६. ज्ञानसूर्य - धन्वंतरी
मा. यशवंतरावांच्या घराशी माझा ऋणानुबंध १९३२ पासून. मी त्यांचा  घरचा वैद्य होतो. मा. यशवंतराव विद्यार्थिदशेत! परंतु तडफदार! ‘‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!! त्याप्रमाणे ते स्वतंत्र वृत्तीचे स्वयंप्रकाशी दिसत! त्यांच्याजवळ निरीक्षणदृष्टी व जेथे ज्याचा गुण दिसेल तो घेण्याची प्रवृत्ती जाणवत असे.’’ त्याचप्रमाणे ख-या राष्ट्रीय वृत्तीचे साहित्यिक व उत्कृष्ट वक्ते ह्या त्यांना परमेश्वराकडूनच देणग्या मिळाल्या होत्या. त्या त्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत परिश्रमाने आयुष्याच्या अखेरपर्यंत जोपासल्या.
माझा प्रत्यक्ष परिचय प्रथम १९३६ साली झाला. त्या साली डॉ. गिल्डर आरोग्य मंत्री काँग्रेस राज्यात होते. त्या वेळी त्यांनी आयुर्वेदास घातक असे बिल कौन्सिलमध्ये आणले. त्यांस महाराष्ट्रातील सर्व वैद्यांनी कडाडून विरोध केला. मी आमची बाजू आमदार आत्माराम पाटील बोरगावकर यांना चांगली समजावून सांगून विरोध करून ते बिल स्थगित केले!!
नंतर माझा प्रत्यक्ष परिचय सन १९४२ साली झाला. ते पहिले डिक्टेटर (म्हणजे हुकूमशहा नव्हे). सर्व जिल्ह्यात निरनिराळे ग्रूप नीरा नदीपासून वारणा नदीपर्यंत काम करत होते. त्यांत प्रथम तालुका कचे-यांवर उघड मोर्चे नेणे, त्यांचे नियोजन करणे व ते यशस्वी पार पाडणेस लागणारे कौशल्य ते पार पाडीत.
कराड, तासगाव मोर्चा यशस्वी झाला! ब्रिटिश सरकार चिडले आणि वडूज, इस्लामपूर येथे गोळीबार करून चांगली चांगली देशभक्त माणसे ठार मारली गेली! मग सातारा जिल्ह्याची चळवळ भूमिगत (अंडरग्राऊंड) सुरू झाली! त्याचेही नेतृत्व यशवंतराव पकडले जाईपर्यंत करत होते!!
वरच्या लोकांचे-आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, शिरू लिमये, एस्.एम्.जोशी यांच्याशी संबंध ठेवीत व दारूगोळा, पैसे खाली सर्वांना पोचवत!
मी काही कट्टर गांधीवादी नव्हे! क्रांतिकारकवादी!
मला हाक मारली- धन्वंतरी हे नाव त्यांनीच दिले! व म्हणाले, दोनतीन वेळा प्रयत्न केला तरी शिरवडे स्टेशन जाळण्याचे जमले नाही, तेथे पाच बंदुका वगैरे आहेत !
मी म्हटले, ‘‘आमच्या ग्रुपवर जर सर्वस्वी जबाबदारी टाकत असाल तर त्या कामगिरीचा विडा उचलतो, कामगिरी यशस्वी करू नाही तर मरून जाऊ.’’ ते म्हणाले ठीक आहे!- माझ्या ग्रूपमध्ये माधवराव जाधव वगैरे १५-२० हायस्कूलमधील मुले ! मी स्वत: जाऊन वॉच (निरीक्षण) करून आलो! तर पोलीस ७ ते ७।। ला रात्री जेवण्यास जातात व ८।। ला परत येतात ! मुलं जरी असली तरी चिवट, जिद्दी, निव्र्यसनी, उत्साही, आनंदी असत. लागलीच तयारी केली व बरोबर ७। ला स्टेशनवर चढाई केली! तिथले पोर्टर वगैरे कामगारांना एकत्र करून एक पिस्तुलधारी उभा केला, एवढ्यात स्टेशनमास्तराने कराड पोलीस पार्टीस फोन केला, ‘‘स्टेशन जळाले!’’ त्याबरोबर आमच्यातल्या एकाने स्टेशन मास्तर यांना धरले, पण मी सांगितले, ‘‘त्यांना हात लावू नका!’’ मी कामास लागलो. सर्व एकत्र करून पेटवणे! स्टेशनमास्तरला एकाने तडाखा दिला. तो माझ्याकडे रडत आला! मी कोणी मारले? म्हणून चौकशी करून त्याच्या जोरात एक कानफाडात दिली! माझ्याबद्दल स्टेशनमास्तरला सहानुभूती निर्माण झाली व तो मला म्हणाला ‘‘आत बंदुका आहेत.’’ स्टेशन पेटलेले! तथापि त्यांस घेऊन आत गेलो व पाच बंदुका, रायफल्स व काडतुसाची पिशवी घेऊन आलो! एवढ्यात सदूभाऊ पेंढारकर, शांताराम इनामदार, रामभाऊ पवार, तांब्यांचा ग्रूप हे आले व तेथील काम संपवून सर्व परत निघालो. मी माझ्या ओगलेवाडीच्या दवाखान्यात आलो तर मा. यशवंतराव तिथे अगोदरच हजर! आम्हा सर्वांना भेटले कडकडून !!- डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहात होत्या, ते म्हणाले, ‘‘धन्वंतरी जिवंत मला दिसाल असे वाटले नव्हते !’’

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			