८१. सिंबायोसिसमध्ये साहेब – डॉ. शां. ब. मुजुमदार
सिंबायोसिस संस्थेमुळे माझा आणि कै. यशवंतराव चव्हाण यांचा संबंध आला. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन १९७६ मध्ये त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते भारताचे परराष्ट्रमंत्री होते. आपल्या भाषणात भारतातील व परदेशी विद्यार्थ्यांना आपुलकीने वागविण्याने भारताची प्रतिमा उजळण्यास कशी मदत होते आणि त्या दृष्टीने सिंबायोसिसचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. आरंभी त्यांनी उद्घाटनासाठी वेगळी तारीख दिली होती. नंतर त्यांनी ३१ जुलै ही तारीख दिली. माझी जन्मतारीखही तीच ! यशवंतरावांना कुणीतरी हा योगायोग त्यांच्या कानात सांगितला. लगेच त्यांनी हार मागवून घेतला आणि तो माझ्या गळ्यात घालून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते मला म्हणाले, ‘‘तुझे काम फार महत्त्वाचे आहे. जिद्दीने ते पुढे चालव’’, माझ्या अंगावर शहारे आले. प्रेक्षक टाळ्या वाजवीत होते आणि मी यशवंतरावांच्या पाया पडण्यासाठी मलाही न कळत वाकलो. एक आगळी धन्यता आणि आनंद याचा आलेला अनुभव मी अजूनही विसरू शकत नाही.
१९८१ च्या जानेवारी मध्ये कै. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थिकलश, त्यांना ज्यावर मृत्यू आला तो पलंग, त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील वापराच्या वस्तू इत्यादी गोष्टी त्यांच्या पत्नी श्रीमती माईसाहेब आंबेडकर यांनी सिंबायोसिसला भेट म्हणून दिल्या. त्या निमित्ताने एक जाहीर समारंभ आयोजित केला होता. कै. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश, संस्थेच्या वतीने साहेबांनी स्वीकारावा अशी माझी मनापासूनची इच्छा. मी त्यांना आमंत्रण दिले. पण ज्या तारखा संस्थेला सोईच्या होत्या त्या त्यांना सोईच्या नव्हत्या. त्यांनी मला अन्य कोणा व्यक्तीस बोलावून समारंभ साजरा करण्याचे सुचविले. मी पत्रात लिहिलेले वाक्य अजूनही आठवते, " Nothing of any importance and significance in Maharashtra is likely to succeed without your blessing." त्यांच्या सोईच्या तारखेलाच आम्ही हा समारंभ साजरा केला.
ज्या जागेवर सिंबायोसिसला डॉ.आंबडेकर स्मारकाची इमारत बांधायची होती ती हनुमानटेकडीच्या पायथ्याशी असलेली जागा जंगल खात्याने निर्वनीकरण करून संस्थेच्या ताब्यात देण्याचे ठरविले. पण काही पुणेकरांचे वैशिष्ट्य असे की, कोणतीही नवीन गोष्ट पुण्यात होऊ घातली की अनेक मुद्यांचा जाहीर कीस पाडून वर्तमानपत्रातून विरोध करायचा आणि चांगल्या कार्याला अकारण विरोध करायचा. खरे म्हणजे ज्या जंगलखात्याच्या जागेवर सिंबायोसिसला डॉ.आंबेडकर स्मारकाची इमारत बांधावयाची तिथे संपूर्ण कातळ आहे नि त्यावर झाडे लावणे केवळ अशक्य आहे. पण, ‘‘सिंबायोसिसने तिथे झाडे लावली पाहिजेत.’’, ‘‘आंबेडकरांचे नवे कैवारी ’’ हनुमान टेकडीवर अतिक्रमण ’’ इत्यादी शीर्षकाच्या ठळक व भडक बातम्या, बातमीपत्रे आणि अग्रलेख पुण्यामुंबईच्या अनेक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले. मी भांबावून गेलो. सिंबायोसिसचे खुलासे अग्रलेख आणि बातमीपत्रांपुढे फिके पडू लागले. वैतागलेल्या मन:स्थितीत मी यशवंतरावांना पत्र लिहिले. त्यातील एक वाक्य असे होते, ‘‘वैचारिक नैराश्य आणि चांगल्या कामासाठीसुध्दा सामाजिक हेटाळणीमुळे येणारी हतबद्धता यामुळे मार्ग दिसेनासा झाला आहे. आपण याबाबतीत मार्गदर्शनपर विचार कळविल्यास त्यांना बरोबर घेऊन मी कदाचित मार्ग शोधू शकेल.’’ या पत्राला साहेबांनी लगेच उत्तर पाठविले. त्यात त्यांनी जो मला उपदेश केला तो सामाजिक कार्य करणा-या अनेकांना उपयोगी ठरेल. पत्रात त्यांनी लिहिले की, ‘‘सरकारची जागा मिळणे अवघड काम असते व अनंत अडचणी असतात. त्यामुळे निराश होऊन चालणार नाही.’’ आणि खरोखरच निराश न होता मी संस्थेची बाजू शासनातील अधिका-यांना व संबंधित मंत्र्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी संस्थेला यश आले व हनुमान टेकडीवरील ज्या जागेवरून वृत्तपत्रांमधून गहजब झाला ती जागा सिंबायोसिस संस्थेस डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा अंतिम निर्णय शासनाने घेतला! विरोधकांच्या सेनापतीने पत्र पाठवून माझे अभिनंदन केले आणि संयोजनाबद्दल कौतुक केले. ही बातमी साहेबांना सांगण्यासाठी मी धडपडत होतो, उतावीळ झालो होतो पण तसे घडून आले नाही हे माझे दुर्दैव होय !