मग मी थोडा विचार केला. आणि सौ. वेणूतार्इंना अडचणीत न टाकता नकार कसा द्यायचा ते मनाशी जुळवलं. ‘‘साहेब, तुम्ही मुंबईला होता आणि १९६२ मुळे तुम्हाला दिल्लीला बोलावले तेव्हाच आपली प्रतिमा आता फक्त ‘मराठी’ न राहता आंतरराष्ट्रीय होणार याचा विचार करून वेणूतार्इंना शिकवणी का नाही ठेवली? आता झटपट रंगारी पद्धतीने काही केलं तर त्यांना ते सहज जमणार नाही आणि मलाही यशच मिळवायचे झाले तर जिद्दीने सारा दिवस तेच करावे लागेल. ११ ते ५ नोकरी, मुलांची जबाबदारी, मला एवढा वेळ काढता येणार नाही. मी दिलगीर आहे.
आणि इतके दिवस त्यांची तुम्हाला उत्तम सोबत झाली ती इंग्रजीत न बोलताच ना?’’
त्यांना पटले असावे. कारण पुन्हा तो विषय माझ्यापर्यंत तरी पोचला नाही. ‘‘ह्यांची इच्छा आहे तर या तुम्ही बाई. पण मला कामचलाऊ इंग्रजी समजतं. परक्या कुणाबरोबर इंग्रजीतून फाडफाड बोलायची माझी आवडच नाही. माझ्या माणसांशी बोलायला मराठी-हिंदी पुरतं.’’ असं सांगणा-या डोळ्यांमध्ये कारुण्य असलेल्या प्रौढ वेणूतार्इंची मास्तरीणबाई होण्याची मी नाकारले तरी त्याचा दंश साहेबांनी मनात ठेवला नाही.
दिल्लीमधल्या महाराष्ट्रीय मंडळींनी खटपट करून भरवलेले मुलांच्या पुस्तकांचे प्रदर्शन उद्घाटक यशवंतराव चव्हाण. मोजकेच आणि समोर मुले आहेत हे भान ठेवून झालेले त्यांचे भाषण. चहापानाच्या वेळी मोजकीच मंडळी तळघरात पोचलेली. आपण नजरेच्या टप्प्यात राहावे, आपल्याचकडे बघून ते हसतायत असे वाटण्याइतके जवळ पोचावे, उगीच मोठ्याने ‘मार्मिक’ बोलून आपण ‘वर्तुळातले’ आहोत असे दाखवावे आणि स्थळकाळप्रसंगाचा विवेक न करता अकारण नटवा पोषाख करावा हे कसब राजधानीमध्ये अनेकांच्या अंगात आहे. याचा विराग वाटून सरळ कडेकडेने पुस्तके पाहात राहणारीही माझ्यासारखी काही होती.
टेबलाच्या एका कोप-याला साहेब उभे होते. त्यांच्या अगदी जवळ कोणीच नव्हते. नुकताच परदेशातून आलेला माझा धिटुकला छोटा मुलगा छोट्याशा बहिणीचे बोट धरून बूट वाजवीत तिथे पोचला आणि त्यांच्याच बशीतून वेफर्स खाऊ लागला. त्यांच्याशी इंग्रजीत बोलूही लागला. ते पण कौतुकाने रमले होते. खाऊन झाल्यावर मुले त्यांना ‘बायबाय’ म्हणाली. ही कुणाची मुलं असावीत असे कुतूहल आता ब-याच जणांना वाटत होते. गर्दीतून नेमकी मुलं माझ्यापर्यंत आली. म्हणाली, ‘‘ममी, दॅट नाइस मॅन हॅड अॅन अनक्राउडेड टेबल. द ओनली वन. व्हाय?’’
‘‘ते आजचे मुख्य पाहुणे आहेत बाळा.’’ ‘‘ओ, गुड आय गेव्ह हिम कंपनी.’’ मुले ओरडली. आता मात्र मलाही हसू आवरेना आणि मुलांच्या डोक्यावरून माझ्याकडे पाहणा-या साहेबांनाही! कृत्रिम शिष्टाचाराच्या जगातही अंगभूत सौजन्य न सोडणारे आणि तरीही राजकारणी असे लोक दुर्मिळच. यशवंतराव त्यापैकी एक माणूसं जोडायचं त्यांना व्यसन होते म्हटले तरी चालेल.
-३-
त्यांना शेवटून दिल्लीत पाहिले ते भैरवीसारखं. पावसाळी दिवस होता. मी २-४ दिवसांपुरती पुण्याहून दिल्लीला गेलेली. ना.धों.महानोरांचे काव्यगायन साहेबांच्या घरी होते. मोजकी मराठी मंडळी. श्री.माधव पटवर्धन माझे मावसभाऊ. त्यांच्याबरोबर मी तिथे गेले. वातावरण पावसाने कुंद. सत्तेवर नसलेले, चेह-यावर मनस्तापाच्या खुणा वागवणारे यशवंतराव, आग्रहाने सर्वांना पाठवलेली कॉफी. टोपी काढून निवांतपणे साहेब कविता ऐकत होते. उदास होते. फारसे कुणाशीच बोलले नाहीत. एकटे वाटले. वेणूताई गेल्यानंतर साहेबांचा चेहरा पुन्हा कधी उमललाच नाही मनापासून.