• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५१

५१.  राजा रसिकांचा – बाळ कोल्हटकर

यशवंतराव हे एक थोर पुरुष होते हे देवच बोलून चुकला ! म्हणूनच त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या एकूण एक माणसांचा कंठ दाटून आला. एवढेच नव्हे तर सह्याद्रीतल्या पत्थरापत्थराला पाझर फुटला. यशवंतरावांची आणि माझी शेवटची भेट जेमतेम महिना-सव्वा महिन्यापूर्वी त्यांच्या ‘रिव्हिएरा’ या निवासस्थानी झाली होती. इतर अनेक ठिकाणी माझे त्यांच्याबरोबर फोटो निघाले असतील. पण त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर निघालेला हा पहिला आणि शेवटचाच फोटो. जन्मभर आठवण राहावी म्हणून तर नियतीनं हा योग जुळवून आणला नसेल ना? एरवी ते एवढ्या लवकर जातील याचे पुसट सुद्धा चिन्ह त्यांच्या प्रकृतीवर दिसत नव्हते! दिसले नव्हते!

सौ. वेणूतार्इंची एक व्हिडोओ टेप वेणूतार्इंच्या भावाच्या मुलीनं, श्री. मोरे यांच्या मुलीनं केली होती. सौ. शेवाळे यांनी त्या टेपच्या मागे मी निवेदन द्यावे यासाठी मला यशवंतरावांच्याकडे बोलावून घेतले होते. ‘‘बाळ माझ्या घरच्या ट्रस्टसाठी ही टेप मी फक्त बाळगणार आहे. मला याचं कुठही जाहीर प्रदर्शन करायचं नाही. पण तुमचा आवाज माझ्या घरात असावा अशी माझी इच्छा होती. म्हणून मुद्दाम तुम्हाला बोलावून घेतलं.’’ बोलणारा इथेच राहिला. ऐकणारा निघून गेला. ते पुढे म्हणाले, ‘‘राजसंन्यास हे नाटक तुम्ही पुरं करता आहात असं ऐकलं. पण त्यांच्या भाषेचा बाज तुम्हाला जमेल का?’’ त्यावर मी त्यांना एक प्रवेश वाचून दाखविला. पाठीवर थाप मारून ’’शाब्बास! छान जमलयं!’’ असे उद्गार ऐकल्यावर ‘‘२५ तारखेला मुंबईत प्रयोग आहे, नाटकाला याल का?’’ असे नेहमीप्रमाणे मी त्यांना विचारले. ‘‘२५ तारखेला निवडणुकीच्या दौ-यावर मी सातारला जाणार आहे, त्या वेळी अवश्य प्रयत्न करीन.’’ पण यशवंतराव तुम्ही चक्क खोटं की हो बोललात? नाटकाला आला नसता तरी चाललं असतं. पण या नको त्या दौ-यावर तुम्ही जायला नको होतं. निजधामी म्हणजे कराडला असं मला वाटलं होतं. पण निजधाम म्हणजे परलोक हा अर्थ जाता जाता तुम्ही मला शिकवून गेलात!’’

आठवणी दाटून येतात. कंठ आणि डोळे दोन्ही भरून येतातं. फार मोठा माणूस. लहानाबरोबर ज्याला लहान होता येतं त्यालाच मोठा माणूस म्हणायचं असतं. एरवी माझ्यासारख्या सामान्य माणसाबरोबर एवढे जिव्हाळ्याचे संबंध त्यांना जोडताच आले नसते ! माझी त्यांची पहिली भेट नागपूर येथे झाली.

श्री. भालचंद्र पेंढारकरांच्या ललितकलादर्श या संस्थेच्या दुरितांचा तिमिर जावो, या नाटकाचा प्रयोग धनवटे रंग मंदिरात चालू होता. सासुरवाडीला मुक्काम असल्यामुळे त्या दिवशी माझेच नाटक असलेमुळे साहजिकच मी स्टेजच्या मागच्या बाजूला पेंढारकरांशी बोलत उभा होतो. पहिला अंक संपला, आणि अत्यंत भारावलेल्या अवस्थेत महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव आत आले. ‘‘कुणी लिहिलंय हे नाटक?’’ हा पहिला प्रश्न त्यांनी पेंढारकरांना विचारला. मला वाटतं पिंडानं ते साहित्यिकच असावेत. ‘‘कृष्णाकाठ’’ हे पुस्तक ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची कर्तबगारी. जन्मभर पुढारी म्हणून जगले, आणि जाताना साहित्यिक म्हणून गेले. असो तर पेंढारकरांनी त्यांना ‘‘बाळ कोल्हटकर’’ असे नाव सांगितले. त्यांच्या समजुतीनं मोठ्या मिश्या असलेला पगडी घातलेला कुणीतरी माणूस लेखक असावा. त्यांचा पुढचा प्रश्न. ‘‘कुठं असतात ते?’’ त्यावर पेंढारकरांचं उत्तर, ‘‘हे काय लेखक माझ्या शेजारी उभे आहेत!’’ त्या वेळची माझी मूर्ती, उंची, वय लक्षात घेऊन ‘‘यांनी लिहिलंय नाटक?’’ असा प्रति प्रश्न विचारताना, असा काही चमत्कारिक, कुतूहलदर्शक, तरीही कौतुक करणारा चेहरा त्यांनी केला होता, की त्याही अवस्थेत आम्हाला विशेषत: मला दाखवलं नसलं तरी हसू आवरत नव्हतं. पुढे त्यांनी विचारलं, ‘‘कुठले राहणारे आपण?’’ मी म्हटलं, ‘‘सातारचा.’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘सातारचा? लेका हिकडं ये!’’ म्हणून त्यांनी मला जवळ ओढलं. ते राहणारे कराडचे. मी सातारचा. भेटीचं स्थळ नागपूर. आपल्या गावचं कुत्रं जरी परक्या ठिकाणी भेटलं तरी माणसाला आपुलकीचं भरतं येतं. तशा दृष्टीने नागपूर हे स्थळ आम्हाला परकं नसलं तरी दारचंच! पण त्या ठिकाण जन्माला आलेली आपुलकी, ते इथून जाईपर्यंत त्यांनी सांभाळलेली होती. किती म्हणून आठवणी सांगू? मी अपुरा पडेन ! कागद अपुरे पडतील! आयुष्य अपुरे पडेल ! प्रोत्साहन देऊन नाटककार म्हणून माझं आयुष्य घडवायलाच जणू त्या दिवशी यशवंतरावांनीच सुरुवात केली.