक्यामध्यें शिवरामपंतांनीं सांगितलें आहे. त्याकाळीं लोकांची अशी परिस्थिति होती कीं, ''जें होतां येत होतें पण व्हावेसें वाटत नव्हतें आणि जें व्हावेंसे वाटत होतें तें होतां येत नव्हतें.'' अशी ही अडचण होती तेव्हांची. त्या काळांत अत्यंत बुद्धिमान अशा तरुणांच्यापुढें ही फार महत्त्वाची जीवनसमस्या होती. त्यांना होतां येणें - काय वाटेल तें होतां येणे शक्य होते. लोकमान्यांनीच सांगितले होतें एकदां त्यांना काय होणें आवडलें असतें तें. गणिताचा प्रोफेसर होण्याची त्यांची इच्छा होती. विज्ञानाच्या या क्षेत्रांत संशोधन करावें आणि स्वतःच्या कर्तबगारीनें आणि संशोधनानें त्या क्षेत्रामध्यें एक नवीन दालन उघडावें, अशा त-हेची त्यांची खरी इच्छा होती.