९९. भारतीय खेळांचा त्राता: यशवंतराव चव्हाण – शंकरराव साळवी
भारतीय खेळाडू खुद्द भारतातही उपेक्षिलेले. कुठे संघटना कमी पडते, तर कुठे शासकीय पाठिंबा तोकडा पडतो. यातून खेळाडूंचा उत्साह कमी होत जातो. या पार्श्वभूमीवर या खेळांच्या विकासासाठी, वाढीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांना उत्साह देणारे, नवीन कल्पनांना पुढे नेणारे, भूमिकानिष्ठ आणि रसिक नेतृत्व म्हणजे ना.यशवंतराव चव्हाण. यांच्या नेतृत्वाची जाण आमच्या धडपडणा-या संघटनांना कार्यक्षम ठेवण्यात नेहमीच उपयोगी ठरली आहे. कबड्डी, खोखो, कुस्ती, आट्यापाट्या या सर्वही खेळांबद्दल यांना कळकळ होती. ज्या संघटनांच्या संचालकांनी त्यांची साथ घेतली त्यात अखिल भारतीय स्वरूपात चांगला बदल झालेला दिसतो. यशवंतराव त्या संघटनांमागील खंबीर नेतृत्व होते.
कबड्डी हाच खेळ घ्याना ! आज आपल्याला हे कबड्डीचे पीक देशाच्या कानाकोप-यात वाढलेले दिसते आहे. कबडीचा दम देशाच्या प्रत्येक भागातून घुमताना दिसतो आहे. एवढेच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, सिंगापूर, जपान यांसारख्या महत्त्वाच्या आशियायी देशांतही या संघटना नव्याने पसरल्या आहेत. वर्षाकाठी आज भारतात जवळजवळ २५०-३०० कबड्डी सामने सहज होतात. ‘‘गल्ली ते दिल्ली’’ असा खेळाचा प्रसार. या सर्व गौरवाचे मागे असलेल्या कष्टांना महत्त्वाचा आधार यशवंतरावांचाच; त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रत्यक्ष सहभागाचा, निखळ उत्साहाचा. म्हणूनच कबड्डीच्या संबंधित सर्वांनी त्याबद्दल त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.
भारताच्या वेगवेगळ्या भागात चित्रविचित्र नावानी ओळखला जाणारा हा खेळ. महाराष्ट्रात हुतुतू, कर्नाटकात चिटुगुडू, प.बंगालमध्ये हाडुहुड. त्यांच्या नियमावलीही वेगळ्या. थोडक्यात प्रश्न होता तो या बहुगुणी वेगवान खेळाला एका नियम संस्थेच्या नियंत्रणाखाली आणून अखिल भारतीय स्वरूप देण्याचा उत्साही व आर्थिक बळासाठी यशवंतरावांनी आपल्या आपुलकीने जवळ केले. आमच्या प्रत्येक नवीन कल्पनेला त्यांनी मान्यता दिली. आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नही केले. ‘‘एक खेळ, एक संघटना’’ याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे यशवंतराव मुख्यमंत्री असताना १९६९ साली मुंबईत आयोजित झालेली पहिली कबड्डीची राष्ट्रीय स्पर्धा. स्थळ होते सेंट झेविअर्स कॉलेजचे क्रीडांगण. प्रथमच झालेल्या या कबड्डीच्या सोहळ्यात व धुराळ्यात प्रेक्षक अक्षरश: हरवून गेले. पण हरवून गेले ते स्वत: यशवंतराव ! त्यातूनच दरवर्षी ‘‘आंतरभारती’’ द्वारे अशा सामन्यात महाराष्ट्राने रंगून जावे या यशवंतरावांच्या प्रेरणेतूनच ‘‘आश्विनकुमार भोईर सुवर्णचषक’’ स्पर्धेचा जन्म झाला. मी हट्ट धरला. सामन्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हवेत म्हणून. यशवंतरावांनी तात्काळ ते मान्य करून उद्घाटनासाठी खरोखरच पंडितजींना पाचारण केले. गर्दी आणि उत्साह खूपच वाढला. ‘‘भोईर चषक’’ महाराष्ट्रात कित्येक स्थानांवर आजपर्यंत उत्साहाने साजरा होत आला आहे.
खेळाडूंना त्यांच्या खेळाकडे पूर्ण लक्ष पुरविण्यासाठी आर्थिक संरक्षण मिळणे आवश्यक असतेच. विशेषत: देशी खेळाद्वारे ते स्थैर्य फारसे मिळू शकत नाही. म्हणूनच यशवंतराव खेळाडूंना क्रीडांगण गाजवल्यानंतर गौरवचिन्हे देऊनच थांबले नाहीत, तर त्यांना बँक व सरकारी कचे-या यांतही अशा खेळाडूंसाठी नोकरीच्या सोयी करून देण्याचा विचार केला. या योजना कार्यान्वित श्री.शरद पवारांनी केल्या. तरी मूळ उगम यशवंतरावांकडूनच झालेला आहे. पायाशुद्ध कृतींची सवय असल्यामुळे यशवंतरावांना कला, साहित्य, क्रीडा यांच्या स्वतंत्र हेतू असलेल्या संस्था अस्तित्वात असाव्यात असे फार वाटायचे.
यशवंतरावांनी फक्त प्रेक्षकांचा आणि खेळाडूचांच विचार केला नाही तर त्याहूनही आपुलकीने त्यांचे कार्यकर्त्यांच्या सोयीकडे बारकाईने लक्ष असे. माझ्या रशिया, इंग्लंड, रोम, पॅरिस अशा परदेशी दौ-यांची त्यांनी नेहमीच पडद्याआडून काळजी घेतली. कुठेही वाच्यता न करता सहानुभूती म्हणूनच त्यांनी अशा वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष पुरवले. एखादा विश्वासाचा वा भरंवशाचा माणूस मिळाला की त्याच्यामागे यशवंतराव पूर्ण उभे रहात असत. ते सर्व वैयक्तिक व शासकीय पाठिंबा देऊन!
मुंबईत मिलकामगारांचे वार्षिक कबड्डी सामने चालू होते. त्याचा बक्षीस समारंभ मात्र भाड्याच्या स्टेडियमवर. मी यशवंतरावांना म्हटलं, ‘‘ हे एवढे गिरण्याचे नवकोटनारायण. त्यांच्या कामगारांच्या सामन्यांचे पारितोषिक समारंभ भाड्याच्या स्टेडियमवर व्हावेत?’’ हा एवढा प्रश्न त्यांना नवीन संकल्प सोडण्यासाठी पुरला. त्याच दिवशी संध्याकाळी समारंभात यशवंतरावांनी कामगारांसाठी खास स्टेडियम उभारण्याची घोषणा केली आणि म्हटले, ‘‘आर्थिक काळजी करू नका. गिरण्यात पडून असलेल्या व कामगारांनी न घेतलेल्या पगार बाकी फंडाची सरकार यासाठी मदत करेल.’’ मुंबईतील सेनापती बापट रोडवरील कामगार स्टेडियमची सुरूवात ही अशी झाली.