• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७१

७१. लोकोत्तर नेतृत्व – डॉ. शरच्चंद्र गोखले

यशवंतराव चव्हाण यांचे मला लाभलेले नेतृत्व हे अनेक अर्थाने लोकोत्तर स्वरूपाचे आहे असेच मानले जाते. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील जातीयवादाला मूठमाती मिळाली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाला नवीन नवीन दिशा फुटू लागल्या. यशवंतरावजींच्यामुळे महाराष्ट्राला भारतीय नेतृत्व मंडळात मानाचे पान मिळाले.

बेचाळीसच्या चळवळीच्या वेळी मी शाळेत होतो. परंतु चळवळीत असलेले यशवंतराव यांच्याविषयी माझे वडील ती.दा.वि.गोखले यांच्याकडून ऐकत होतो. त्याच काळात भूमिगत असलेले श्री.अच्युतराव पटवर्धन यांच्याकडूनही यशवंतरावांच्या बाबत ऐकले. पुढे मी मुंबईस सरकारमध्ये उपसंचालक झाल्यानंतर यशवंतरावांचा थोडाफार सहवास मिळण्याचे भाग्य मला लाभले. त्या वेळीच त्यांच्या बोलण्यात असे आले की, आमच्या कोल्हापूरच्या घरात जे नंतर जप्त झाले व जे पुढे विद्यापीठ व हायस्कूल म्हणून सुरू झाले त्या जागेत यशवंतराव विद्यार्थी असताना राहात असत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काळात मला युनायटेड नेशन्सने पुढील संशोधनाकरिता निवडले. जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटावे म्हणून गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम घरची चौकशी केली व त्यानंतर परदेशातून काय शिकता येईल, महाराष्ट्राचे शासन जर विकासान्मुख करावयाचे असेल तर परदेशी प्रशासनविद्येमधील कोणते विचार घेता येतील याबद्दल ते बोलत होते. इतकेच नव्हे तर त्या काळात प्रसिद्ध झालेल्या गव्हर्नमेंट मॅनेजमेंट या एका नव्या पुस्तकाचा संदर्भही त्यांनी सांगितला. यशवंतरावांचे वाचन दांडगे होते आणि त्याची आठवण फार चांगली होती. त्याच वेळी बोलताना त्यांनी मला बाबूराव यांच्या कराडमधील भाषणाची आठवण करून दिली. यशवंतराव म्हणाले की, ‘‘बाबूरावांच्या भाषणात काँग्रेस ही संस्था नाही तर ती लोकांची चळवळ आहे.’’ हा विचार मी प्रथम ऐकला. त्यानंतर यशवंतराव दिल्लीला गेले. तो परराष्ट्रमंत्री असताना युनायटेड नेशन्सचा समाजकल्याण सल्लागार म्हणून माझी निवड झाली. त्या वेळी त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता दिल्लीला जेव्हा भेट झाली त्या वेळी मी खोलीत गेल्याबरोबर माझ्या हातात दोन टपोरी फुले देऊन त्यांनी माझे अभिनंदन केले. अगदी लहानातल्या लहान कार्यकर्त्याबाबत त्यांना वाटणारा जिव्हाळा आणि आपुलकी, यातून सामुदायिक सामर्थ्यकसे निर्माण होते याचे यशवंतराव हे उत्तम उदाहरण होते. ‘‘तू परदेशात सल्लागार म्हणून जातोस त्यावेळी तू ज्या कल्पना परदेशात सांगणार त्या कल्पनांचा अंमल भारतात होतो की नाही? होत नसेल तर त्याबाबत तुझी नैतिक जबादारी काय?’’ असा मोठा मार्मिक प्रश्न त्यांनी मला विचारला. ‘‘जगात कितीही मोठे काम करत राहिले तरी ज्या मातीत आपले पाय रोवले आहेत त्या मातीशी इमान राखून त्या मायभूमीचे पांग पेâडण्यासाठी काहीना काही कार्य करण्याचे, भारतातील गरिबांच्यासाठी, मुलांसाठी तू सदैव करत राहावे तरच आंतरराष्ट्रीय कामाची सार्थकता होईल.’’ असे ते म्हणत. जयंतराव टिळकांच्या सत्काराकरिता त्यांना एकदा बोलवावयाला गेलो त्या वेळी त्यांनी ‘‘अशी ही दिल्ली’’ म्हणून एक गोष्ट सांगितली. ती पुढे जयंतरावांच्या सत्कारातही त्यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘दिल्लीचा एक नबाब राज्यावर होता. त्या वेळी त्यांचे कुत्रे आजारी पडले. तेव्हा त्या कुर्ताचा समाचार घेण्याकरिता दिल्लीतल्या लोकांनी त्याच्या वाड्याबाहेर रांग लावली होती. पुढे राज्य गेले आणि नबाब स्वत: आजारी पडला तेव्हा त्याच्या समाचाराला स्वत:चे कुत्रेसुद्धा आले नाही.’’ अशा त-हेचे भेदक विश्लेषण ते सहजपणाने करून जात. त्यांच्या मरणापूर्वी सुमारे दोन महिने असतील, त्यांना भेटायला गेलो त्या वेळी त्या प्रचंड रेसकोर्सवरच्या घरात वेणूताई वारल्यानंतर आलेले उदासपण गोठून राहिल्यासारखे वाटत होते. त्या मोठ्या दिवाणखान्यात साहेब आणि मी तास- सव्वातास बसलो. त्यांनी खूप सांगितले. पण त्या सांगण्यामागे कुठेतरी एक बोच आहे हे जाणवल्यावाचून राहिले नाही. झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना ते म्हणाले. ‘‘मी सदैव देशच प्रमुखस्थानी मानला. पुष्कळदा आपण रान पार करत असताना एखादी वाट आपली वाटते. पण एकदा का वळण चुकले की, पुन्हा मूळ वाटेला वनवासातून जावे लागते.’’ त्या उदास संध्याकाळी आम्ही जे जे बोलतो त्याचे टिपण करून त्यांना पाठवले आणि त्याचेच लेख नंतर छापले. पण अजूनही त्यांनी वापरलेला तो शब्दप्रयोग ‘‘एक वळण चुकले की’’ ते मनातून जात नाही. इतके मात्र खरे की, महाराष्ट्राच्या विकासाची इतकी धारदार दृष्टी असणारा, सा-या महाराष्ट्राला एकत्रित बांधण्याची शक्ती असणारा, असा एकच नेता आणि तो म्हणजे यशवंतराव चव्हाण !