४८. पडत्या काळातील प्रतिनिधी – शिवाजी सावंत
राजकीय क्षेत्रात वावरणा-या अशा थोड्याच व्यक्ती आहेत की त्यांच्याबाबत ‘‘अनेक आंधळे व प्रशस्त हत्ती’’ यांची गाजलेली बोधकथा आठवावी. खा. यशवंतरावजी या थोडक्यांपैकी आघाडीचे एक आहेत. आजही भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्राचे सुयशी मुख्यमंत्री अशा राजकीय कारणांनी म.फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लो.टिळक, आगरकर अशा पट्टीच्या समाजसुधारकांच्या वैचारिक वारश्याचे पाईक या अर्थाने, मराठी नाटक सार्थ चवीने ‘सह’ येऊन दिल्लीसारख्या ठिकाणी बघणारे नाट्यरसिक म्हणून ग.दि.माडगूळकर, रणजित देसाई, ना.धों.महानोर एवढेच काय धनगर समाजातील नवोदित कवी तांदल यांच्याशी काव्यशास्त्र विनोदेने असा, ‘अभिजात साहित्य वेडा’ म्हणून रमून बोलणारे या अर्थाने. युगांतर, ऋणानुबंध, भूमिका ही वैचारिकांबरोबर ख-या अर्थाने ललितरम्य पुस्तकं स्वत:च सिद्ध करणारे एक साहित्यिक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेरही हटकून ज्यांच्याबद्दल हररोज काही ना काही बोलले जातेच, असे खा. यशवंतराव चव्हाण एक आहेत.
माणसाच्या बहुश्रुतपणाची व मोठेपणाची एक आंग्ल व्याख्या आहे. बराच विचार केला तर पटेल की, ती किती योग्य व अचूक व्याख्या आहे. ‘‘मोठा कोण? तर त्याच्याबद्दल खूपशा दंतकथा पसरलेल्या असतात तो!’’ ही ती विख्यात व्याख्या आहे. यशवंतराव या व्याख्येच्या अर्थाने तर नक्कीच मोठे ठरतात, अगदी आपोआप.
यशवंतरावांच्या राजकीय व सामाजिक विचारांच्या बैठकीची मुहूर्तमेढ त्यांच्या बालपणी घडलेल्या एका अत्यंत अर्थपूर्ण घटनेत रोवली गेली असावी असे मला एक ललित लेखक म्हणून वाटते. या वाटण्याला आधुनिक मानसशास्त्राचा सिद्धान्तही आहे. ती घटना लक्ष्यवेधी आहे. ती अशी-
त्या वेळी ते प्राथमिक शिक्षण घेत होते. कोवळ्या वयात ते खाकी हाफपॅण्ट व पांढरा हाफशर्ट, खांद्याला वह्या पुस्तकांची पिशवी, अशा वेषात देवराष्ट्र या आपल्या जन्मगावापासून शाळेसाठी क-हाडला जात. हा काळ देशाच्या दृष्टीने फार धामधुमीचा होता. त्यावेळी जतींद्रनाथ दास या बंगाली क्रांतिकारक कैद्याने ब्रिटिशांच्या अन्यायी वागणुकीबद्दल तुरूंगात उपोषण मांडले होते. ब्रिटिश सरकार कैद्यांना विशेषत: राजकीय कैद्यांना चांगली वागणूक देत नव्हते. अन्न, वैद्यकीय मदत याबाबत सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होते. त्याविरूद्ध दासांनी ते उपोषण मांडले होते. संपूर्ण देशाची सहानुभूती जशी भगतसिंगांच्या मागे होती तशी दासांच्या मागे होती. त्याकाळी कराडमध्ये दासांच्या प्रकृतीची बारकाव्यानिशी माहिती देणारी पत्रके गुपचूप रोज वाटली जात होती. अडगर वयाचा छोटा यशवंत रोज त्यातील पत्रक हस्तगत करून शाळा सुटल्यावर गावाकडच्या परतीच्या वाटेवर असलेल्या मुलांसह ते वाचीत असे. त्याला वाटे, काहीही घडावे पण दासांनी आपले उपोषण सोडावे. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. सातव्या दिवशी संपूर्ण देशाला शोकार्णवात टाकून उपाशी दास तुरूंगात निधन पावले ! उभा देश हळहळला !
त्या दिवशी देवराष्ट्रचा छोटा यशवंत आपल्या परतीच्या वाटेवर एकटाच ओक्साबोक्सी रडत होता. रडता रडता चालत होता. चालणे भागच आहे म्हणून चालत होता नि रडत होता एका बंगाली कार्यकर्तासाठी! यशवंतरावांच्या जीवनातील नांदीची ही घटना, तिच्यातील बारकाव्यानिशी ज्यांना कळली त्यांना हिमनगासारखे पाण्याबाहेर असलेले यशवंतराव कळतील. जीभ आहे म्हणून पटकन उचलून ती टाळ्याला लावणा-या त्यांच्या कडव्या विरोधकांनीही प्रत्यक्ष आपल्या आयुष्याची गोधडी चांगली दोन चार वेळा झटकून तिला असा एखादा प्रसंग चिकटवलेला मिळतो का हे गुपचूपपणे पहावे!
या घटनेतच जागोजागी यशवंतरावांनी भोवतालच्यांना ‘कोड्यात टाकले असे वाटावे’ असे का वागले याचे उत्तर आहे. बागलाण प्रांतातून थेट दिल्लीला गेलेल्या शेतकरी बाईला आपल्या बंगल्यातच दोन दिवस ठेवून घेऊन तिला चोळीलुगडे देऊन तिच्या परतीचे तिकीट काढले जाते आणि तिच्यावरच्या अन्यायासाठी जेव्हा दिल्लीहून नासिक बागलाणच्या कलेक्टरला थेट फोनवर सूचना केंद्रीय मंत्री ना.यशवंतरावांच्याकडून मिळतात तेव्हा इतरेजनांना आश्चर्य वाटते, जाणत्यांना नाही. मराठवाड्यात दौ-यावर असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीला एक गावरान वृद्धा हात करून थांबविते. मुख्यमंत्री थांबतो, तिची विचारपूस करतो. सण तोंडावर आहे म्हणून तिच्या नातवंडांना खाऊसाठी पैसे देतो. हे साकारते तेही आश्चर्याचे वाटत नाही.