• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०६

१०६ - ओसंडून वाहणारा माणुसकीचा गहिवर - श्री. अनंतराव पाटील

त्या दिवशीची रविवारची रात्र झोप न येताच काढली. झोप येणार कशी? गेल्या चाळीस वर्षांतल्या सहवासातील घटना डोळ्यापुढून एक एक सरकत होत्या आणि आठवणींचे कढ बाहेर पडत होते. १९४४ ते १९८४ च्या दरम्यान काय काय घडले, किती किती घडले आणि कसे कसे घडले हे सारे एकामागून एक आठवू लागले. आठवणींच्या माळेतील एक एक मणी पुढे सरकत होते. भूमिगत चळवळीतील यशवंतराव, पार्लमेंटरी सेक्रेटरी यशवंतराव, पुरवठामंत्री यशवंतराव, द्विभाषिकाचे मुख्यमंत्री यशवंतराव, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव;’ भारताचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, यशवंतराव; उपपंतप्रधान आणि शेवटी आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव, ही सगळी स्थित्यंतरे, या सगळ्या अवस्था जवळून पाहिलेल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस यशवंतराव आणि नेते यशवंतराव. काँग्रेस वर्किंग कमिटीत नेहरूंच्या शेजारी बसून सल्लामसलत करणारे यशवंतराव, साहित्यिक यशवंतराव, पत्रकार यशवंतराव, रसिक, सहकारी यशवंतराव यांच्या आठवणी लिहायच्या म्हणजे एक ग्रंथच लिहावा लागेल.

राजकारणात मी त्यांच्याबरोबर जवळजवळ तीस वर्षे काम केले. या काळात एक कार्यकर्ता, तर पत्रकार आणि संसदसदस्य अशा भूमिका पार पाडताना मला यशवंतरावांचा सहवास लाभला, प्रेम लाभले, मोलाचे मार्गदर्शन पण लाभले. ते मला धाकट्या भावाप्रमाणे मानीत आणि वागवीत. पुढे जाण्यासाठी, मोठे होण्यासाठी, त्यांनी मला संधी दिली, सहकार्य दिले आणि साहाय्य पण केले. मी त्यांना माझा नेता मानले होते. मार्गदर्शक मानले होते. काही वेळा आमचे वैचारिक मतभेद झाले. माझ्या काही चुका पण झाल्या, पण माझ्यावर साहेब कधी रागावले किंवा चिडले असे मला आठवत नाही.

ज्या सह्याद्री बंगल्यावर परवा मी विमनस्क मन:स्थितीत बसलो होतो त्या बंगल्यावर १९५६ ते १९६२ या काळात आम्ही किती विषयांवर बोललो, किती विषयांवर हितगुज केले त्याची मोजदाद लक्षात नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, द्विभाषिक मुंबई राज्य चालविण्याची जबाबदारी, त्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि विरोध, ते अपमानाचे दिवस आठवले की यशवंतरावांजवळची सोशिकता आणि सहिष्णुता डोळ्यांपुढे उभी रहाते. त्यांच्याबरोबर फिरताना रागावलेल्या लोकांकडून दगडफेक व्हायची, चपलाफेक व्हायची, आणि आम्ही ते सहन करीत पुढची वाट चालायचो. साहेब म्हणायचे, ‘‘संयुक्त महाराष्ट्र मिळेल आणि तो मिळायला हवा. पण संघर्ष करून नव्हे तर नेहरूंचे आणि केंद्रीय नेत्यांचे मन वळवून.’’ त्यांना आपले म्हणणे पटवून देऊन साध्य हस्तगत करणे हा मार्ग लांबचा आणि अवघड होता. पण त्या मार्गानेच चव्हाण गेले आणि शेवटी यशस्वी ठरले. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्याच्या उद्घाटनाला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू आले. मुंबईतील राजभवनावरील तो सोहळा अजूनही आठवतो आणि चव्हाणांविषयी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री या नात्याने धोरणविषयक जे भाषण केले ते कानात अजूनही घुमतेय. ‘‘हे राज्य मराठ्यांच्याकरिता नसून मराठी माणसांकरिता आहे, याची जाणीव ठेवूनच त्याची सर्वांगीण प्रगती करण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातील’’असे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.

यशवंतराव चव्हाणांनी आपला वरील शब्द पाळण्याचा प्रयत्न कसोशीने केला. जाति-जमातीत सलोखा नांदेल याची दखल घेऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा गाडा पुढे हाकला. शेतीला पाणी दिल्याशिवाय ती सुधारणार नाही म्हणून धरणे, पाटबंधारे, कालवे यांवर भर दिला. उद्योग-धंद्याशिवाय प्रगती नाही म्हणून महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योग कसे उभे राहतील याकरिता जातीने प्रयत्न केले. ग्रामीण भागात प्रक्रिया करणारे कारखाने उभारल्याशिवाय शेतक-यांची स्थिती सुधारणार नाही, हे जाणून साखर कारखाने, सूत गिरण्या, तेलाच्या गिरण्या, उभारण्यास उत्तेजन दिले, मदत दिली. शेतक-याला कारखानदार बनविला, व्यापारी बनविला.