७८. महाराष्ट्राची मैदानी तोफ – सौ. कमलाबाई अजमेरा
यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे भूषण होते, आणि ते भारताला ललामभूत ठरले. मी त्यांच्या संपर्कात सुमारे तीस वर्षांपूर्वी आले. ज्या वेळी धुळे जिल्ह्यातून पार्लमेंटसाठी श्रीमान् शाळीग्रामजी भारतीय उभे होते, त्या वेळी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी यशवंतरावजी तीन दिवस जिल्ह्यात होते. मीदेखील त्यांच्याबरोबर प्रचारार्थ होते. त्या काळात सार्वजनिक क्षेत्रात महिला फारशा पुढे आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रचारसभेच्या आरंभी माझेच भाषण होत असे.
त्या वेळी, ‘‘प्रचार कराल खेडा-खेडावर बाईबी फिरस, आपल्या गावलेबी उनी, चला चला बाईसव्हन, सभामा जाऊत. ती काय सांगस ते ऐकूत.’’ असे वातावरण तयार होई आणि सभेत प्रचंड गर्दी जमत असे. मग यशवंतरावजी म्हणायचे, ‘कमलाबाई लावा तुमची प्लेट.’ माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचे ओजस्वी व प्रभावपूर्ण भाषण होत असे. त्यामुळे सभा जिंकण्याचे कसब मला आढळून आले. ते आपले मुद्दे इतक्या सहजतेने मांडीत की, ऐकणारे मंत्रमुग्ध होत असत. विरोधी पक्षाचा तर ते धुव्वा उडवून टाकीत. म्हणूनच विरोधी पक्ष त्यांना ‘महाराष्ट्राची मैदानी तोफ’ म्हणत असत.
योगायोग असा की, या महाराष्ट्राच्या तोफेला राष्ट्राच्या संकटकाळी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या रक्षणार्थ दिल्लीस बोलावून त्यांना संरक्षणमंत्रिपद बहाल केले. ‘सह्याद्री हिमालयाच्या मदतीस धावून गेला.’ ही लोकोक्ती ऐकून सर्व महाराष्ट्रीयांची मान उंचावली आणि सर्वांची छाती सार्थ अभिमानाने फुगून गेली.
यशवंतरावजींचे स्त्रियासंबंधीचे विचार वेगळे होते. ते म्हणत, ‘‘स्त्रियांनी राजकारणात पडू नये.’’ या प्रश्नावर त्यांचेशी माझे वाद—विवाद होत असत. खडाजंगी ही होई. शेवटी मी एक रामबाण सोडत असे की, ‘जी आई तुम्हाला जन्म देते ती एक स्त्रीच असते ना! तीच आई तुमचे लालनपालन करून सुसंस्कारित करते ना? मग तीच स्त्री पुढे आलेली तुम्हास चालू नये काय? तिला तुम्ही अबला म्हणून दूर ठेवणार काय?’ या युक्तिवादाचे त्यांचेजवळ उत्तर नसे. ते गप्प बसत.
निवडणूक म्हटली की तिकीट वाटप आले. आणि तिकीट वाटपात कुणातरी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी दिल्लीला अपील करत असे. महाराष्ट्रातून असे कुणी दिल्लीला अपिलात जाणे यशवंतरावांना पसंत पडत नसे. सन १९५७ सालची घटना. मला त्यांनी असेंब्लीचे तिकीट दिले, परंतु स्थानिक राजकारणामुळे ते बदलले गेले. मी त्यांचा स्वभाव जाणून शिस्तशीर शांत राहून तिकीट दिलेल्या उमेदवारास पाठिंबा देऊन त्याचाच प्रचार केला.
सन १९६२ साली मी माझ्या न्याय्य हक्कासाठी दिल्लीकडे अपील केले. त्यानुसार मी स्वत: व माझे यजमान श्री. छगनलालजी अजमेरा दिल्लीस गेलो. यशवंतरावजी माननीय मोरारजीभार्इंकडे उतरले होते. आम्ही उभयता त्यांना भेटावयास गेलो. ते त्यांना पसंत पडले नाही म्हणून ते रागाने म्हणाले, ‘काय अजमेराबाई ! दिल्लीवर स्वारी का?’ मी अत्यंत नम्रपणे म्हटले, ‘नाही साहेब, न्याय मागण्यासाठी आले आहे. गेल्या वेळेस आपण मला मदत केली होती, आताही योग्य ते साहाय्य करा.’ ते तसेच रागाने निघून गेले. आम्ही तसेच बसून राहिलो. ते जेव्हा दुपारच्या मीटिंगला जाण्यासाठी निघाले तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही अजून बसलेलेच आहात?’ मी म्हणाले, ‘साहेब! मी दिल्लीस असल्यामुळे तुम्ही रागावला, आपण म्हणाल तर मी परत धुळ्यास जाते.’ यावर साहेब हसून म्हणाले, ‘आता आला आहात तर सर्वांना भेटा. इंदिराजींनाही भेटा.’ पडत्या फळाची आज्ञा समजून आम्ही सर्वांना भेटण्यास निघालो. १९६२ मध्ये .M.L.A. चे नाही पण M.L.C. चे माझे त्याच वेळी नक्की झाले.
निवडून आल्यावर त्यांनी माझा परिचय करून देताना ‘अॅक्टिव’ असे विशेषण लावून परिचय करून दिला. त्यांची शेवटची भेट आदरणीय इंदिराजी स्वर्गवासी झाल्यानंतर पार्लमेंटचे इलेक्शन लागलेले असताना झाली. मी चिंतातूर होऊन यशवंतरावजींशी बोलत होते, त्याच वेळी त्यांनी सांगितले की, ‘अजमेराताई, आपण जुन्या जमान्यातले झालो आहोत. आता राजीवजी सर्व काही व्यवस्थित हाताळतील. आपण आहोतच त्यांच्या पाठीशी.’ आमची मने हेलावली. ते दूर झाले. पण इतक्या लवकर ते कायमचे दूर होतील असे वाटले नव्हते.