मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५८

५८.  अगत्याचा माणूस – अनंत माने

मा. नामदार यशवंतरावजी चव्हाण यांची अमर स्मृती. १९५९ सालची गोष्ट आहे. माझा ‘सांगते ऐका’ चित्रपट फारच गाजला होता. त्याच्या शतक महोत्सवी समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. यशवंतरावजींना बोलवावे असे ठरले. योगायोगाने श्री.यशवंतरावजी त्या वेळी पुण्यात आले होते. श्री.बाबुराव सणस यांचे ओळखीने श्री.यशवंतरावजींना भेटणेस गेलो. वेळ रात्रीची होती तरी त्यांचे भोवती लोकांचा गराडा फारच मोठा पडला होता. मी श्री. बाबुराव सणसांचे बरोबर कसातरी श्री. यशवंतरावजींजवळ पोहोचलो व श्री. यशवंतरावजींना ‘सांगते ऐका’चे बुकलेट दिले. आणि मोठ्या उत्साहाने विनंती केली की, ‘या चित्रपटाचे शतक महोत्सवी प्रमुख पाहुणे म्हणून आपण यावे’. पण त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘‘मला कामाच्या येवढ्या सगळ्या रगाड्यात तुमच्या सिनेमा समारंभ वगैरेंना हजर राहता येणे शक्य नाही.’’ हे ऐकताच माझ्या सा-या उत्साहावर, आनंदावर विरजण पडले. मी हताश मनाने, जड पावलाने, बाहेर पडलो. माझ्या मनात नकळत श्री. यशवंतरावजींचे विषयी अढी बसली. पण तिकडे श्री. यशवंतरावजींना त्या सर्व कामाच्या रगाड्यातही मनात कुठेतरी खुपले असावे की, आपण आज एका मराठी माणसाला त्याच्या आमंत्रणाला नकार देऊन निराश केलं, दुखवले! याची त्यांना खंत लागली असावी, असे आज मला वाटते. कारण की, त्याचे असे झाले. मी काही कारणांसाठी श्री. ग. दि.माडगूळकर यांचेकडे गेलो होतो. तिथे काँग्रेसचे त्या वेळचे पदाधिकारी श्री. रंगराव पाटील यांची भेट झाली. श्री. यशवंतरावजींच्या विषयीच्या माझ्या मनातील संवेदना मी त्यांना बोलून दाखवल्या. आणि म्हणालो, ‘‘सांगते ऐका’ सारख्या शतक महोत्सवी मराठी चित्रपटाचे आमंत्रण त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारले. त्या अर्थी त्यांच्या मनात मराठी माणसाविषयी काहीच अस्मिता दिसत नाही.’’ त्यावर ते जास्त काही बोलले नाहीत. पण त्यांना मनोमन असे वाटत असावे की, श्री. यशवंतरावजी तसे नाहीत. श्री. यशवंतरावजींनी मराठी माणसासाठी आपला देह झिजवला आहे. पण मला त्या वेळी जास्त कांही न बोलता त्यांनी हसत हसत वेळ मारून नेली. आणि मला वाटते या दरम्यान श्री. यशवंतरावजींची त्यांची भेट झाली असावी व त्यांनी माझी खंत श्री. यशवंतरावजींना सांगितली असली पाहिजे. पुढे ७-८ वर्षांचा काळ लोटला. मी १९६७ साली दिल्लीला गेलो होतो. माझेसमवेत लेखक श्री. शंकर पाटील, नेमाडे, दामले, सामंत वगैरे मंडळी होती. आम्ही यशवंतरावजींची भेट घ्यायचे ठरवले. आणि त्यानी आवर्जून आम्हाला भेटायला बोलावले. वेळ रात्री ९ ची ठरली. आम्ही सर्व भेटायला गेलो. श्री. यशवंतरावजी आमचे स्वागत करीत मला अगत्त्यानी आणि आपुलकीने म्हणाले, ‘‘या, या, या अनंतराव’’ असे म्हणत प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला जवळ बसवून घेत म्हणाले, ‘‘अनंतराव तुमचा आमच्यावर राग आहे.’’ मी गोंधळलो. मला काहीच कळेना. कारण मागील प्रकरण ८-९ वर्षात मी पार विसरून गेलो होतो. ते म्हणाले, ‘‘तुमचं सांगते ऐकाच्या शतक महोत्सवी आमंत्रण मी नाकारले होते म्हणून तुम्ही रागावला होता, पण खरोखरीच त्या वेळी कामाच्या रगाड्यात मला येणे अवघड होते. पण तुमची निराशा केल्याबद्दलची खंत मनात राहून गेली होती. म्हणून वेळात वेळ काढून कराडच्या मुक्कामात मी कुणालाही न कळवता ते चित्र पाहिले. मला आवडले येवढेच नव्हे तर प्रत्यक्ष खेडेगाव, त्यातील समस्या, बारकावे यांचा साक्षात्कार एक मराठी दिग्दर्शकांनी दिल्याबद्दल अभिमान वाटला’’ असे म्हणून त्यांनी पुन्हा खांदा थोपटला. मला गहिवरून डोळे पाण्याने डबडबले. मी पटकन् त्यांचे पाय धरले. येवढ्या विशाल अंत:करणाच्या माणसाकडून प्रशंसा ऐकून कृतार्थ वाटले, आणि ८-९ वर्षे झालेल्या माझ्या गैरसमजाचा डोळ्यातील अश्रूंनी निचरा झाला.