१०५ - यशवंतरावांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व - पु.शं. पतके-
श्री यशवंतराव चव्हाण हे थोर नेते तर होतेच, परंतु त्याहीपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. राजकीय झगमगाटामुळे व विविध वादविवादात त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील लोभसपणा, माणुसकी, लोकसंग्रही वृत्ती व पारदर्शक शुचिर्भूतता विसरून चालणार नाही. मी माझ्या दिल्लीतील २५ वर्षांच्या वास्तव्यात यशवंतरावांचे सर्व सहकारी नेत्यांना जवळून ओळखत होतो. पं.नेहरू यांच्या विश्वासातील सहकारी म्हणून राष्ट्रपतीपासून उपमंत्र्यांपर्यंत माझा सतत, संचार असे व या अनुभवामुळे मी छातीठोकपणे सांगू शकतो की, यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. १९६० अखेर मी दिल्ली सोडली व त्यानंतर यशवंतराव दिल्लीला सरक्षणमंत्री म्हणून गेले असले तरी गेल्या २५ वर्षांत माझ्या दिल्लीला अनेक खेपा इंदिरा गांधी यांच्या कामासाठी होत असताना राजकीय प्रश्नावर कितीही मतभेद झाले तरी इंदिराजी यशवंतरावांना किती मानत याची मला विश्वसनीय खात्री आहे. ज्या ज्या वेळी इंदिराजी संभ्रमात पडत त्या त्या वेळी यशवंतरावांचा सल्ला त्या समक्ष अथवा माझ्यासारख्या विश्वासातील मध्यस्थामार्फत घेत. यशवंतरावांच्या भाषेत व वागण्यात मार्दव असे. स्वत:च्या मर्यादा ओळखण्याचा पंतप्रधानस्तरावर वकूब त्यांचेजवळ होता. तो ओळखून इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे, जनतासंपर्क वाढवणे (अन्य प्रांतीयात) महाराष्ट्राची कामे परहस्ते करवून घेणे आदि मार्गाने त्यांनी अष्टपैलुत्व संपादन केले व संरक्षण, वित्त, गृह, उपपंतप्रधान मंत्री इ. जबाबदा-या मुत्सद्दीपणे व कौशल्याने पार पाडून त्यांची व पर्यायाने महाराष्ट्राची शान राखली.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष
दिल्लीमध्ये महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांच्या २५० संस्थांचे मध्यवर्ती मंडळ असून या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा यशवंतरावांनी श्री.काकासाहेब गाडगीळ यांच्याकडून स्वीकारली व २० वर्षे ती समर्थपणे पेलली. या मंडळाचा पूर्वीचा कार्याध्यक्ष व कार्यवाह म्हणून माझी कार्यकारी मंडळावर नियुक्ती होत असे व त्यामुळे या संघाच्या विविध समस्यांची चर्चा करण्याची संधी यशवंतरावांनी मला दिली. त्या वेळचे श्री. रमेश मुळगुंद हे एक झंझावाती कार्यकर्ते होते. लोकशाही पद्धतीने प्रत्येक निर्णय दहा जणांना विचारीत न बसता त्यांना योग्य वाटेल त्या मार्गाने ते कार्य करीत असत. त्यामुळे जुन्या पठडीतले कार्यकर्ते नाराज होऊन यशवंतरावांच्याकडे जात. तेव्हा यशवंतराव ज्या मुत्सद्देगिरीने समन्वयाची भूमिका घेत ती सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांना आदर्श वाटेल अशीच होती. ‘‘सर्व गोष्टी नियम व घटना यांना धरून झाल्या पाहिजेत असा माझाही आग्रह आहे. परंतु कार्याची धुरा संभाळणाराला अनेक वेळा स्वत:चे जबाबदारीवर काही निर्णय घ्यावे लागतात. ते आपण समजावून घेतले पाहिजेत.’’ असा त्यांचा अभिप्राय असे. जोपर्यंत धडाडीच्या कार्यकर्त्याला पर्याय पुढे येत नाही तोवर आपण त्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारले पाहिजे व संघटना कार्य पुढे रेटले पाहिजे. बौद्धिक वादातील यशावर संस्था पुढे जात नाही, ती घाम गाळणारे नि:स्वार्थी कार्यकर्ते चालवीत असतात. त्यांचा मान आपण राखलाच पाहिजे हा यशवंतरावांचा अभिप्राय सर्व सार्वजनिक क्षेत्रांना मार्गदर्शक ठरेल.
एक थोर प्रशासक
माझे धाकटे बंधू यशवंतरावांचे कित्येक वर्षे पी.ए.म्हणून काम पाहात. त्या वेळी चव्हाण दांपत्य आपल्या सेवकांची सुखदु:खे स्वत:ची समजून कशी देखभाल करीत असे याची शेकडो उदाहरणे माझे बंधू मला सांगत असत. व्याख्यानांतून राजकीय नेते समता, बंधुभाव, उच्चनीच भेद नष्ट करणे इ. घोषणा करीत असतात परंतु प्रत्यक्ष आचरणात आणणारे यशवंतराव होते. काकासाहेब गाडगीळ यांच्याबरोबर मी २० वर्षे बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्र समाजाचे काम केले आहे. काकासाहेबांची सर्वसंग्राहकवृत्ती यशवंतरावांनी जोपासली पण त्याला मुत्सद्देगिरी व अंतर्मुखतेचे आवरण घातले. ‘मी अमुक केले’ अशी बढाई मारण्यापेक्षा तुमचे काम कसे होईल यावर त्यांचे लक्ष असे. महाराष्ट्राची शेकडो कामे यशवंतरावांनी पडद्याआड राहून केल्याचे मला ज्ञात आहे. दिल्लीतील सर्व मराठी भाषिकांचे ते अनभिषिक्त राजे होते.