• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १९

१९. यशवंतराव चव्हाण व मी – आप्पासाहेब देशपांडे

बहुजन समाजाला एकूणच समाजजीवनात महत्त्व मिळावे म्हणून यशवंतरावांनी जो अहर्निश प्रयत्न केला त्यामुळेच आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनात त्यांनी अढळपद मिळवले. याची तुलना करावयाची झाली तर ती छत्रपती शिवाजीमहाराजांबरोबरच करता येईल. लोकसंग्राहक वृत्तीचा आणि दूरदृष्टीच्या सुजाणपणाचा साक्षात्कार त्यांच्यानंतर फक्त साहेबांच्याच ठिकाणी जाणवला. एवढे असूनसुद्धा एक व्यक्ती किंवा मित्र म्हणून देखील ते असेच अविस्मरणीय होते. या दृष्टीने त्यांच्याजवळच्या मित्रमंडळींमध्ये माझा समावेश झाला हे माझे थोर भाग्य. साधारणत: कराडमध्ये ते यायचे झाले की त्यांच्या कार्यक्रमांची व्यवस्था लावण्यामध्ये माझा सहभाग असे. एवढा मोठा नेता, पाठीमागे अनेक व्याप पण साहेबांचा सौजन्यशील स्वभाव कधीच बदलला नाही. नाना त-हेची माणसे भेटायला येत. आपली सुखदु:खे सांगत व साहेब जमेल तसे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत. दुसरे त्यांचे वैशिष्ट्य असे की, आपणासाठी जे लोक निरनिराळी कामे करीत त्यांच्याबद्दल ते सदैव कृतज्ञ असत व ते ती दाखवीतही! मनुष्य कितीही लहान असो, तो तेथे असो अगर नसो पण ते त्याचे आभार मानीत असत. प्रवासात असले की आपले सचिव, ड्रायव्हर यांच्या स्वास्थ्याची अगदी घरच्यासारखी काळजी घेतील आणि त्यामुळे सारे नोकरचाकर त्यांच्यासाठी जीव टाकत. सुदैवाने त्यांच्या या प्रवृत्तींना मनापासून साथ देणारी सौ.वेणूतार्इंसारखी पत्नी पण त्यांना लाभली. घरात येणा-या प्रत्येकाचे आदरातिथ्य त्या अगदी मनापासून करीत.

साहेबांना एकूणच शैक्षणिक प्रक्रियेबद्दल खूप आत्मीयता असे. खेड्यापाड्यात जन्मलेला हा यशवंता पुढे ना. यशवंतराव चव्हाण या नात्याने समाजाचे नेतृत्व करू लागला हा बदल त्यांना मिळालेल्या सुसंस्कारित शिक्षणामुळेच झाला. शिक्षण हे केवळ शिकवणी होता उपयोगी नाही हा त्यांचा आग्रह असे. शिक्षणामुळेच सबंध बहुजन समाजाचे रूपांतर एका सुजाण विज्ञाननिष्ठ, सुसंस्कृत समाजामध्ये करता येईल असे त्यांना वाटे; आणि त्यामुळेच आपले गुरुजन, कर्मवीर अण्णा, कराडचे कै. काका करंबेळकर यांच्याशी ते अतिशय जिव्हाळ्याने बोलत. पुढील काळाची पाऊले ओळखून यासाठीच काकांबरोबरील विचारविनिमयातून कराड सायन्स कॉलेजची कल्पना साकारली. लोकशाहीमध्ये लोकशिक्षण हे लोककल्याणाचे प्रभावी साधन आहे असे ते मानीत.

साहेबांचे आणखी एक आगळेपण म्हणजे सुसंस्कृतपणा व साहित्याबद्दलची त्यांना असलेली ओढ. ग.दि.माडगूळकर, रणजित देसाई, कवी यशवंत, पु.ल.देशपांडे, ना.धों.महानोर, व्यंकटेश माडगूळकर, श्रीनिवास कुळकर्णी यांच्या सहवासासाठी ते आसुसलेले असत. ‘‘समाजाच्या मानसात जे असते तेच साहित्यात उतरते.’’ किंवा ‘‘सामाजिक, राजकीय व साहित्यिक मूल्यांची एकमेकांपासून फारकत करता येत नाही.’’ असे त्यांचे विचार अशाच साहित्यिक मैफिलीत आम्ही ऐकत असू. सर्व साहित्यिकांना मग तो नव्याने पुढे आलेला लक्ष्मण माने असला तरी ते प्रमाने अगत्याने वागवत. भाऊसाहेब खांडेकर म्हणजे त्यांच्या हृदयातील मर्मस्थान होते. भाऊसाहेबांच्या ‘पांढरे ढग’ व ‘दोन ध्रुव’ या कादंब-यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पाडला. गरिबांबद्दलची कणव यामधून एक आदर्शवादी जीवन जगण्याची प्रेरणा या कादंब-यांनी त्यांना दिली. यामुळेच कराडला त्यांच्या गावी जे साहित्य संमेलन होते त्याला भाऊसाहेबांना त्यांनी मोठ्या हळुवारपणे आणले होते. हे सर्व पाहिले की, मला वाटते साहेबांचा मूळ पिंड हा साहित्यिकाचाच होता. पण ब-याच जणांना हे समजले नाही. त्यांचे साहित्य व साहित्यिकांवरील प्रेम हा राजकारणाचाच एक भाग आहे असे हे लोक मानत. साहेबांना यामुळे फार क्लेष होत. शिवनेरीच्या नौबती, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध इत्यादी त्यांच्या पुस्तकांतून त्यांच्या साहित्यिक गुणांची केवढी तरी प्रचिती येते. शेवटी ‘‘कृष्णाकाठ’’ प्रसिद्ध झाले आणि सर्वांना ‘‘साहित्यिक’’ यशवंतरावांचा परिचय झाला. पण त्या वेळी फार उशीर झाला होता. कराडच्या साहित्य संमेलनात त्यांनी म्हणूनच सांगितले होते की, तुम्ही साहित्यिक जी सेवा लेखणीने करता ती आम्ही राजकारणी लोक वाचेने करतो.